अर्थसंकटातून सुटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2020
Total Views |

Indian PMI_1  H
 
 
‘पीएमआय’ची वाढलेली आकडेवारी, एक लाख कोटींपेक्षा अधिकची जीएसटी वसुली, परकीय चलनसाठ्यातील विक्रमी वाढ आणि वाहन विक्रीतील वृद्धीमुळे भारताची कोरोनाच्या अर्थसंकटातून सुटका झाल्याचे दिसते. अर्थातच त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांची पराकाष्ठा होतीच, त्याशिवाय हे होते ना!
 
 
मागील आठ महिन्यांपासून घट्ट झालेला कोरोनाचा विळखा सैल होताना दिसत असून यामुळे अर्थव्यवस्थाही रुळावर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘जान हैं तो जहान हैं’ आणि ‘जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं’ या संदेशाच्या दरम्यान भारताने कोरोना काळातून मार्गक्रमणा केली. महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे अर्थव्यवस्थेचे चक्र ठप्प पडले आणि एक मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली. पण, सरकारनेही जनतेची काळजी घेत घेतच उद्योग-व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली व आता त्याचेच सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यात नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत योजना’, ‘व्होकल फॉर लोकल’ या नाऱ्याचाही महत्त्वाचा सहभाग आहेच. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळेच देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आता तर देशातील निर्मिती क्षेत्रानंतर सेवा क्षेत्रानेही वेग घेतला असून आकडेवारीतूनही ही बाब निदर्शनास येते. सेवा क्षेत्राचा ‘पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स’ (पीएमआय) ऑक्टोबर महिन्यात गेल्या सात महिन्यांत प्रथमच ५४.१ इतका राहिला.
 
 
इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, निर्मिती क्षेत्र असो वा सेवा क्षेत्र त्याच्या ‘पीएमआय’चे मापन न्यू ऑर्डर्स, इन्व्हेन्टरी लेव्हल्स, प्रॉडक्शन, सप्लायर डिलिव्हरीज, एम्प्लॉयमेंट एन्व्हायर्नमेंट या पाच निकषांच्या आधारे केले जाते. तसेच ‘पीएमआय’ ५० पेक्षा अधिक राहिल्यास ही आकडेवारी व्यावसायिक गतिविधींमध्ये वेगाने वाढ होत असल्याचे दाखवते. ‘पीएमआय’ ५० वा ५० पेक्षा कमी राहिल्यास ती आकडेवारी व्यावसायिक गतिविधी ‘जैसे थे’ असल्याचे वा त्यामध्ये घसरण झाल्याचे दाखवते. आता सेवा क्षेत्राचा ‘पीएमआय’ ५० पेक्षाही पुढे असल्याने त्यातून अर्थव्यवस्थेच्या विस्ताराची आशा निर्माण होते. तसेच कोरोनामुळे उत्पन्न झालेल्या बिकट स्थितीतून भरारी घेण्यासाठी भारतीय सेवा क्षेत्र तयार असल्याचेही यातून स्पष्ट होते.
 
 
तत्पूर्वी भारतीय निर्मिती क्षेत्रातही तेजी पाहायला मिळाली व या क्षेत्राचा ‘पीएमआय’ १३ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला. निर्मिती क्षेत्राचा ‘पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स’ ऑक्टोबर महिन्यात वाढून त्याने थेट ५८.९ वर झेप घेतली. त्याआधी ऑक्टोबर २००७ मध्ये निर्मिती क्षेत्राचा ‘पीएमआय’ ५६.८ इतका होता व यंदाचा ‘पीएमआय’ आतापर्यंतच्या विक्रमी पातळीवर आला. निर्मिती क्षेत्रातील ‘पीएमआय’ वाढीचा अर्थ यातील कंपन्यांनी कोरोना व ‘लॉकडाऊन’मधील मंद्यानंतर आपली उत्पादन निर्मिती वेगाने वाढवण्यास सुरुवात केली, असा होतो. कंपन्या आपली उत्पादननिर्मिती बाजारात मागणी असेल तरच मोठ्या प्रमाणावर वाढवू शकतात व सध्या तशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते. त्यात सणासुदीच्या हंगामाचा काही संबंध नसेल, असे नाही, पण यादरम्यानही मागणी वाढत असेल तर ग्राहकांच्या हाती पैसा उपलब्ध झाल्याचे व तो अर्थव्यवस्थेतील चलनवलनामुळेच आल्याचे मान्य करावे लागेल. तसेच अर्थव्यवस्थेचे हे चक्र यापुढेही असेच सुरळीत राहील व सणासुदीनंतरही ते विस्तारेलच.
 
