तरीच श्लाघ्यवाणे। रामदास्य॥

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2020
Total Views |

Samarth Ramdas Swamy_1&nb
 
  
 
संप्रदायात रामोपासनेला अनन्यसाधारण महत्त्व होते. ‘रामदास्य’ अंगीकारल्याने शिष्यांच्या गुणांचा उत्कर्ष होतो. हे ‘रामदास्य श्लाघ्यवाणे’ करण्यासाठी शिष्यांच्या अंगी कोणते गुण असले पाहिजे, हे सांगावे म्हणून स्वामींनी ‘तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य’ हे स्फुट लिहिले.
 
 
समर्थ रामदासांच्या काळी सर्व देशभरात एकंदरीत परमार्थाला आणि उपासनेला अवकळा प्राप्त झाली होती. सगळीकडे भोंदूगिरीला ऊत आला होता. अशावेळी परमार्थ विचाराला पुनरुज्जीवित करुन लोकांचे आध्यात्मिक व पारमार्थिक जीवन उंचावले पाहिजे, असा विचार समर्थांच्या मनात तीर्थाटन काळातच आला. त्यासाठी लोकांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मिळावे, या उद्देशाने संघटना उभारण्याचे महान कार्य आवश्यक होते. तशी संघटना रामदासांनी उभारली यात संशय नाही. तत्कालीन म्लेंच्छांच्या राज्यात परमार्थ साधना व हिंदूंच्या उपासना उघडपणे करणे यावर बंधने होती. तेव्हा संप्रदाय उभारणे आवश्यक होते. संप्रदाय उभारण्याचे ठरल्यावर समर्थांनी सात्विक पातळीवर लोकांना एकत्र आणायला सुरुवात केली. आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शिष्यांंना काही अटी घालून त्यांना संप्रदायात समाविष्ट केले. समर्थ संप्रदायात प्रवेश मिळणे साधे सोपे नव्हते. समर्थ, शिष्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करीत. शिष्यांच्या ठायी काही गुण आणि कला अपेक्षित होत्या. मुख्यत: विवेक, वैराग्य ज्ञानोपासना, ज्ञानार्जन, ग्रंथनिर्मिती, चारित्र्यसंपन्न जीवन हे गुण आणि गायन, तालज्ञान, नृत्य या कला शिष्याच्या ठिकाणी असणे आवश्यक होते. हे आपण ‘रामोपासनेचे प्रयोजन’ या लेखात पाहिले. संप्रदायात रामोपासनेला अनन्यसाधारण महत्त्व होते. ‘रामदास्य’ अंगीकारल्याने शिष्यांच्या गुणांचा उत्कर्ष होतो. हे ‘रामदास्य श्लाघ्यवाणे’ करण्यासाठी शिष्यांच्या अंगी कोणते गुण असले पाहिजे, हे सांगावे म्हणून स्वामींनी ‘तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य’ हे स्फुट लिहिले. त्यातील पहिल्या कडव्याची चर्चा मागील लेखात केली आहे. त्यात ‘रामदास्य’ स्वीकारणार्‍याने काया, वाचा, मनाने रामरुपाशी, रामाच्या गुणांशी समरस झाले पाहिजे, असे सांगितले होते. आता या स्फुट प्रकरणात स्वामी पुढे सांगतात-
 
 
काम क्रोध सांडणे। मद मत्सर दंडणे।
तरीच श्लाघ्यवाणे। रामदास्य॥२॥
 
 
रामाचे दास व्हायचे म्हणजे काम आणि क्रोध हे सोडून दिले पाहिजेत. तथापि, हे विधान विवेकाच्या आधारे समजून घेतले पाहिजे. काम म्हणजे भौतिक इच्छा. या इच्छांना काही अंत नसतो. आज हे मिळाले, तर उद्या आणखी काही हवे असते. मनाची हाव काही संपत नाही. या इच्छा सोडवण्यासाठी वैराग्याचा अभ्यास करावा लागतो. स्वामींच्या मते, संसारी माणसांनी वैराग्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘काम सांडणे’ याचा अर्थ वैराग्याने आपल्या इच्छांना आवर घालणे, असे फार तर म्हणता येईल. आता ‘क्रोध सांडणे’
 
