वैदिक सणांचे योग रहस्य भाग-३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2020
Total Views |

Hartalika_1  H
 
 
हरितालिका
 
स्त्रियांचा हा अतिशय महत्त्वाचा सण होय. या दिवशी सुवासिनी आणि कुमारिका परड्यांवर गव्हाची रोपे वाढवून गौरीची पूजाअर्चा करून आपापल्या महादेवाला प्रसन्न करीत असतात. ‘हरिता’ म्हणजे ‘पळविली गेलेली’ आणि ‘अलि’ म्हणजे सखी. कोणी कोणाला पळविले आणि का म्हणून? कथा अशी आहे की, हिमालयाची कन्या पार्वती. तिचे महादेवावर प्रथमपासूनच प्रेम होते. परंतु, नारद खट्याळ, त्यांनी हिमालयाच्या मनात भरविले की महादेव भणंग भिकारी. त्याला पार्वतीला देण्यापेक्षा चांगला वैभवसंपन्न असलेल्या भगवान श्रीविष्णूला द्यावी. आपल्या मुलीला चांगले संपन्न स्थळ मिळावे, अशी कोण्या बापाची इच्छा नसते? हिमालयाने नारदाचा सल्ला ऐकला आणि श्रीविष्णूला पार्वतीस देण्याचे ठरविले. पार्वतीला हे पसंत नव्हते. ती पळून गेली आणि हिमालयाच्या गौरीशिखरावर बसून तिने महादेवाला प्रसन्न करण्याकरिता घोर तप आचरले.
 
 
तिने अन्न वर्ज्य करुन व केवळ झाडाची पाने खाऊन आपला उदरनिर्वाह करण्याचे सुरु केले. शेवटी त्या गौरीशिखरावरील एकाही झाडाला पाने राहिली नाहीत. त्यामुळे पार्वतीला तेव्हापासून ‘अपर्णा’ हे नाव प्राप्त झाले. तिची घोर तपस्या पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीचा स्वीकार केला. निष्ठा प्रखर असेल तर इच्छित फलप्राप्ती होतेच. योग्य पती मिळावा म्हणून कुमारिका या दिवशी महादेवाचे पूजन करतात, तर आपल्या महादेवावर आपले प्रेम अधिक गाढ व्हावे म्हणून सौभाग्यवती स्त्रियाही महादेवाचे पूजन या दिवशी करीत असतात. कथेतील योगसाधना अर्थ असा. आपतत्त्वाचे स्वामी शिवशंकर, पार्वती आपतत्त्वाची साधक होती म्हणूनच तिचे स्वाभाविक प्रेम महादेवावर होते. ज्या साधकाचा पिंड आपतत्त्वातील साधनेला अनुरुप असा आहे. त्याने त्याच तत्त्वाची साधना करुन आपले लग्न आपतत्त्वाशी म्हणजे महादेवाशी लावले पाहिजे. परंतु, इतरांना उच्च वाटणार्‍या साधनांकडे म्हणजे आकाश तत्त्वाच्या साधनेकडे धाव घेतल्यास त्याला कोणत्याच तत्वाची साधना न जमून त्याची अवस्था ‘इदंच नास्ति परं न लभ्यते’ अशी होईल. म्हणून साधकाने आपल्याला सहज साध्य असेल, त्याच तत्त्वाचे साधन केले पाहिजे. भगवान श्रीविष्णू वास्तविक आकाश तत्त्वाचे म्हणजे आपतत्त्वापेक्षा उच्च तत्त्वाचे स्वामी. पार्वतीला महादेवाचे प्रेम होते म्हणून महादेवाला प्रसन्न करुन सुखी झाली. भगवंत गीतेत म्हणतात,
 
‘श्रेयान स्वधर्मे विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात। स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:॥’
(श्लो. ३५, अ. ३)
 
ज्या वेळेस गीता लिहिली गेली, त्या काळात सर्व जगतात हिंदू, मुसलमान अथवा ख्रिश्चन आदीधर्म सांप्रदाय अस्तित्वातच नव्हते. मग ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ अन्य म्हणजे व्यक्तिगत पिंडधर्मच मानला पाहिजे. धर्म याचा खरा अर्थ म्हणजे व्यक्तीचा पिंडधर्म होय. आपला पिंडधर्म जरी निम्न श्रेणीतील तत्त्वाचा असला तरी चालेल, साधकाने आपापल्या पिंडधर्मानुसारच आपली प्रगती करावी. परधर्म म्हणजे परपिंडाचा धर्म कितीही उच्च वाटला तरी तो परधर्म त्या साधकाच्या कामाचा नाही. त्यामुळे साधकाला काहीच प्राप्त होणार नाही. स्वतःच्या पिंडधर्माला खाद्य न मिळाल्याने त्याची उपासमार होईल आणि परधर्माची साधना केल्यामुळे व ती परकी असल्यामुळे साधकाच्या पिंडात मुळीच रुजणार नाहीत. एकूण काय तर साधकाची त्यामुळे प्रगती न होता अधोगती होईल. तो कोणत्याच तत्त्वाचा राहणार नाही. स्वधर्म तत्त्व साधनेतील रहस्य समजाविण्याकरीता ही कथा रचून स्त्रियांना हरितालिका पूजा करायला सांगितले आहे. एवढा सखोल अर्थ या हरितालिका सणात भरला आहे. उत्तरेत या सणाला ‘भुजलिया’ असे म्हणतात.
 
गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी
 
भाद्रपद शु. चतुर्थीला गणेशाची स्थापना होते. गणेश ही बुद्धिदेवता. गणेशाला बुद्धिदेवता मानूनसुद्धा त्याला एका पशूचे म्हणजे हत्तीचे मुख का दाखविले आहे? गणेशाचे शरीर ओम्कार स्वरूप आहे. ॐकाराची सोंड म्हणजे गणेशाची सोंड असून ॐकाराचा अकार म्हणजे त्याचे मुख होय. गणेशाचे उदरही विशाल ॐकारच आहे. अशा तर्‍हेने गणेशाच्या व्दारे ॐकार साकारला आहे. म्हणून स्तोत्रात म्हटले आहे.
 
’ॐकार बिंदु संयुक्त, नित्य ध्यायन्ति योगिनः।
कामदं मोक्षदं चैव ॐकाराय नमो नमः॥
 
सर्व मांगल्याचे प्रदानकेंद्र. चतुर्थीला त्या बुद्धिदेवतेची प्राणप्रतिष्ठा होते. दहा दिवस पूजन होते. वैदिक परिपाठ असाच आहे. प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करायची आणि पूजाअर्चा झाली की नियत कालानंतर आपण प्रतिष्ठित केलेल्या प्रतिमेचे विसर्जन करायचे. यातून जीवनाचा एक महान साक्षात्कार आम्हाला होत असतो. आमचीसुद्धा मातृउदरात अशीच प्राणप्रतिष्ठा होत असते आणि नियतकाळ संपल्यावर व नियत कर्म केल्यावर आम्हाला आमच्या देहाचे विसर्जन करावे लागते. त्या विसर्जनाला आम्ही मरण म्हणतो. परंतु, ते मरण नसून पुढील जन्माची सुरुवात असते. दहा दिवस मृण्मय गणेश प्रतिमेला प्राणपणाने पुजल्यामुळे प्रतिमेबद्दलही एक प्रकारची माया उत्पन्न होते आणि गणेशमूर्तीचे विसर्जन करताना जणू काय घरचे एक अत्यंत जवळचे कोणी दूर दूर वर्षभराकरिता तरी जात आहे, अशी धारणा होऊन मनाला अतिवेदना होत असतात. त्या मृण्मय मूर्तीलाही पुढल्या वर्षी आम्ही बोलावतो. परंतु, यातून एकच धडा घ्यायचा असतो. कालिदास रघुवंशात म्हणतात,
 
‘मरणं प्रकृतिः शरिराणाः।
विकृतिः जिवित मुच्चते बुधैः॥’ (रघु. ८/८७)
 
मरणे हीच प्रकृती असून जीवंत राहणे ही विकृती होय. सणोत्सव केवळ मौजेखातर नसतात, तर त्यातून जीवन-मरणाचे संस्कार घ्यायचे असतात आणि मायारहित होऊन अमृतत्व प्राप्त करायचे असते गणेशाच्या प्रतिष्ठापनेतून आणि विसर्जनातून आम्ही आमच्या जीवनाचे सारगर्भ समजत असतो आणि तद्नुसार वागण्याचा प्रयत्न करीत असतो.
 
चतुर्दशीलाच अनंत चतुर्दशी येते. अनंत म्हणजे आकाश तत्त्वापलीकडील अनंत अस्तित्व. मग त्या अनंताचा वर्ण तत्त्व दर्शनाप्रमाणे काळा असायला हवा. गणेशाची यथायोग्य उपासना केल्याने ते अनंतत्व प्राप्त होत असते, हे दाखविण्याकरिताच अनंताचा वर्ण येथे ज्ञानरुप सूर्याचा रक्तवर्ण घेतला असावा. कोणत्याही देवतेची मनोभावे उपासना केल्यास ती पूर्णत्वाकडेच नेते हा सिद्धांत अनंतचतुर्दशीच्या सणातून दर्शविला आहे. भगवंत गीतेत सांगतात, ‘यो यो यां यां तनु भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति। तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्॥’ (श्लोक २१. अ.७) संध्येत सांगितले आहे. ‘सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति।’ अशी सर्वव्यापक निष्ठा ठेवल्यास साधक अनंतात विलीन होतो. (क्रमशः)
 
- योगिराज हरकरे
 

(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
@@AUTHORINFO_V1@@