 
दरम्यान, सुरुवातीला निर्मिती क्षेत्र आणि आता सेवा क्षेत्रातील पीएमआय आकडेवारीवरुन देशाची अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे दिसत असतानाच इतरही काही बाबी आहेत, ज्यातून भारत कोरोनाच्या अर्थसंकटातून बाहेर पडत असल्याचे समजते. त्यातील पहिली बाब म्हणजे, एक लाख कोटींपेक्षा अधिक झालेली जीएसटी वसुली. ऑक्टोबर महिन्यामध्ये वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी आठ महिन्यांनंतर पुन्हा एकदा एक लाख कोटींपेक्षा जास्त जमा झाला. त्याआधी यंदाच्याच फेब्रुवारीमध्ये जीएसटी वसुली एक लाख कोटींपलीकडे झाली होती. पण, नंतर कोरोनाचे संकट आणि ‘लॉकडाऊन’मुळे त्यात कमालीची घट झाली. आता मात्र, गेल्या वर्षी याच कालावधीत जमा झालेल्या जीएसटीपेक्षाही यंदाचा जीएसटी अधिक म्हणजे १ लाख ५ हजार १५५ कोटी इतका झाला. दुसरी बाब म्हणजे, परकीय चलनसाठ्यात होत असलेली विक्रमी वाढ. देशाच्या परकीय चलनसाठ्यात २३ ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्याच ५.४१२ अब्ज डॉलर्सची भर पडली व तो ५६०.५३२ अब्ज डॉलर्स इतका झाला. हा परकीय चलनसाठा आतापर्यंतच्या सर्वाधिक उच्चांकी पातळीवर असून याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे.
 
 
कोरोना व ‘लॉकडाऊन’चा सर्वाधिक फटका वाहन उद्योग क्षेत्राला बसल्याचे त्यातील विशेषज्ज्ञांचे मत आहे. कारण, त्याआधीपासूनच वाहन उद्योग क्षेत्रात मोठी घसरण झाली होती व त्या क्षेत्राला सावरण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी विभागातील वाहनांच्या खरेदीला परवानगी दिली होती. पण, कोरोनामुळे मार्च-एप्रिलपासून वाहन उद्योग क्षेत्राच्या वाढीसमोर पुन्हा एकदा अडथळा निर्माण झाला. मात्र, ऑक्टोबर महिन्यात वाहन विक्रीनेही वेग घेतला व त्यात मोठी वाढ झाली. काही कंपन्यांच्या चारचाकी व दुचाकी वाहनांच्या विक्री आकडेवारीकडे पाहिले की त्याची खात्री पटते. ‘मारुती सुझुकी’ने ऑक्टोबरमध्ये १ लाख ८२ हजार ४६८ वाहने विकली व ती गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील विक्रीपेक्षा १९ टक्के अधिक होती. ‘ह्युंदाई’ने ६८ हजार ८३५ वाहनांची ऑक्टोबरमध्ये विक्री केली व गेल्या वर्षीच्या विक्रीपेक्षा त्यात ५ हजार २२५ वाहनांची अधिक भर पडली. दुचाकींमध्ये हीरोने ३५ टक्के वाढीसह आठ लाखांपेक्षा अधिक वाहने विकली, तर ‘बजाज’ने ११ टक्के वृद्धीसह ५ लाख १२ हजार वाहने विकली आणि टीव्हीएसने २४ टक्के वाढीसह ३ लाख ८२ हजार वाहने विकली. अर्थव्यवस्था सुधारत असल्याच्या निदर्शकांतील ही तिसरी महत्त्वाची बाब व याची जाणीव सरकारवर टीका करणाऱ्या राजीव बजाज यांनाही झाली असेलच. एकूणच ‘पीएमआय’ची वाढलेली आकडेवारी, एक लाख कोटींपेक्षा अधिकची जीएसटी वसुली, परकीय चलनसाठ्यातील विक्रमी वाढ आणि वाहन विक्रीतील वृद्धीमुळे भारताची कोरोनाच्या अर्थसंकटातून सुटका झाल्याचे दिसते. अर्थातच त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांची पराकाष्ठा होतीच, त्याशिवाय हे होते ना!
 
 
@@AUTHORINFO_V1@@