
इतर शाखांपेक्षा औषधनिर्मितीच्या अभ्यासक्रमाला अधिक पसंती
मुंबई: सीईटी परीक्षांचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी चढाओढ सुरु झालेली दिसते. यंदाच्या वर्षी सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने वाढलेली आहे. इतर सगळ्या शाखांपेक्षा विद्यार्थ्यांनी औषधनिर्मितीच्या अभ्यासक्रमाला अर्थात फार्मसी शाखेला अधिक पसंती दिल्याचं दिसत आहे. अभियांत्रिकीप्रमाणेच इतर शाखांसाठी आलेल्या प्रवेश अर्जांपेक्षा फार्मसीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी आलेल्या अर्जांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे.
येणारं युग हे वैद्यकीय क्षेत्राचं असेल असं भाकीत काही अभ्यासकांनी आधीच वर्तवलं होतं. सध्याचं कोरोना महामारीचं सावट पहाता औषध निर्मिती क्षेत्रातच भविष्यात मोठा रोजगार उपलब्ध होईल, असं म्हणायला हरकत नाही. आणि याच दृष्टीने विद्यार्थ्यांचा यंदाच्या वर्षी फार्मसी क्षेत्रातला अभ्यासक्रम निवडण्याकडे जास्त ओढा दिसून येत आहे. एका सर्वेक्षणावरून असे दिसते की, केवळ २५ हजार जागांसाठी तब्बल २ लाख प्रवेश अर्ज आले आहेत.
शनिवारी रात्री उशिरा ह्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांपासूनच ह्या फार्मसीच्या क्षेत्राकडे विद्यार्थी आकर्षित होत आहेत आणि यावर्षी त्यांच्या संखेत आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.