‘मुस्लीम सिस्टरहूड’ आहे की नाही?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2020   
Total Views |

arab_1  H x W:
 
 
 
लॉन्जेन अल हतलौल यांचा जगण्याचा हक्क, आरोग्याचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क सुरक्षित आणि कायम ठेवावा, त्याचबरोबर त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याला बाधा आणू नये, असा विनंती वजा इशारा महिला हक्क, संयुक्त राष्ट्र समितीने सौदी अरेबियाच्या प्रशासनाला दिला आहे. तसेच सौदी अरेबियाचा राजा सलमान यांना विनंती केली आहे की, लॉन्जेन अल हतलौल यांची तुरूंगातून मुक्तता करावी, संयुक्त राष्ट्र समितीच्या महिला हक्क समितीला सौदी अरोबियाच्या लॉन्जेन अल हतलौल यांच्याबाबत राजाला का निवेदन केले असेल? तर लॉन्जेन या सौदीच्या तुरूंगात आहेत. तेथील अमानवी वागणुकीविरोधात त्यांनी आमरण उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. गेल्या २६ ऑक्टोबरपासून लॉन्जेन यांनी अन्नत्याग केला आहे. त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, लॉन्जेन यांना तुरूंगात मारहाण होते. लैंगिक शोषण होते. त्याविरोधात त्यांनी ‘ब्र’ही उच्चारू नये, म्हणून त्यांना जीवाची भीती घातली जाते. पण, या सगळ्या त्रासाला, छळाचा निषेध म्हणून लॉन्जेन यांनी तुरूंगात उपोषण सुरू केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लॉन्जेन यांची शारीरिक आणि मानसिक प्रकृती चिंताजनक झाली आहे. याची दखल संयुक्त राष्ट्र महिला हकक समितीने घेतली आहे.
 
 
लॉन्जेन यांच्या बहिणीचे म्हणणे आहे की, लॉन्जेन यांचा अतिशय अमानवी पद्धतीने छळ केला जातो. पुढच्या क्षणी जीवंत असू की नाही, याची शाश्वती लॉन्जेनला नाही. त्यामुळे जिवंत असेपर्यंत अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे, त्यांनी अन्नग्रहण करावे यासाठी आणखी त्रास दिला जात आहे. लॉन्जेन यांनी सांगितले की, तुरूंग प्रशासन आणि अधिकार्यांनी आता लॉन्जेन यांना तुरूंगातून मुक्त करण्यास तयार आहेत. मात्र, त्यासाठी त्यांची अट आहे की, तुरूंगातून बाहेर आल्यावर तुरूंगात झालेल्या छळाबद्दल लॉन्जेन यांनी अवाक्षरही उच्चारायचे नाही. नेमका याच गोष्टीला लॉन्जेनचा विरोध आहे.
 
 
लॉन्जेन यांना अटक का झाली? २०१८ सालापूर्वी सौदी अरेबियामध्ये महिलांना चारचाकी वाहन चालवण्यास मज्जाव होता. पण, ब्रिटिश कौन्सिलमधून पदवीधर असलेल्या लॉन्जेन यांना हा कायदा मान्य नव्हता. पृथ्वीची कक्षा पार करून महिला चंद्र-मंगळावर पोहोचल्या आणि सौदीमध्ये महिलांना स्वतंत्रपणे वाहनही चालवायला परवानगी नाही. या स्त्रियांना माणूस म्हणून समजणाऱ्या नियमाविरोधात २०१४ साली पहिल्यांदा लॉन्जेनने आवाज उठवला. सगळ्या नियमांचे उल्लंघन त्यांनी केले. संयुक्त अरब अमिराती (युएई) मधून त्या स्वत: गाडी चालवत सौदीच्या सीमेवर आल्या. मात्र, त्यांना सौदीच्या सीमेवरच तत्काळ अटक झाली. तब्बल ७४ दिवसांचा तुरूंगवास झाला. पुढे त्यांनी याबाबतचा लढा आणि जागृती सुरूच ठेवली. २०१६ मध्ये महिलांना वाहन चालवण्याचा हक्क द्यावा, असे नमूद केलेले आणि १४ हजार सौदी महिलांच्या सह्या असलेले पत्र त्यांनी सौदीच्या राजाला दिले. त्यावर सौदी राजवटीला अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहे, असे त्यांच्यावर आरोप ठेवले गेले. याहून पुढे झाले ते भयंकरच होते. २०१८ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमधूनन लॉन्जेन यांचे अपहरण केले गेले. त्याना पुन्हा सौदीत आणून तुरूंगात डांबले गेले. कारण, काय तर महिलांनाही वाहन चालवण्याचा अधिकार मिळावा म्हणून ती प्रयत्न करत होती. पुढे आठवडाभरातच सौदीच्या राजाने महिलांनी वाहन चालवू नये, हा कायदा रद्द केला. मात्र, लॉन्जेनची तुरूंगातून मुक्तता केली नाही. इतकेच नव्हे, तर त्यांना घटस्फोट द्यावा म्हणून त्यांच्या पतीवरही दबाव टाकला जात आहे. त्रास दिला जात आहे. २०१८ ते २०२० दोन वर्षे. या दोन वर्षांत लॉन्जेनसोबत खूप काही घडले असेल, असे मानवी हक्क कार्यकर्त्यांना वाटते. असो, यावर एकच प्रश्न आहे की, शरिया कायद्याचे समर्थन करणार्यांचे लॉन्जेन यांच्याबद्दल काय म्हणणे आहे, मलालाला भारतातील घडामोडींची चिंता आहे, पण समधर्मीय राष्ट्रातील महिलेच्या मानवी हक्काबद्दल ती काहीच म्हणत नाही. म्यानमार रोहिंग्या किंवा फ्रान्सच्या विरोधात भारतात रस्त्यावर उतरणाऱ्या बांधवांना या सौदीच्या भगिनीबद्दल काहीच वाटत नाही का? ‘मुस्लीम सिस्टरहूड’ आहे की नाही? की ‘मुस्लीम ब्रदरहूड’च असतो?
 
 
@@AUTHORINFO_V1@@