भूशास्त्राची व्याप्ती आणि करिअरच्या संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2020
Total Views |

geology_1  H x
 
 
भूशास्त्र हा पृथ्वीचा अभ्यास आहे. या विषयाच्या पारंपरिक स्वरूपानुसार खडक व त्यांची रचना यांचा वापर करून पृथ्वीची रचना, काळाच्या ओघात झालेली तिची उत्क्रांती आणि ती ज्या विविध प्रक्रियांतून गेली त्या प्रक्रिया समजून घेतल्या जातात. या क्षेत्रातील करिअरच्या संधींविषयी थोडक्यात जाणून घेऊया....
भूशास्त्र हे बहुशाखीय विज्ञान आहे आणि ते मूलभूत विज्ञान नाही. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणिताची तत्त्वे वापरून पृथ्वीचा अभ्यास केला जातो. भूशास्त्राचा अभ्यास प्रत्यक्ष क्षेत्रावर तसेच प्रयोगशाळेत दोन्ही ठिकाणी केला जातो. मात्र, यातील संशोधने क्षेत्राधारित निरीक्षणांतूनच आलेली असतात आणि सर्व भूशास्त्रीय संकल्पनांच्या प्रयोगशाळेत चाचण्या घेऊन नैसर्गिक भूशास्त्रीय वैशिष्ट्य स्पष्ट करणे शक्य होते.
 
 
इतिहास, रचना आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि भूगर्भात झालेल्या बदलांचा अभ्यास करून, भूशास्त्रीय घटना व प्रक्रिया पृथ्वीवरील उत्क्रांतीचे नियंत्रण कशा प्रकारे करत आहेत हे भूशास्त्रज्ञ स्पष्ट करू शकतात. भूशास्त्राचा वर्ग खडक आणि क्षार, नमुन्यांचा सूक्ष्म व अतिसूक्ष्म अभ्यास यांपासून सुरू होतो. यातून आपल्याला खडक व क्षारांबद्दल तर कळतेच पण पृथ्वीचा इतिहासही समजत जातो. भूशास्त्र हा केवळ खडक व क्षारांच्या उगमाचा व उत्क्रांतीचा अभ्यास नाही, तर प्राचीन भूतकाळाचे गूढ उकलण्यात हे विज्ञान मदत करते. पॅलेओण्टोलॉजीसारख्या (अश्मीभूत अवशेषांचा अभ्यास) आपल्या रोचक विषयांच्या माध्यमातून भूशास्त्रज्ञांना अनेक नामशेष वनस्पती व प्राण्यांच्या (पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय) उगमाचा व उत्क्रांतीचा अभ्यास करणे शक्य होते. भूशास्त्रामध्ये पर्वत, टेकड्या, दऱ्या, पठारे, नद्या, हिमनग आदी जमिनीच्या अनेक स्वरूपांचा अभ्यास केला जातो. तसेच भूस्खलन, ज्वालामुखी, भूकंप आदी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अनेक घटनांचाही अभ्यास केला जातो.
 
 
एखाद्या भूशास्त्रज्ञाच्या कामाचे महत्त्वपूर्ण भाग म्हणजे प्रकल्पाचे नियोजन, विविध प्रकारची माहिती जमवण्यासाठी क्षेत्र उपक्रम, प्रयोगशाळेवर आधारित माहितीवर प्रक्रिया करणे आणि प्रकल्प/असाईनमेंटचे उद्दिष्ट निष्कर्षाप्रत नेणाऱ्या सर्वसमावेशक अहवालातील अर्थपूर्ण सारांशासाठी त्याचा अन्वयार्थ काढणे. भूशास्त्राच्या उपयोजनाची व्याप्ती मुख्यत्वे असाईनमेंटच्या अर्थात नेमून दिलेल्या कामावर अवलंबून असते.
 
