पुरंदरचा सुपुत्र ‘ऋतुराज’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2020
Total Views |

Ruturaj Gaikwad_1 &n
 
 
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत उत्तम कामगिरी करत सर्वांची मने जिंकून घेणारा महाराष्ट्रीयन खेळाडू ऋतुराज गायकवाडच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
मुंबई ही क्रिकेटची पंढरी मानली जाते. भारतात क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून मुंबईच्या अनेक खेळाडूंनी देशासाठी खेळून आपले योगदान दिले. अनेक वर्षांपासून क्रिकेटचा वारसा जतन करणाऱ्या मुंबईप्रमाणेच महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंचाही भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचा वाटा राहिला आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातील काही खेळाडूंनीही क्रिकेटचे मैदान गाजवले. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) हंगामात अशाच एका महाराष्ट्राच्या खेळाडूने उत्तम कामगिरी करत जुन्या आठवणी ताज्या केल्या. ऋतुराज गायकवाड या २३ वर्षीय महाराष्ट्राच्या खेळाडूची सध्या क्रिकेटविश्वात सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्याने केलेल्या उत्तम कामगिरीचे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही तोंडभरून कौतुक केल्यानंतर या खेळाडूकडून भविष्यात आणखीन चांगल्या कामगिरीसाठी अपेक्षा उंचावल्या आहेत.
 
 
 
ऋतुराज गायकवाड हा मूळचा पुण्याचा. ऋतुराजचा जन्म दि. ३१ जानेवारी १९९७ रोजी पुणे येथे झाला. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पारगाव हे त्याचे मूळगाव. येथेच त्याने वयाच्या अगदी पाचव्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्याचे वडील ‘डीआरडीओ’मध्ये अधिकारी आहेत, तर त्याची आई शिक्षिका आहे. त्याच्या कुटुंबात कोणत्याही खेळाचा तसा वारसा नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारा ऋतुराज हा पहिलाच सदस्य. पुरंदरमधील हा खेळाडू एके दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू होईल, असा विचारही कुणी स्वप्नात केला नव्हता. मात्र, लहानपणापासून क्रिकेटवेडा असणाऱ्या या ऋतुराजने आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते आपल्या जिद्दीच्या जोरावर पूर्णही केले. आजघडीला आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असले तरी आयपीएलपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास संघर्षपूर्ण राहिला आहे. मुंबई ही क्रिकेटची पंढरी मानली जाते, तर पुणे हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. मुंबईत क्रिकेटच्या सरावासाठी अनेक नामांकित क्लब उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या इतर शहरांत मुंबईच्या तुलनेइतकी क्रिकेट सरावाची साधने उपलब्ध नाहीत. मात्र, या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करत ऋतुराज गायकवाडने आपला क्रिकेट सराव सुरुच ठेवला. पुण्यातील नामांकित क्रिकेट क्लबमध्ये त्याने आपल्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट सरावाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी २००३ साली तो पुण्याच्या नेहरु स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील सामना पाहायला गेला होता. त्यावेळी ब्रेंडन मॅक्युलमला ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध ‘स्कूप शॉट’ खेळताना पाहून ऋतुराज भारावला. मॅक्युलमसारखे ताबडतोब क्रिकेटर होण्याचे त्याने निश्चित केले आणि त्यानंतर वयाच्या ११व्या वर्षी तो पुण्यातील ‘वेंगसरकर क्रिकेट अकादमी’मध्ये दाखल झाला. येथे त्याने उत्तम प्रकारे क्रिकेट सराव करत अनेक सामन्यांमध्ये आपले कौशल्य दाखवले. यामुळे त्याला महाराष्ट्राच्या १४ आणि १६ वर्षांखालील सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यांतील अनेक सामन्यांत त्याने संघाचेही प्रतिनिधित्व केले. यानंतर त्याला रणजी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
 
 
 
‘भारत अ’ संघाकडून खेळताना त्याने ‘श्रीलंका अ’ आणि ‘वेस्ट इंडिज अ’ संघाविरुद्ध खेळताना आठ डावांत एकूण ११२.८३च्या सरासरीने ६७७ धावा केल्या. एवढचे नाही तर या वर्षाच्या सुरुवातीला त्याने न्यूझीलंड दौऱ्यावर ‘भारत अ’ संघाकडून खेळताना तीन एकदिवसीय सामन्यात ५१.३३ च्या सरासरीने १५४ धावा केल्या होत्या. त्याचा २०१८ मध्ये ‘इमर्जिंग एशिया कप’ स्पर्धेसाठी भारतीय संघातही समावेश होता. ऋतुराज देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आतापर्यंत २१ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात ३८.५४च्या सरासरीने चार शतके आणि सहा अर्धशतकांसह १,३४९ धावा केल्या आहेत. तसेच ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ४९च्या सरासरीने ५४ सामन्यांत २,४९९ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने ३३ ‘टी-२०’ सामन्यात ९८५ धावा केल्या आहेत. त्याचे हे कौशल्य पाहून ‘चेन्नई सुपर किंग्ज’ संघाने ऋतुराजला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी दिली. गेली दोन वर्षे ऋतुराज ‘चेन्नई सुपर किंग्स’ संघाचा भाग आहे. पण, त्याला २०१९च्या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, २०२० मध्ये त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्यानेही या संधीचा फायदा घेत त्याचे नाणे खणखणीत वाजवले. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने नुकतेच सलग दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करत ‘चेन्नई सुपर किंग्स’ला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याच्या या शानदार कामगिरीचे ‘चेन्नई’चा कर्णधार एमएस धोनीनेही कौतुक केले. आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या या पुरंदरमधील ऋतुराज गायकवाडला भारतीय संघाकडून खेळण्याची इच्छा आहे. यासाठी पुढील वाटचालीसाठी त्याला ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा...!
- रामचंद्र नाईक
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@