आला गारठा, करू आरोग्याचा साठा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2020
Total Views |

Health_1  H x W
 
 
 
आज डिसेंबरचा पहिला दिवस. एव्हाना गुलाबी थंडीने अवघ्या महाराष्ट्राला आपल्या कवेत घेतले आहे. तेव्हा, या गारठ्यात आणि खासकरुन या महामारीच्या काळात नेमकी आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे, याविषयी...
 
 
हिवाळा आवडत नाही अशी व्यक्ती जरा दुर्मीळच असते नाही का? हवेत मस्त गारवा असतो, कडकडून भूक लागते, खाऊ ते पचतं, आजार जास्त छळत नाहीत, कामं करायचा शारीरिक आणि मानसिक उत्साह वाढलेला असतो. घाम, त्याचा चिकटपणा, दुर्गंधी अशा गोष्टी नसल्याने मन प्रसन्न असतं... और क्या चाहिये? और चाहिये। बहुत कुछ चाहिये।
 
 
‘मेळविती तितुके भक्षति, ते कठीण काळी मरोनी जाती।’ असं समर्थांनी म्हणून ठेवलंय. ते हिवाळ्यात आठवायचं असतं. निसर्गदत्त आरोग्यपूर्ण काळाचा लाभ घेताना, जी व्यक्ती पुढचा काहीच विचार करणार नाही, पुढील काळासाठी ‘आरोग्याचा बँक बॅलन्स’ वाढवणार नाही, पुढे येणाऱ्या वैद्याचे नातेवाईक म्हणून वर्णन केलेय - वसंत-शरद या ऋतूंच्या प्रतिकारासाठी सज्ज होणार नाही, अशा व्यक्तीला साक्षात अश्विनीकुमारदेखील कसे बरे करू शकणार? त्यात यावेळच्या हिवाळ्यात कोविडची भर आहे. त्याचा भर ओसरलेला दिसत असला तरी तो दबा धरून बसला आहे. काहींना तर होऊन गेला आहे. एकदा कोविड झाला की, त्याचे परिणाम काही काळापर्यंत दिसत राहतात, असं आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे काळजी घ्यायलाच हवी.
 
 
पण, समाजात काय दिसतंय? प्रत्येक शहराच्या बाजारातील बेसुमार गर्दीचे फोटो काय सांगतात? एकूणच आजच्या समाजाची मानसिकता (युवकांची तर जास्तच) बेफिकिरीची झाली आहे. ‘तू इतक्या अनारोग्यकर गोष्टी करतेस, करतोस, याचे पुढे किती गंभीर परिणाम होऊ शकतात माहीत आहे का?’ असं कुठल्याही युवकाला-युवतीला विचारलं की, त्यांचं उत्तर ठरलेलं असतं- ‘इतक्या दूरचं कुणी बघितलंय?’ वयाच्या नव्वदीत कदाचित शोभू शकेल असं हे विधान जेव्हा १६-१८ वर्षांचे विद्यार्थी करतात, तेव्हा त्यांच्या भवितव्याविषयी काळजात काळजीचा एक घणाघाती ठोका पडतो. निसर्गाने थंडीच्या आणि युवावस्थेच्या निमित्ताने विनासायास दिलेले हे आरोग्यरुपी धन घेताना, ‘उतू नये, मातू नये’ हे त्यांना कोण सांगणार?
 
 
हवेतल्या थंडीमुळं या ऋतूत सगळ्यात जास्त इच्छा होते ती उष्णतेची. गरम अन्न, गरम कपडे, गरम पेयं, शेकोटी, अंघोळीला गरम पाणी... कशात हयगय नाही करायची. थंडीमध्ये दुलई लपेटून उशिरापर्यंत झोपून राहणं खूप जणांना आवडतं. तसंही आवडीनं आणि स्वखुशीनं लवकर उठणारे लोक विराळेच! पण, या ऋतूत आळस झटकून लवकर उठायला हवं. एकदा उठलं आणि कामाला लागलं की आळस, थंडी कुठल्याकुठे पळून जातात. एरवी उष्ण ऋतूत आपण टाळतो ते अभ्यंग, उद्वर्तन, व्यायाम या ऋतूत अत्यावश्यक असतात. त्यांना पुरेसा वेळ देता यावा म्हणून लवकर उठायलाच हवं. कारण हेच उपक्रम तर ‘आरोग्याचा बँक बॅलन्स’ वाढवायला मदत करतात. बाजारातल्या महागड्या आणि कर्करोग उत्पन्न करू शकणाऱ्या केमिकलयुक्त मॉईश्चरायझरपेक्षा अभ्यंग करणं खूप फायद्याचं आहे. अभ्यंगाचे फायदे त्वचेबरोबर डोळे, इंद्रिये, सांधे यांनादेखील मिळतात. याने म्हातारपण दूर ठेवता येतं. ज्यांना कोविड होऊन गेला आहे, अशक्तपणा कमी झाला असेल तर त्यांनी वैद्यांच्या सल्ल्याने अभ्यंग करावे.
 