भूशास्त्रातील शैक्षणिक पर्याय
 
भूशास्त्र हा विषय भारतातील अनेक विद्यापीठे/शिक्षणसंस्थांमध्ये शिकवला जातो. विद्यार्थी बी.एससी/बी.एससी ऑनर्ससाठी या विषयाचा पर्याय निवडू शकतात. पदवी प्राप्त केल्यानंतर आयआयटीजसह अनेक संस्थांमध्ये भूशास्त्र/उपयोजित भूशास्त्र विषयांत एम.एससी. करता येते. भौतिकशास्त्रात बी.एससी केलेले विद्यार्थीही उपयोजित भूभौतिकशास्त्रात (अप्लाईड जिओफिजिक्स) एम.एससी./ए.टेक करू शकतात. पदव्युत्तर शिक्षणानंतर विद्यार्थी इंजिनिअरिंग जिओलॉजी, मिनरल एक्स्प्लोरेशन, पेट्रोलियम एक्स्प्लोरेशन, जिओ-इन्व्हॉर्न्मेंटल इंजिनिअरिंग आदी विशेष (स्पेशलाईझ्ड) विषयांमध्ये एम.एससी. (टेक)/ एम.टेक/ एम. फिल करू शकतात. यासाठी ‘गेट’ स्कोअर असणे अनिवार्य आहे. महत्त्वाकांक्षी विद्यार्थी पीएच.डी, डी.एससी आदींसाठी प्रवेश घेऊन संशोधन करू शकतात किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये प्राध्यापक किंवा संशोधक म्हणून काम करू शकतात. भूशास्त्राचा देशभरातील शाळांमधील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक अभ्यासक्रमांत एक विषय म्हणून समावेश व्हावा, यासाठी जीएसआय मनुष्यबळविकास मंत्रालय आणि सीबीएसई/आयसीएसई/राज्य शिक्षण मंडळांसोबत कसून पाठपुरावा करत आहे.
भूशास्त्रविषयक कामासाठी आवश्यक असलेले काही बिगर-शैक्षणिक गुण
> भूशास्त्र’ या विषयाची तीव्र आवड
> काल्पनिक चित्र उभे करण्याची क्षमता
> चांगली वैज्ञानिक/तांत्रिक कौशल्ये
> एक शोधक म्हणून साहसी स्वभाव
> शारीरिक तंदुरुस्ती, स्वयंपूर्णता व उपलब्ध संसाधने कल्पकतेने वापरण्याची क्षमता (रिसोर्सफुलनेस)
> सांख्यिकी तसेच आलेखाच्या स्वरूपातील माहितीचा अन्वयार्थ लावण्याची क्षमता
तपशीलांकडे अवधान पुरवणे
> अहवाल लेखन कौशल्य
क्षेत्रभेटी
भूशास्त्र हा विषय पृथ्वी आणि तिचे निसर्गात दिसणारे गुणधर्म यांच्याशी निगडित असल्याने अध्ययनाची प्रक्रिया माता पृथ्वीच्या सहवासातच सुरू केली जाते. म्हणूनच प्रत्येक पदवी अभ्यासक्रमाचा क्षेत्रीय काम हा अविभाज्य भाग आहे. यामध्ये भूशास्त्रीय माहितीचे संकलन, खडक/क्षारांच्या नमुन्यांचे संकलन, मोजमाप विभाग तयार करणे, भूशास्त्रीय रचना/पोतांचा अर्थ लावणे आणि भूशास्त्रीय मॅपिंगचा समावेश होतो.
भूशास्त्र आणि पर्यावरण
 
पर्यावरणाची स्वच्छता राखण्यात तसेच संवर्धनात भूशास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. कारण, ते पृष्ठभागावरील/उपपृष्ठभागांवरील पाणी, माती यांच्या दर्जाचे मूल्यमापन करतात तसेच नैसर्गिक आपत्ती व त्यांचे परिणाम यांचाही अभ्यास करतात. भूपृष्ठावरील तसेच उपभूपृष्ठांवरील पाण्यातील प्रदूषण, त्यामागील कारणे, स्रोत, मानवी आरोग्यावर होणारा त्याचा परिणाम यांचा अभ्यास करणे तसेच अन्य काही उपाय सुचवले गेले. भूकंप, भूस्खलन, ज्वालामुखी, ग्लेशिअल लेक आऊटबर्स्ट फ्लड (जीएलओएफ) आणि सुनामी यांसारख्या भूशास्त्रीय आपत्तींचे मूल्यमापन भूशास्त्रज्ञ करतात तसेच आपत्ती व्यवस्थापन योजनेत अधिक कार्यक्षमतेने उपाय सुचवतात.
 
