हरीष वर्मा @ ८१

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2020
Total Views |

Harish Verma_1  
 
 
दै.‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांसाठी हा शनिवार एका ज्येष्ठ कलावंताच्या कलाप्रवासाची शिदोरी घेऊन आला आहे. ‘वय अवघे ऐंशी आणि उत्साहाची चिरंजीव विशी’ असंच म्हणावं लागेल. अशा या बहुआयामी, बहुश्रुत आणि बहुगुणी कलाकाराला, चित्रकाराला ‘हरीष वर्मा’ या नावाने ओळखतात...!
 
अभिजात कलेला आणि अभिजात कलाकाराला सृजनाची तहान नेहमीच लागलेली असते. कलेला अर्थातच कलाकाराला वयाची अट नसते. हे अनेकदा सिद्धही झाले आहे. कला ही कुणालाही, कुठेही आणि कधीही बहरते. कलेला ‘सिझन’ वा हंगाम नसतो. बाराही महिने कलासृजन सुरू असते. इच्छाशक्ती, ऊर्जा, सकारात्मकता, चिंतन या चतु:सूत्रांनी कलाप्रज्ञेचं व्यासपीठ निर्माण होतं आणि प्रज्ञावंत कलाकारांना या व्यासपीठावरून त्यांच्या प्रतिभाशक्तीला मूर्त स्वरुपात व्यक्त करण्यासाठी एक माध्यम उपलब्ध होतं, हे सारं कथन करण्याचं प्रयोजनदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. दै.‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांसाठी हा शनिवार एका ज्येष्ठ कलावंताच्या कलाप्रवासाची शिदोरी घेऊन आला आहे. ‘वय अवघे ऐंशी आणि उत्साहाची चिरंजीव विशी’ असंच म्हणावं लागेल. अशा या बहुआयामी, बहुश्रुत आणि बहुगुणी कलाकाराला, चित्रकाराला ‘हरीष वर्मा’ या नावाने ओळखतात...!
 
 
दि. १ सप्टेंबर,१९४० साली जन्मलेले हरीष वर्मा यांनी १ सप्टेंबर, २०२० ला या पृथ्वीतलावरील सहस्रचंद्र दर्शन घेतले. त्यांचा उत्साह पाहता ते फक्त ऐंशी वर्षे पूर्ण करून ८१व्या वर्षात पदार्पण केलेले तरुण चित्रकार आहेत. एवढ्या एका वाक्यातच वाचकांना त्यांच्या कलाप्रवासाचा अंदाज बांधता येईल. प्रा. हरीष वर्मा सर सध्या औरंगाबाद येथे वास्तव्यास असून १९७८ पासून आज दिनांकापर्यंत ‘वर्मा आर्ट स्टुडिओ’ हा कार्यरत आहे. हिंगोली येथील ‘माणिक स्मारक आर्य विद्यालय’ आणि जिल्हा परिषद शाळा येथे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुढे मुंबई येथील त्यावेळच्या जगप्रसिद्ध सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलाशिक्षण पूर्ण केले. त्यांच्या कलाप्रवासाच्या प्रारंभाची ही माहिती संपादित केली नाही, तर एक ग्रंथ निर्माण होईल. म्हणून आपण त्यांच्या ‘स्टुडिओ’विषयी म्हणजे कलाशैलीविषयी माहिती घेऊया. अत्यंत कमीत कमी रेषांच्या लयकारी परंतु गतिमान रेषांद्वारे सुंदर आकार जे आशयगर्भदेखील असतात, असे असंख्य रेखांकन प्रकारचे काम पाहताना वर्मा सरांच्या हाताची अन् बोटांची जादू थक्क करून सोडते. आजच्या कलाविद्यार्थ्यांना सरांचं हे काम फार मार्गदर्शक ठरू शकतं. विद्यार्थ्यांची कलाविषयक मेहनत घेण्याची तयारी सकारात्मक मार्गाने न्यायाची असेल, तर वर्मा सरांसारख्या ज्येष्ठ कला मार्गदर्शकाची गरज आहे, असे वाटते.
 
 
सरांचं वास्तववादी शैलीतील काम हे कॅलेंडर, भित्तिचित्र वा पोस्टर्स अशा माध्यम प्रकारांद्वारे दिसते. त्यांची पेंटिंग्जदेखील या शैलीसाठी वेगळं वैशिष्ट्य घेऊन आलेली आहेत. औरंगाबादच्या उस्मानपुर्‍याच्या एकनाथ रंगमंदिर येथील सात फुटांचे एकनाथांचे तैलचित्र म्हणजे औरंगाबादच्या संत परंपरेतील एक मानाचा कलाबिंदू ठरावे. त्यांचे बाळकडूच इतकं प्रगल्भ आहे त्यांचे, ते नववीत शिकत असताना ‘सीता-स्वयंवर’ या पौराणिक प्रसंग दृश्याला जलरंगात आणि तेही पारदर्शक जलरंगात रंगविलेलं चित्रं पाहिलं की, दलाल-मुळगावकरांच्या शैलीदार रंगचित्रांची आठवण येते. त्यांनी दहावीत असताना राधा-कृष्णाचे चित्र अशाच रंगमाध्यमात रंगविलेले. १९५९ आणि १९६० सालात त्यांनी रंगविलेली ही चित्रे आजही व्यवस्थित रितीने सांभाळून ठेवलेली आहेत. त्यांनी ज्या हुकमतीने आणि अधिकाराने वास्तववादी शैली आणि तंत्राचा उपयोग केला, त्याच क्षमतेने त्यांनी अमूर्त शैलीतीलही काम केले आहे. पेन्सिल माध्यमापासून तर इंकपेन, स्केचपेन, पेस्टल, जलरंग आणि अ‍ॅक्रॅलिक रंग अगदी तैलरंगापर्यंत सर्व प्रकारची रंगमाध्यमे ते अत्यंत सफाईने आणि सहजपणे चित्रविषयाला व्यक्त करण्यासाठी उपयोगात आणतात.
 
 
सरांना जेव्हा फोन केला तेव्हा त्यांच्या बोलण्यात कुठेही परकेपणा आढळला नाही. सुमारे आठ दशकांच्या या साक्षीदाराने अगदी निगर्वीपणे तब्बल पाच तपांचा कला प्रवास एखाद्या ‘सिन्सिअर’ विद्यार्थ्याप्रमाणे सांगितला. अनुभव हा वयोमानानुसार वाढत जातो. परंतु, वयोमानाला तसंच तारूण्यात ठेवून अनुभवदायी व्याप्ती मात्र वाढत वाढत जाते, अशी अवस्था हजारोंतून एखाद्या व्यक्तीच्या बाबतीतच घडते, अशा व्यक्ती चित्रकार हरीष वर्मांच्या रूपाने दिसतात. त्यांनी काही ‘लोगो’- ‘सिम्बॉल’देखील बनवलेले असून आध्यात्मिक विषयांवर त्यांना आलेल्या अनुभूतींवर त्यांनी ऑईल पेस्टल रंगांनी हुकमतीने काम केलेले आहे. त्यांचा हा कलाजीवन प्रवास पुढील अनेक चंद्रदर्शनांचा होवो, अनेक वैविध्यपूर्ण रंगमाध्यमांचा त्यांच्याकडून उत्साहाने शृंगार आणि सौंदर्याविष्कार साजरा होवो ही सदिच्छा...!!
 
- प्रा. गजानन शेपाळ
@@AUTHORINFO_V1@@