 
या ऋतूत व्यायामदेखील अवश्य करावा. व्यायामाने पचनशक्ती आणखी वाढते, शरीर चपळ आणि सुडौल होतं, शरीर हलकं होतं आणि शरीराचं बल वाढतं. शरीराचं बल वाढलं की, रोगप्रतिकारक क्षमता वाढून आजारपणं कमी होतात. आजार झाले नाहीत तर वाढलेलं शरीरबल दीर्घकाळ टिकून राहतं. ते तसं राहिलं की मनोबल, आत्मविश्वास, उत्साह हेदेखील वाढतं. यातून मनुष्याची चिडचिड कमी होते, कार्यक्षमता वाढते. आपल्या मनासारखं झालं नाही, पालकांकडून नकार ऐकावा लागला की, क्षणात प्रचंड चिडून आदळआपट करणाऱ्या आजच्या मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बळ कमी पडतंय हे पालकांच्या लक्षातच येत नाहीये. कारण, ही मुलं व्यायाम करत नाहीत, मैदानी खेळ खेळत नाहीत. त्यांना कुठलाही नकार पचत नाही. कारण, कालांतरानं, आपल्या कष्टानं आपण ते मिळवू शकू, हा आत्मविश्वास त्यांच्यात नसतो. म्हणून नकार ऐकला की ते चिडतात. (मोठे झाल्यावर नकार ऐकून हिंस्त्र होऊ शकतात. एकतर्फी प्रेमात नकार ऐकून होणाऱ्या हल्ल्यांमागे हे शारीरिक- मानसिक अनारोग्य आणि त्यातून आलेला भ्याडपणा हेदेखील एक कारण असतं.) मुलांच्या हिंस्त्र/विकृत मनोवृत्तीची समस्या आपल्याकडे अजून पाश्चात्य देशांच्या इतकी तीव्र नाही. म्हणून आपण वेळीच सावध व्हायला हवं. मुलांचा रोजचा व्यायाम आणि परस्परांबरोबर खेळलेले मैदानी खेळ यात त्यांचं व्यक्तिमत्त्व उजळ बनवण्याची शक्ती आहे.
 
 
शास्त्र तर सांगतं की, या ऋतूत सकाळी उठल्यावर शौचविधीपासून सगळ्याला गरम पाणी वापरावं. (एरवी शास्त्राप्रमाणं- खांद्याखाली गरम तर डोक्यावर गार पाणी घ्यावं.) शास्त्रंच सांगतं म्हटल्यावर आपण कशाला लाजायचं? कसला आलाय नाजूकपणा? बारा महिने गार पाण्यानं अंघोळ करणारे काही शूरवीर असतात. त्यातल्या काहींना सवयीमुळे किंवा नित्य व्यायाम करत असल्याने ते सहन होते. बाकीच्यांनी उगीच तसा अट्टाहास करू नये. विशेषत: लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, गर्भिणी, बाळंतीण, दमा, सांधेदुखी यांचे रुग्ण यांनी या काळात सर्व विधींना खुशाल गरम पाणी वापरावं. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसायलादेखील हरकत नाही. आजकाल परदेशी कंपन्यांच्या ‘डी’ जीवनसत्वाचा आपल्याकडील खप वाढलाय. खरंतर आपल्या देशात १२ महिने सूर्यप्रकाश असतो. त्या फुकटच्या प्रकाशात आपली त्वचा हवं तेवढं ‘डी’ जीवनसत्व निर्माण करू शकते. फक्त त्यासाठी ते कोवळं ऊन अंगावर घ्यायला हवं.
 
 
अंघोळीनंतर उबदार कपडे घालावेत. या काळात बाहेर थंडी असल्याने त्वचेची रंध्रं बंद होतात, शरीरातली उष्णता शरीरातच कोंडली जाते आणि ‘कडक’ भूक लागते. काहीही खाल्लं तरी सहसा त्रास होत नाही. पण म्हणून जंक फूड रुपी कचरा (पावभाजी, दाबेली, वडापाव, बर्गर, केक, बिस्कीट, सॅण्डविच, वेफर्स, चायनीज, आईस्क्रीम, चॉकलेट, नूडल्स याला मी ‘कचरा’ म्हणते. शरीराची वाढ करणं, झीज भरून काढणं, रोगप्रतिकारशक्ती वाढवणं यातलं कुठलंच काम हे पदार्थ करू शकत नाहीत. म्हणून तो कचरा!) पोटात भरला तर तो शरीराचं पोषण करायला काहीच उपयोगी पडणार नाही. म्हणजे भूक आहे, आपण खातोय, पचनदेखील होतंय तरी शरीर-इंद्रियं आणि मन यांचं बल काही वाढत नाही, अशी अवस्था होते. शिवाय या खाल्लेल्या कचऱ्याच्या कृपेने भूक आणि पचनशक्तीदेखील हळूहळू मंदावते. म्हणून हा कचरास्वरूप आहार टाळून या काळात पौष्टिक आणि बलवर्धक असा आहार घेतला पाहिजे.
 
