उम्मीद अभी बाकी हैं...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2020
Total Views |

IND_1  H x W: 0
 
क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आतापर्यंत अनेकदा एकमेकांसमोर उभे ठाकले असून, दोन्ही संघांमधील मालिका अनेकदा वादग्रस्त राहिल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांमध्ये अव्वल स्थानी विराजमान होता. मात्र, या मालिकेच्या नेमक्या काही दिवसांआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नियमांत बदल केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वलस्थानी पोहोचला. नियमांतील बदलांच्या आधारावर ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी विराजमान असला तरी या मालिकेत चांगली कामगिरी करून भारतीय संघ पुन्हा पहिल्या क्रमांकाचा संघ होण्याचा मान मिळवेल, अशी आशा भारतीयांना होती. मात्र, ती फोल ठरली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यंत १४५ सामने झाले असून, यामध्ये ऑस्ट्रेलियाने ७८ वेळा तर भारताने ५२ वेळा विजय मिळविला आहे. या मालिकेतील सामने जिंकून भारत हे विजयाचे अंतर आगामी काळात कमी करेल, अशी आशा भारतीयांना होती. यासाठी भारतीय संघाने प्रयत्नशील राहावे, असाच मतप्रवाह सर्वत्र होता. मात्र, झाले नेमके उलटेच. या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करण्याऐवजी दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे दोन्ही संघातील विजयाचे अंतर हे कमी होण्याऐवजी नेमके वाढले. पूर्वीच्या काळात ऑस्ट्रेलियाचा संघ हा क्रिकेटविश्वातील सर्वात बलवान संघ मानला जायचा. आधीच्या काळात ऑस्ट्रेलियाच्या संघाला नमविणे हे सर्वात कठीण मानले जायचे. त्यामुळे विजयाचे अंतर आधीपासून वाढलेले आहे. परंतु, पूर्वीच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा संघ हा इतका बलाढ्य राहिलेला नसून आता या संघाला नमविण्याची ताकद भारतीय संघात आहे. भारताने अनेक मालिकांमधून हे दाखवूनही दिले आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून तमाम क्रिकेटचाहत्यांना अद्यापही भारत उत्तम कामगिरी करेल, अशी आशा आहे. एकदिवसी मालिका भारताने जरी गमावली असली, तरी भारत आगामी ‘टी-२०’ आणि ‘कसोटी’ सामन्यांच्या मालिकांमध्ये उत्तम कामगिरी करून चाहत्यांचा हा विश्वास तंतोतंत खरा ठरवेल, ही आशा तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींना आहे.
 
 
अक्षरशः खेळ मांडला!
 
 
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर माजी क्रिकेटपटूंसह अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली. केवळ कोहलीच नव्हे, तर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या कार्यक्षमतेवरही समीक्षकांनी आक्षेप घेतला. एकदिवसीय मालिकांमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या भारतीय संघाचा असा लाजिरवाणा पराभव होणे, म्हणजे संघनेतृत्व आणि प्रशिक्षकांच्या भूमिकेत तातडीने बदल करण्याची वेळ आल्याची टीका सर्वत्र होऊ लागली. भारतीय संघाने उत्तम कामगिरीच्या नावावर नुसता खेळ मांडला, असेही मत नोंदवत अनेकांनी तोंडसुख घेतले. मात्र, भारतीय संघामध्ये नेतृत्व आणि प्रशिक्षक बदलाची ‘हीच ती वेळ’ का? याचाही विचार होणे गरजेचे आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ क्रिकेटच्या विश्वात बलवान संघ म्हणून समजले जातात. दोन्ही शक्तिशाली संघ जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात, तेव्हा नक्कीच रंगतदार सामना होणार, अशी आशा जगभरातील क्रिकेट चाहत्यांना असते. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही बलवान संघ एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर रोमांचक मालिका होईल, असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र, दोन्ही संघादरम्यान भारतीय संघाची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवातून भारतीय संघ धडा घेईल आणि त्यानंतर तरी नक्की चांगली कामगिरी करेल, अशी आशा होती. मात्र, दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने तोच कित्ता गिरवला. त्यामुळे चाहत्यांची पार निराशा झाली. ऑस्ट्रेलियातील खेळाडूंनी शतकी खेळी करत मजबूत धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात काही भारतीय खेळाडूंनीही उत्तम कामगिरी केली. मात्र, ९० धावा साकारणारे भारतीय खेळाडू शतकी खेळी साकरण्यात अपयशी ठरले. परिणामी, भारताचा सलग दोन सामन्यांमध्ये पराभव झाला. गोलंदाजांनीही सुरुवातीच्या काळात प्रतिस्पर्धी संघांचे गडी बाद करण्यात यश मिळविले असते तर गोष्ट काही वेगळीच असती. मात्र, सुरुवातीच्या काळात नामवंत गोलंदाजांनीही कमी षट्के गोलंदाजी केल्याने प्रतिस्पर्धी संघांचे फलंदाज चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे कर्णधार आणि प्रशिक्षकांवर पूर्णपणे खापर फोडून चालणार नाही. केवळ एका मालिकेतील कामगिरीमुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांची जबाबदारी काढून घेणे, हे अतिशयोक्तीचे ठरू शकते.
 
 
- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@