 
म्हणजे काय, याचा विचार करु. क्रोध म्हणजे राग, त्वेष की ज्याने मन अशांत होते. अशांत मन कोणतेही काम धडपणे करु शकत नाही. अतिक्रोधाने माणसाचा रक्तदाब वाढतो, रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम होऊन, त्याचा विचारांवर व कृतीवर ताबा राहत नाही. क्रोधाचा परिणाम भगवद्गीतेत स्पष्ट शब्दांत सांगितला आहे-
 
 
क्रोधाद्भवति संमोह: संमोहात्स्मृति विभ्रम: ।
स्मृतिभ्रंशाद बुद्धिनाशो बुद्धिनाशत्प्रणश्यति॥ (२.६३)
 
 
क्रोधापासून संमोह म्हणजे अविवेक व भ्रमिष्टासारखी अवस्था निर्माण होते. त्यामुळे स्मृती भ्रष्ट होऊन बुद्धी काम करेनाशी होते आणि बुद्धिनाश म्हणजे सर्वस्वाचा नाशच, अशा रीतीने क्रोधाची परिणती सर्वनाशात होते, असे गीतेत सांगितले आहे. म्हणून क्रोध सोडणे हे इष्ट! स्वामी जेव्हा ‘क्रोध सांडणे’ असा शब्दप्रयोग करतात, तेव्हा त्याचा अर्थ क्रोधावर स्वामित्व मिळणे असा घ्यायला हवा. विवेकाने तसा अर्थ घ्यावा लागतो. कारण, व्यवहारात-प्रपंचात आपण क्रोधित व्हायचे नाही असे ठरवले तर ती आपली दुर्बलता समजली जाईल. क्रोध पूर्णपणे सोडला, तर कुणीही तुम्हाला फसवून जाईल. क्रोधावर ताबा मिळवणे म्हणजे जरुरीच्यावेळी क्रोधाच्या आहारी न जाता, त्याचा वापर करणे आणि हवे तेव्हा क्रोधाला दूर करता आले पाहिजे. समर्थांच्या काळात हिंदूंचा छळ करणार्‍या आततायी शत्रूंशी सामना करण्यासाठी क्रोधाची आवश्यकता होती. परंतु, आततायांवरील हा राग लोकहितार्थ असल्याने त्याला ‘क्रोध’ म्हणता येणार नाही. क्रोधाचे प्रदर्शन ही एक कला आहे. ती आत्मसात केल्यास क्रोधाच्या दुष्परिणामांपासून आपण स्वत:ला वाचवू शकतो. बाह्यकारी क्रोध दाखवून आत शांत राहणे, हे ज्याला जमले तो यशस्वी जीवन जगतो. या संदर्भात गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातील एक प्रसंग उद्बोधक ठरतो.
 