 
म्हणून या काळात उपयुक्त आहार म्हणजे आपला पारंपरिक आहार. न्याहारीला पोहे, उपमा, थालीपीठ, उकड, आंबोळ्या, घावन, शिरा, पराठा, पुऱ्या... जेवणात सगळे गोड, तिखट, मसालेदार पदार्थ... विविध प्रकारचे भात, खिरी, पुरणपोळी, खवापोळी, श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी, रबडी, विविध हलवे, दाक्षिणात्य पदार्थ (हे घरी केलेलं हं); संध्याकाळी भुकेला सुकामेवा, वेगवेगळे लाडू, शंकरपाळे, करंज्या, चिवडा काय हवं ते खाऊ शकतो आपण. आहारात दूध, तूप, लोणी, मसाल्याचे पदार्थ, लसूण, आलं, पुदिना, ओवा यांचा सढळ हातानं वापर केलेला चालतो. विविध चटण्या, नारळ, दाणे, गोड- आंबट- खारट पदार्थ यांच्यावर मनसोक्त ताव मारता येतो. रोजचा आहार गरम आणि ताजाच असला की तो अधिक रुचकर लागतो. हे सगळे पदार्थ शरीर-इंद्रियं आणि मन यांचं बळ वाढवणारे आहेत. मसाल्याच्या पदार्थांचा योग्य वापर केल्यानं ताप, सर्दी, खोकला, दम असे आजार दूर ठेवता येतात. अर्थातच, हे सर्व पदार्थ आपल्या भुकेइतकेच खावे. पोटभर किंवा तडस लागेल इतकं खाऊ नये.
 
 
या ऋतूत रात्र मोठी असते. त्यामुळे सकाळी लवकर भूक लागते. गावाकडे या काळात ‘धुंधुरमास’ पाळतात. सकाळी ७ वाजता लोक चक्क जेवतात. (त्या आधी स्नानादिक सगळं आवरलेलं असतं.) आपल्याकडे जन्मलेले आणि पाश्चात्य शिक्षण इथे लागू करणारे काही आहारतज्ज्ञ, रोज सकाळी उठल्याउठल्या काहीतरी खायचा सल्ला आपल्याला देतात. (एकदा थोडंसं काही खाल्लं, तरी पुढचा एक तास अभ्यंग, व्यायाम, स्नान काही करायला नको. मग ‘उशीर होतो’ या नावाखाली या सगळ्याला सुट्टी दिली जाते.) तो नियम शीत कटिबंधातल्या देशांमध्ये लागू होतो. आपल्याकडे फक्त थंडीत लागू होऊ शकतो. (जगाच्या पाठीवर आपण - उष्ण/शीत/समशीतोष्ण/कोरड्या/ पावसाळी- कुठल्याही भागात राहत असलो, तरी आपला आहार-घर-कपडे-दिनचर्या सगळं काही अमेरिकन लोकांसारखं असायला हवं. कारण, अमेरिकन म्हणजे ‘स्टॅण्डर्ड’ हा विचारच मूर्खपणाचा आहे. त्यात गंमत अशी आहे की अमेरिकन लोक स्वत:च खूप चुकीचं वागतात आणि आपण तसंच वागायचं? आपल्या देशासाठी आपलं शास्त्र आहे ना!
 
 
हा ऋतू विवाहित दाम्पत्यासाठी एक छान पर्वणी आहे. वर्षा तथा ग्रीष्म ऋतूत १५ दिवसांनी, शरद तथा वसंत ऋतूत आठ दिवसांनी विवाहसुखाला (आरोग्यदृष्ट्या हं) परवानगी देणाऱ्या आयुर्वेदानं (यात संहितांप्रमाणे मतमतांतरं आहेत.) हिवाळ्यातील विवाहसुखोपभोग हा मात्र दाम्पत्याच्या इच्छेवर सोडला आहे. त्यांनी दुसरा/तिसरा/चौथा मधुचंद्र साजरा करून, दूर फिरायला जाऊन, गप्पा मारून, थोडं शृंगारिक होऊन नात्याची वीण मजबूत करून घ्यावी. आज छोट्या-छोट्या बाबींसाठी पती-पत्नींना समुपदेशनाची आवश्यकता भासते. इतकं करून कडवटपणा राहतोच. त्या ऐवजी एकमेकांबरोबर ‘वेळ’ घालवल्यानं नातं जास्त निरोगी आणि घट्ट होऊ शकतं. एकूण काय तर हिवाळा हा ‘कमाईचा’ ऋतू आहे. समझनेवाले समझ जायेंगे, ना समझे वो अनाडी हैं।
 
- वैद्य सुचित्रा कुलकर्णी
(लेखिका एम.डी (आयुर्वेद) आणि
बी.ए. (योगशास्त्र) आहेत.
@@AUTHORINFO_V1@@