भूशास्त्र व इंजिनिअरिंगची सांगड
 
इंजिनिअरिंग प्रकल्पांमध्ये भूशास्त्रज्ञांची भूमिका अपरिहार्य ठरते. पाटबंधारे प्रकल्प, औष्णिक/जल/अणू ऊर्जाप्रकल्प तसेच पूल, बोगदे, रस्ते आदी दळणवळण प्रकल्पांमध्ये इंजिनिअर्स व भूशास्त्रज्ञांना एकत्रितपणे काम करावे लागते. प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरला भूशास्त्राच्या ज्ञानासह सुसज्ज राहणे भाग असते. जिओ टेक्निकल अ‍ॅण्ड जिओ एन्व्हार्न्मेंटल, हायड्रोलिक्स, स्ट्रक्चर आणि ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगमध्ये भूशास्त्रीय सिद्धांतांचे व्यापक उपयोजन दिसून येते. कोणत्याही इमारतीचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी इंजिनिअरला माती किंवा खडकाच्या पायाचे गुणधर्म निश्चित करावे लागतात. बांधकाम स्थिर राहावे, याची काळजी घेण्यासाठी इंजिनिअर्स भूशास्त्रज्ञांसोबत काम करतात आणि बांधकाम स्थळावरील पायाचा प्रकार निश्चित करतात. विकसित देशांमध्ये कोणताही मोठा बांधकाम प्रकल्प सुरू करण्यापूर्वी स्थळाचा भूशास्त्रीय अहवाल सादर करणे सक्तीचे आहे.
 
भूशास्त्रातील विविध संधी
 
भूशास्त्र तुम्हाला कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार करते. संसाधन व्यवस्थापनापासून ते पर्यावरण संरक्षणापर्यंत आणि क्षार व तेल शोधण्यापर्यंत कोणतेही आव्हान या विषयामुळे स्वीकारता येते. कारण, या विषयाच्या अभ्यासाद्वारे अनेक क्षेत्रातील कौशल्ये संपादन केली जातात. याच कारणामुळे भूशास्त्रज्ञ इंजिनिअरिंग आणि कन्सल्टिंग फर्म्समध्ये काम करू शकतो, सरकारी यंत्रणांमध्ये काम करू शकतो. खाणकाम कंपनी, भूजल कंपन्या, पेट्रोलियम कंपन्या, म्युझियम्स आदी ठिकाणीही भूशास्त्रज्ञ काम करू शकतात. ते भूशास्त्र हा वैकल्पिक विषय निवडून प्रशासकीय सेवांच्या परीक्षाही देऊ शकतात. हा विषय अन्य विषयांच्या तुलनेत स्कोअरिंग समजला जातो. अखेरीस फ्रीलान्सिंगमधील संधी तर इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी उपलब्ध आहेतच.
 
भूशास्त्रज्ञांना नोकऱ्या देणाऱ्या संस्था (राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय) पुढीलप्रमाणे:
 
भारतीय भूशास्त्रीय सर्वेक्षण (जीएसआय), केंद्रीय भूजल मंडळ (सीजीडब्ल्यूबी), भूशास्त्र व खाणकाम संचालनालय (डीजीएम), भारतीय खाणकाम कार्यालय (आयबीएम), संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो), राष्ट्रीय भूभौतिकशास्त्र संस्था (एनजीआरआय) आणि इतर अनेक.
 
दुसरी बाजू
 
प्रत्यक्ष क्षेत्रावर भूशास्त्रज्ञ म्हणून काम करताना तुमची शक्य त्या सर्व प्रकारे परीक्षा बघणाऱ्या परिस्थिती निर्माण होतील. प्रकल्पाच्या आवश्यकतांनुसार दुर्गम प्रदेशात काम करण्यासाठी तसेच व्यापक प्रवासासाठी तयार राहा. काही परिस्थितीत तुम्ही डिहायड्रेट होऊ शकता, तुम्हाला दुखापत होऊ शकते. त्यावेळी तुम्ही कदाचित शहरी वस्त्यांपासून दूर असाल, मदत मिळण्याची शक्यता कमी असेल. त्याचप्रमाणे पुरेशा तयारीशिवाय असुरक्षित प्रदेशांत (भूकंपप्रवण, पूरप्रवण) काम करणे धोकादायक ठरू शकेल. क्षेत्रावरील कामादरम्यान येणाऱ्या सर्व संभाव्य समस्यांचा सामना भूशास्त्रज्ञानाला करणे भाग असते. तात्पर्य म्हणजे, तुम्हाला भूशास्त्रज्ञ व्हायचे असेल तर तुम्हाला साहसांची आवड हवी, कामाप्रति कळकळ हवी आणि तुमच्या विषयावर तुमचे प्रेम हवे.
 
- आशिष कुमार नाथ
 
(लेखक ‘भारतीय भूशास्त्रीय सर्वेक्षण’चे संचालक
व जनसंपर्क अधिकारी आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@