हैदराबादमध्ये भाजपचे घराणेशाही आणि निजामी संस्कृतीला आव्हान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2020   
Total Views |

Hyderabad_1  H
 
 
हैदराबादची जनता या महापालिका निवडणुकीत ओवेसी यांच्या एमआयएम आणि तेलंगण राष्ट्र समिती यांच्यात जी ‘छुपी युती’ झाली आहे, त्या युतीस कसा धडा शिकवते ते आता पाहायचे!
 
 
 
 
बृहद हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुका आज, १ डिसेंबर रोजी होत आहेत. या निवडणुकीमध्ये घराणेशाही जोपासणाऱ्या तेलंगण राष्ट्र समिती आणि मुस्लीम इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षांपुढे भारतीय जनता पक्षाने आव्हान उभे केले आहे. हैदराबाद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘रोड शो’ना मतदारांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्यामुळे तेलंगण राष्ट्र समिती आणि एमआयएम या दोन्ही पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हैदराबाद शहरामध्ये अजून निजामशाही अस्तित्वात असल्याच्या थाटात वावरत असलेल्या असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने जोपासलेली ‘निजामी संस्कृती’ नष्ट करण्याचे आणि घराणेशाही नष्ट करून खऱ्या अर्थाने लोकशाही आणण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने हैदराबादच्या जनतेला दिले आहे. हैदराबादमध्ये आज मतदान होत आहे. तेथील जनता कोणाला कौल देते हे लगेचच म्हणजे 4 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. तेलंगण राष्ट्र समिती आणि एमआयएम या पक्षांची ‘छुपी युती’ असल्याचा आरोप भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. ‘छुपी युती’ करून एकमेकांशी ‘इलू इलू’ करणाऱ्या या पक्षांवर अमित शाह यांनी कडाडून टीका केली आहे.
 
 
 
बृहद हैदराबाद महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने आपले राष्ट्रीय पातळीवरील नेते उतरविल्याबद्दल विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. पण, त्या टीकेस अमित शाह यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. गल्लीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंतची प्रत्येक निवडणूक भाजपला तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “तुम्ही, तुमच्या ‘फार्महाऊस’मधून बाहेर पडत नसल्याने आणि तुमच्या सरकारने हैदराबाद शहरातील एकही गल्ली साफ केली नसल्याने आम्ही येथे आलो आहोत,” असे उत्तर अमित शाह यांनी दिले आहे. “या निवडणुकीत मतदारांनी आम्हाला एक संधी द्यावी. आम्ही घराणेशाही राजवट संपुष्टात आणून लोकशाही राजवट आणू. भ्रष्टाचार संपुष्टात आणून सुशासन देऊ. प्रशासनात पारदर्शकता आणू,” असे आश्वासन अमित शाह यांनी मतदारांना दिले आहे. “एकेकाळी ज्या निजामाची पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची इच्छा होती, ती निजामाची संस्कृती भाजपला नष्ट करायची आहे,” असे अमित शाह यांनी आपल्या प्रचारसभेतील भाषणात सांगितले.
 
 
या निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले असता, त्यांच्या ‘रोड शो’ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी, “आपणास काही लोक हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करणार का? असा प्रश्न विचारतात,” याकडे लक्ष वेधले. त्यावर, “का नाही करणार,” असे योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले. “आम्ही, फैजाबादचे अयोध्या केले, अलाहाबादचे प्रयागराज केले. तसेच हैदराबादचे भाग्यनगर का होऊ शकणार नाही,” असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्याने एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचा तिळपापड झाला. अत्यंत मग्रुरीची भाषा वापरून ओवेसी म्हणाले की, “तुमची संपूर्ण पिढी नष्ट झाली, तरी हैदराबादचे नाव हैदराबादच राहील. ही निवडणूक हैदराबाद आणि भाग्यनगर या मुद्द्यावर आहे. आपणास हैदराबाद हवे असेल आणि त्याचे नाव बदलायचे नसेल तर एमआयएम पक्षास मते द्या,” असे भावनिक आवाहनही त्यांनी मतदारांना केले आहे. हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने राष्ट्रीय पातळीवरील नेते उतरविल्याबद्दल त्या पक्षावर टीका करणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने हैदराबादमधून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांमधून पानभर जाहिराती प्रसिद्ध करून, आपण या शहरासाठी किती विविध उपाययोजना केल्या आणि या शहराच्या विकासासाठी ६७, १४९ कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. मतदार या जाहिरातींना भुलतात की, त्या पक्षाने शहरातील मतदारांची जी उपेक्षा केली आहे, त्याबद्दल तेलंगण राष्ट्र समितीस धडा शिकवितात, ते लवकरच दिसून येईल.
 
 
 
हैदराबादमधील निवडणुकीत ओवेसी यांचा पक्षही पूर्ण शक्तीनिशी उतरला आहे. नेहमीच हिंदुविरोधी भूमिका घेण्याची ख्याती असलेल्या या पक्षास आपण अजून निजामी राजवटीत वावरत असल्याचे वाटत आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या धाकट्या भावाने, अकबरुद्दीन ओवेसी याने तर १०० कोटी हिंदूंच्या विरुद्ध २० कोटी मुस्लीम असल्याचे जाहीर वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली होती. राम जन्मस्थानाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, तो स्वीकारायची या पक्षाची तयारी नाही. रझाकारी मानसिकता असलेला हा पक्ष मुस्लीम समाजास आपल्या मागे उभे करण्यात यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. देशात अलीकडे झालेल्या निवडणुका लक्षात घेता, स्थानिक पातळीवरील हा पक्ष राष्ट्रीय पातळीवर येत असल्याचे दिसून येत आहे. तुष्टीकरणाचे राजकारण करून आपले हातपाय पसरत असलेल्या या विषवल्लीस खरे म्हणजे वेळीच उखडून फेकण्याची आवश्यकता आहे. पण, दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत या पक्षाचे पाच आमदार निवडून आले आहेत, तर महाराष्ट्र विधानसभेत या पक्षाचे दोन आमदार आहेत. स्थानिक पातळीवरील हा पक्ष, निवडणूक आयोगाचे निकष लक्षात घेता, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवू शकण्याच्या स्थितीत आहे. सदैव राष्ट्रविरोधी तत्त्वांची पाठराखण करीत असलेल्या ओवेसी यांच्या पक्षास पाठबळ मिळाले आहे ते अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करण्याची नीती अवलंबित असलेल्या काँग्रेससह अन्य पक्षांमुळे! हैदराबाद निवडणुकीच्या निमित्ताने ओवेसी यांचा पक्ष आपला पाया कसा मजबूत करीत आहे, याची कल्पना या माहितीवरून येईल, असो.
 
 
 
हैदराबादची जनता या महापालिका निवडणुकीत ओवेसी यांच्या एमआयएम आणि तेलंगण राष्ट्र समिती यांच्यात जी ‘छुपी युती’ झाली आहे, त्या युतीस कसा धडा शिकवते ते आता पाहायचे! हैदराबादची जनता निजामी राजवटीचे गोडवे गाणाऱ्या पिलावळीच्या मागे उभी राहते, घराणेशाहीच्या मागे उभी राहते की, देशहितास सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या भाजपच्या मागे उभी राहते, ते ४ डिसेंबर रोजी स्पष्ट होईल!
@@AUTHORINFO_V1@@