 
गोंदवल्याच्या मंदिरातील एक मावशी महाराजांच्या भक्त होत्या. एक दिवस घासलेली भांडी धुण्यावरून मावशीबाईंचे दुसर्‍या एका बाईशी कडाक्याचे भांडण झाले. दोघींनीही एकमेकांना भरपूर शिव्या दिल्या. भांडण आटपल्यावर मावशीबाई मंदिरात महाराजांकडे आल्या व त्यांनी गावातल्या बाईने तिला शिव्या दिल्याची जोरदार तक्रार केली. ते ऐकून महाराज किंचित हसले, पण मावशीबाईंनी ‘त्या बाईला चांगली समज द्या,’ असा आग्रह धरल्याने महाराजांनी तिला बोलावून घेतले. ती आल्यावर महाराजांनी तिला शिव्या देणे सुरु केले. खूप राग आल्यासारखे महाराज दिसू लागले. त्यावेळी नुकतेच आलेले आलेले महाराजांचे शिष्य भाऊसाहेब तेथे हजर होते. त्यांना वाटले की, महाराज खरोखरच खूप संतापले आहेत. महाराजांना शांत करावे या हेतूने भाऊसाहेब महाराजांजवळ गेले आणि त्यांना शांत राहा म्हणून सांगू लागले. तत्क्षणी रागाचा आविर्भाव आणणारे महाराज भाऊसाहेबांकडे वळाले आणि आपला हात गळ्यापाशी नेऊन हळू आवाजात शांतपणे भाऊसाहेबांना म्हणाले, “तुम्ही घाबरु नका. हा राग गळ्याच्या वरचा आहे.” आणि परत त्या बाईकडे वळून पुन्हा तावातावाने बोलू लागले. रागाने अनादर झालेला माणूस क्षणार्धात शांतपणे कसे बोलू शकतो, याचे भाऊसाहेबांना आश्चर्य वाटले. इतरांना हा प्रसंग सांगताना भाऊसाहेब म्हणत, ‘रागावलेला क्षणार्धात शांत होणारा असा माणूस मी कधी जन्मात पाहिला नव्हता!’ या प्रसंगावरुन ‘क्रोध सांडणे’ यातून समर्थांना काय म्हणायचे होते, ते स्पष्ट होते. यापुढे स्वामी ‘मद मत्सर दंडणे’ असे म्हणतात. मद म्हणजे मस्ती. ती एक प्रकारची धुंदी असते. तो कैफ असतो. आपल्या ताकदीला, पैशाचा, ज्ञानाचा, अधिकाराचा कशाचाही मद होऊ शकतो. एक प्रकारे तो अतिअहंकार आहे, ताठा आहे. मत्सर म्हणजे हेवा करणे, तिरस्कार करणे, माणूस जेव्हा, माझ्यापेक्षा दुसरा कोणी मोठा असूच शकत नाही, अशी दृढ कल्पना करतो आणि लोक जेव्हा दुसर्‍याला मोठेपण देतात, अशावेळी माणूस त्याचा द्वेष करु लागतो. तेथे मत्सर उद्भवतो. काही वेळा आपल्याला न आवडणार्‍या माणसाचाही आपण मत्सर करतो. मद आणि मत्सर केव्हा उत्पन्न होतील, हे सांगता येत नाही. त्यासाठी आपण त्यांना अगोदरच शिक्षा म्हणून तडिपार केले पाहिजे, असे स्वामी म्हणतात. ‘रामदास्य’ करण्यासाठी शिष्यांनी ते पाळले पाहिजे.
 
 
वरील विवेचनातील ‘काम’ आणि ‘मद’ या दुर्गुणांचा संबंध काही वेळा कामवासनेशी जोडण्यात येतो. स्वामींचे शिष्य गृहस्थाश्रमीही होते. या विवाहित सदस्यांनीही समाजात वावरताना आपले चारित्र्य सांभाळले पाहिजे. तेव्हा त्यासाठी शिष्यांची विचार करण्याची दिशा कशी असावी, हे स्वामी पुढील कडव्यात सांगत आहेत.
 
 
परस्त्री नपुंसक होणे। परद्रव्य न पोसणे।
तरीच श्लाघ्यवाणे। रामदास्य॥३॥
 
 
यावरुन प्रापंचिक सहस्थाश्रमी शिष्यांनी एकपत्नीव्रत कटाक्षाने पाळले पाहिजे, असा स्वामींचा दंडक होता. परस्त्रीप्रमाणे परद्रव्याचा विचारही मनाला शिवायला नको. संप्रदायातील शिष्यांचे चारित्र्य चोख, निर्मळ आणि पवित्र असले पाहिजे, असा स्वामींचा कटाक्ष होता. असे शिष्यच लोकोद्धाराच्या कामासाठी लायक असतात. नालायक, भ्रष्ट माणसे समुदायाचे तसेच संघटनेचे अपरिमित नुकसान करतात. यासाठी शिष्य निवडताना त्याचे चारित्र्य निर्दोष असले पाहिजे, असा समर्थांचा दंडक होता.
 
 
- सुरेश जाखडी
@@AUTHORINFO_V1@@