वनवासी महिलांनी बनविलेल्या कंदिलांनी राजभवन लखलखणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2020
Total Views |

vivek_1  H x W:
 
 
 
मुंबई : वनवासी भागात सामाजिक, शैक्षणिक व रोजगारनिर्मितीसाठी कार्यरत असणार्‍या ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या वनवासी भगिनींनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक बांबूंच्या आकर्षक कंदिलांनी यंदाचे राजभवन लखलखणार आहे. यंदाच्या दिवाळीत राजभवनात ४८० कंदील राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, त्यांच्या सर्व कर्मचार्‍यांना भेट म्हणून देणार आहेत. पर्यावरणपूरक शेकडो बांबूंच्या आकर्षक कंदिलांनी राजभवन लखलखणार असल्याने ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या वनवासी भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
 
 
‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या वनवासी भगिनींनी तयार केलेले पर्यावरणपूरक बांबूंचे आकर्षक कंदील २० ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेट म्हणून देण्यात आले होते. यावेळी ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’चे व्यवस्थापक लुकेश वासुदेव बंड, प्रशिक्षण व विकास अधिकारी प्रगती सचिन भोईर, श्रीशिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड व सदस्य, रायगड विकास प्राधिकरण कार्याध्यक्ष पांडुरंग ताठेले व सामाजिक कार्यकर्ते भगवान कोंडलेकर उपस्थित होते.यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या वनवासी भगिनींनी बनविलेल्या बांबूंच्या वस्तूंचे कौतुक केले होते. तसेच रक्षाबंधन सणाच्या वेळी बांबूनिर्मित राख्यांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या वनवासी महिलांचा उत्साह वाढविला होता. याबद्दल आभार मानत यंदाच्या दिवाळीत आदिवासी महिलांनी बनविलेल्या पर्यावरणपूरक, आकर्षक अशा बांबू कंदिलांचा जास्तीत जास्त वापर जनतेने करावा व या महिलांना सन्मानजनक रोजगार मिळवून देण्यात हातभार लावावा, असे आवाहनही केले होते.
 
 
‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणाकरिता पालघर जिल्ह्यातील वनवासी, गरजू महिलांना घरकाम सांभाळून आर्थिक हातभार लाभावा व त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा, या हेतूने ‘विवेक’ या संस्थेने पुढाकार घेत अशा महिलांना बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण देत आहे. त्यांच्याकडून पर्यावरणपूरक बांबू हस्तकलेच्या बहु उपयोगी निरनिराळ्या वस्तू तयार करतात. यामध्ये बांबू हस्तकलेचा समावेश असून प्रशिक्षित महिला २१ प्रकारची आकर्षक उत्पादने तयार करत आहेत.याचाच एक भाग या संस्थेमार्फत स्वदेशी आकाशकंदीलची निर्मिती करण्यात आली आहे. हे आकाशकंदील पूर्णतः स्वदेशी व पर्यावरणपूरक बांबूनिर्मित आहेत. यात पाच प्रकारचे आकाशकंदील बनविण्यात आले आहेत. यात ‘गुरू’ आकाशकंदील, ‘शुक्र’ आकाशकंदील, ‘सप्तर्षी’ आकाशकंदील, ‘ध्रुव’ आकाशकंदील यांचा समावेश आहे. हे कंदील सर्व प्रकारच्या रंगांमध्ये बनविण्यात आले आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@