चहुकडे जिहाद्यांचा धिंगाणा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2020
Total Views |

Austria_1  H x
 
 
 
 
 
येत्या काही दिवसांत ऑस्ट्रियादेखील धर्मांध जिहाद्यांविरोधात कडक कारवाई करायला लागला, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे; अन्यथा धर्मनिरपेक्षता आणि उदारमतवादाच्या धुंदीत आपण आपलाच देश आणि जनतेच्या विध्वंसाला कारण ठरल्याचे ऑस्ट्रियातल्या राज्यकर्त्यांना पाहावे लागेल व तोपर्यंत वेळही टळून गेलेली असेल.
 
 
 
 
इस्लामी कट्टरपंथी जिहाद्यांचा धोका दिवसेंदिवस वाढत असून फ्रान्स व कॅनडानंतर आता त्यांनी ऑस्ट्रियालाही लक्ष्य केले. फ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबराच्या व्यंगचित्रावरुन माथे भडकलेल्या धर्मांध मुस्लिमांनी लागोपाठ हल्ले करत सॅम्युएल पॅटी या शिक्षकाचा आणि चर्चमधील तिघांचा जीव घेतला, तर कॅनडातही चाकूने वार करत दहशतवाद्याने दोघांना ठार केले. त्यानंतर आता ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्येही धर्मांध जिहाद्यांनी एका ज्यू प्रार्थनास्थळासह सुमारे सहा ठिकाणी एकाचवेळी हल्ला करत धिंगाणा घातला. अत्याधुनिक बंदुकांच्या साहाय्याने जिहाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात इथे सातपेक्षा अधिक जण मृत्युमुखी पडले, तर कित्येक लोक गंभीर जखमी झाले. ऑस्ट्रियाच्या पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश मिळवले असून, या प्रकरणाचा आणखी तपासही करण्यात येत आहे. आम्हाला इस्लामी दहशतवादाचा अनुभव आल्याचे ऑस्ट्रियाने झाल्या प्रकारानंतर म्हटले आहे.
 
 
 
दरम्यान, ऑस्ट्रियातील हल्ल्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या व आम्ही झुकणार नाही, असे सांगितले. तसेच ऑस्ट्रियाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचेही ते म्हणाले. अशाच प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्यक्त केल्या आणि कट्टरपंथी जिहादविरोधात एकजुटीची ग्वाही दिली. इथे इमॅन्युएल मॅक्रॉन यांची प्रतिक्रिया महत्त्वाची म्हटली पाहिजे. कारण, फ्रान्सप्रमाणेच ऑस्ट्रियादेखील युरोपीय देश असून इथेही मुस्लीम शरणार्थ्यांची संख्या आहेच. पण, शरणार्थी म्हणून आलेल्यांनी नंतर आसरा देणार्‍या देशावरच उलटण्याचा प्रताप याआधी सर्वच देशात करुन दाखवला. मात्र, मॅक्रॉन यांनी अशा कट्टरपंथीयांविरोधात कठोर कारवाईला सुरुवात केली व त्यातून इतरांनाही अशी कारवाई करण्याची प्रेरणा मिळाली असेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत ऑस्ट्रियादेखील धर्मांध जिहाद्यांविरोधात कडक कारवाई करायला लागला, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे; अन्यथा धर्मनिरपेक्षता आणि उदारमतवादाच्या धुंदीत आपण आपलाच देश आणि जनतेच्या विध्वंसाला कारण ठरल्याचे ऑस्ट्रियातल्या राज्यकर्त्यांना पाहावे लागेल व तोपर्यंत वेळही टळून गेलेली असेल.
 
 
 
