आपला खेळ आपणच खेळायचा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2020
Total Views |

helath_1  H x W
 
 
 
'मी काय धडा घ्यायला पाहिजे', हे शिकणे केव्हाही फायद्याचेच ठरणार. म्हणूनच आयुष्य हे एक कसोटीचे मैदान आहे. आपला खेळ आपण खेळायचा. खेळताना चुकलो तर का व कसे याचा मनात विचार करून दुसऱ्या डावात थोडे जास्त शहाणे व्हायचे. पूर्वीची कार्यक्षमता संपून गेली आहे आणि आपण आता अकार्यक्षम झालो आहोत, या जाणिवेने माणूस हतबल होऊ लागतो. खरेतर हीच ती वेळ असते, जेव्हा आपण स्वत:ला सावरून या दुर्बलतेवर मात मिळवावी लागते, आपले सामर्थ्य वाढवावे लागते, आपला उत्साह वाढवायला लागतो.
 
 
'विफलता' आणि 'नैराश्य' या दोन भावना, हे दोन टप्पे बरेचदा आपल्या आयुष्यात अधूनमधून येतच असतात. आपल्या स्वप्नांपासून वा आपल्या ध्येयापासून आपण दूर राहिलो वा आपल्याला ती प्राप्त झाली नाहीत, तर विफलता आपल्या आयुष्यात डोकावते. आपल्या जीवनात असे अनेक प्रसंग उद्भवतात की, जे आपल्या आवाक्यात नसतात. तसे पाहिले तरी या जगातला कुणीही माणूस असा नाही की, ज्याच्याकडे १०० टक्के सातत्य असेल वा तर्कशास्त्र असेल. म्हणून तर नैतिक मूल्यांकन करण्याची सवय अनेकांना असते आणि त्यांची ही सवय वस्तुनिष्ठ नसते. त्यांच्या नैतिक मूल्यांकनात स्वयंकेंद्रितपणा अधिक असतो. स्वत:ला रुचेल व पटेल अशा पद्धतीने जगण्याचे नियम पुन्हा बदलणाऱ्या लोकांची ही प्रवृत्ती दांभिकच म्हटली पाहिजे. आपण काही चोख माणसे नाहीत. आपल्या स्वत:बद्दल आपले खास मत असते. बऱ्याच लोकांच्या बाबतीत स्वत:बद्दलची महती खूप मोठी असली, तरी खरी समस्या आपण समजावून घ्यायला हवी, ती म्हणजे आपल्याला पटले तरी किंवा पटले नाही, तरी इतरांनी केलेल्या समीक्षेला वा मूल्यांकनाला वास्तवाचे भान असते हे खरे. प्रथम आपण विफल झालो आहोत, आपल्याला वैफल्याने ग्रासले आहे, हेच मुळी लोकांना कळत नाही. त्याचे कारण म्हणजे, मनातला राग व उतावीळपणा. पण, जितक्या लवकर आपण वैफल्याचा प्रतिकार करू, तितक्या लवकर आपण आपल्या नकारात्मक भावनांमधून बाहेर पडू शकतो, यासाठी वैफल्यग्रस्त मन जे संकेत आपल्याला देते, ते ओळखता आले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचा संकेत म्हणजेच, आपण प्रत्येक गोष्टीचा आपल्याला न रुचणाऱ्या वा न पटणाऱ्या गोष्टींचा प्रतिकार करायला लागतो. आपलं सगळं छान चाललेलं असतं. पण, अचानक आपणच काहीतरी अडचणी निर्माण करतो, व्यवस्थित लक्ष घालत नाही. सगळं आलबेल असताना आपलीच गाडी एकाएकी घसरायला लागते. आपल्याला हे सगळं घरंगळताना जाणवत असतं, आपल्याला हेही लक्षात आलेलं असतं की, आपण या विघ्नांतून बाहेर पडू शकतो. पण, काहींना काही कारणांमुळे आपल्याला परिस्थिती नियंत्रणात आणता येत नाही. क्षमता असूनही आपल्या अपेक्षापूर्तीच्या दिशेने आपल्याला पावलं टाकता येत नाही. ही वैफल्याच्या सुरुवातीची खूण आहे. गोष्टी इच्छेनुसार वा अपेक्षेनुसार घडत नाही म्हणून वैफल्य आणि वैफल्य आले आहे म्हणून घडी विस्कटली जाते, असा एक चक्रव्यूह बनतो. त्यामुळे अंतर्मनात स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होऊ लागतो, दुर्बलता जाणवू लागते, मर्यादा जाणवायला लागतात.
 