ऑस्ट्रियाने कट्टरपंथी इस्लामी दहशतवादाचा अनुभव घेतला, पण युरोपातीलच डेन्मार्क देशाने नुकतीच एक घोषणा करत आपणही जिहादविरोधात एकत्र असल्याचे दाखवून दिले. एरवी आंतरराष्ट्रीय दबाव आणि डाव्या बुद्धिजीवींच्या आक्रोशाने कट्टरपंथाविरोधात ठोस भूमिका घेण्यास कचरणार्‍या युरोपीय देशांनी धर्मांध इस्लामविरोधात आक्रमक कारवाईस प्रारंभ केल्याचेच यावरुन स्पष्ट होते. डेन्मार्कने लवकरच आपण देशातील मशिदींना परदेशातून मिळणार्‍या आर्थिक निधी-देणग्यांवर निर्बंध घालत त्याला गुन्हेगारी कृत्य ठरवणार असल्याचे जाहीर केले. तत्संबंधी एक विधेयकही डेन्मार्कने तयार केले असून लवकरच हे विधेयक मंजूर करुन कट्टरपंथी इस्लामची आर्थिक नस दाबण्यासाठी डेन्मार्क कामाला लागल्याचे दिसेल. तत्पूर्वी एक महिना आधीच डेन्मार्कचे गृहमंत्री मॅटिस टॅसफे यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे, “जी संस्था, व्यक्ती वा राष्ट्र आमच्या लोकशाही मूल्यांचे हनन वा मानवाधिकारांचे उल्लंघन करण्याच्या उद्देशाने मशिदीला दान देईल, त्याला आम्ही तसे करु देणार नाही,” असा इशारा धर्मांध जिहाद्यांना दिला होता. तसेच डेन्मार्कने आणखी एक विधेयक तयार केले असून, त्यानुसार दहशतवादी कारवायांत अडकलेल्या डॅनिश व्यक्तींचा नागरिकत्वाचा अधिकार काढून घेणार असल्याचे सांगितले. एकूणच सध्या इस्लामी कट्टरपंथियांच्या जिहादी कृत्यांमुळे युरोपात धर्मांधांविरोधात तीव्र संतापाची लाट उसळल्याचे दिसते. मात्र, ही फक्त लाट न ठरता अफाट समुद्र व्हावा नि त्यात इस्लामी कट्टरपंथाला कायमची जलसमाधी मिळावी, इतकेच.
 
 
 
युरोपात आजकाल जे घडताना दिसते, ते भारतात गेल्या कित्येक दशकांपासून सुरु असून हाच प्रकार पाकिस्तान व बांगलादेशातही होतो. पाकिस्तानमध्ये तर इस्लामी कट्टरपंथियांनी हिंदूंसह बौद्ध, जैन, शीख, पारशी, ख्रिश्चनांनाही जगणे मुश्किल करुन टाकले आहे. बांगलादेशातही काहीशी तशीच स्थिती असून नुकतीच इथल्या हिंदूंची घरे जाळून टाकण्याचा प्रकारही समोर आला. फ्रान्समधील घटनेनंतर फ्रेंच जनतेला पाठिंबा देणे व मोहम्मद पैगंबराच्या व्यंगचित्राचा बचाव करण्यावरुन कोमिला जिल्ह्यातील कोरबनपूर गावातील दहा हिंदूंची घरे धर्मांध मुस्लिमांनी जाळून टाकली. इथल्या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला असून, त्यात गोल टोप्या घातलेल्या मुस्लिमांचा जमाव हिंदूंच्या घरांची तोडफोड करताना, आगी लावताना पाहायला मिळते. पोलिसांनीसुद्धा कट्टरपंथी मुस्लिमांवर कारवाई करण्याऐवजी हिंदू व्यक्तींनाच ईशनिंदेच्या गुन्ह्याखाली अटक केली असल्याचे म्हटले जात आहे.
 
 
 
वरील सर्वच घटनांकडे पाहता, कट्टरपंथी जिहादी इथून तिथून एकसारखेच असल्याचे म्हणता येते. देश, ठिकाण कोणतेही असो, इस्लामी उम्मासाठी एकत्र येऊन कायदा-व्यवस्था व मानवाधिकाराच्या चिंधड्या उडवणेच त्यांच्यासाठी सर्वोच्च कर्तव्य ठरते. फ्रान्स असो वा कॅनडा किंवा ऑस्ट्रिया वा डेन्मार्क या प्रत्येक देशात इस्लामी कट्टरपंथीयांनी उच्छाद मांडला, पण या देशांनी स्वतः अनुभव घेतल्यानंतरच त्याविरोधात काही पावले उचलली ; अन्यथा मागील बरीच दशके भारत याविरोधात बोलत होता, पण तेव्हा कथित धर्मनिरपेक्ष व उदारमतवादी लोक त्यावर बोलणे टाळत होते. तसेच बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय आणि अत्याचाराच्या असहिष्णू प्रकारावरुन नागरिकत्व सुधारणा कायद्याची गरजही पुन्हा अधोरेखित होते. कारण, आपल्याकडे बांगलादेशी मुस्लिमांना आधार कार्ड आणि पासपोर्ट देण्यासाठी एमआयएमसारखा पक्ष राबू शकतो, पण हिंदूंना कायदेशीर मार्गानेच आपला बचाव करता येईल व सीएए कायदा त्यासाठीच आणल्याचे स्पष्ट होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@