 
सामाजिक प्रभावाखाली आपण जेव्हा आपली बौद्धिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वायत्तताच गमावतो, तेव्हा ती चिंतेची बाब निश्चितच आहे. कारण, आज ज्या पद्धतीने आपण अनेक गोष्टी घडलेल्या पाहतो, त्यात स्वार्थ आणि लपलेल्या धूर्त गोष्टी अनेक आहेत. किंबहुना, वेळोवेळी पाहतो की, काही गोष्टी पूर्वनियोजित असतात. त्यातून निर्माण होणारे निकाल हे आधीच ठरवलेले असतात. अशावेळी आपली प्रामाणिक निर्णयक्षमता आणि सद्सद्विवेकबुद्धीच समाजाला वाचवू शकते. थोडासा समाज दूर ठेवून आपण व्यक्तिगत विकासाकडे जरी पाहिले, तरी स्वत:ची अस्मिता व अस्तित्वाची जाणीव न ठेवता आपण कुठल्या मार्गाने जावे, हे कसे कोणाला कळेल. आपल्याला आपल्या आयुष्यात मनापासून आणि निष्ठेने काय करायचे आहे, हे समजले तर आयुष्य खरेच सुलभ होईल. समाज तसा अखंड एकसंध असतो, असे म्हणता येत नाही. त्यात कितीतरी मतभिन्नता आहे, राजकारण आहे.
 
 
आपण थोड्या हुशारीने आयुष्यातील अनुभवांकडे पाहिले तर विविधतेत मिळणारा आनंद आपल्याला भावतो. आपण इतर करत असलेल्या गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या, तर नावीन्य आणि सृजनशीलतेचा संतोष मनाला शांत करतो. मला या कसोटीतून काही डावपेच शिकता येतील का? म्हणजेच आपण अपयशी होत चाललो आहे, या गंभीर विचारातून खच्ची होण्यापेक्षा या कसोटीतून 'मी काय धडा घ्यायला पाहिजे', हे शिकणे केव्हाही फायद्याचेच ठरणार. म्हणूनच आयुष्य हे एक कसोटीचे मैदान आहे. आपला खेळ आपण खेळायचा. खेळताना चुकलो तर का व कसे याचा मनात विचार करून दुसऱ्या डावात थोडे जास्त शहाणे व्हायचे. काही छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा एक निर्भेळ आनंद देऊन जातात. या गोष्टी आपल्या मनातून सहज उत्पन्न होतात. कुठलेही अवडंबर त्यात नसते. त्या गोष्टी आपण प्रत्यक्षात केल्या की, मनाला एक निखळ आनंद मिळतो. पूर्वीची कार्यक्षमता संपून गेली आहे आणि आपण आता अकार्यक्षम झालो आहोत, या जाणिवेने माणूस हतबल होऊ लागतो. खरेतर हीच ती वेळ असते, जेव्हा आपण स्वत:ला सावरून या दुर्बलतेवर मात मिळवावी लागते, आपले सामर्थ्य वाढवावे लागते, आपला उत्साह वाढवायला लागतो.थोडक्यात सांगायचे तर आयुष्यातल्या प्रत्येक आव्हानाला शांतपणे सामोरे गेले, तर शेवटी फायदा आपलाच आहे.
- डॉ. शुभांगी पारकर
 
@@AUTHORINFO_V1@@