मुंबई : मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा मोदी सरकारने केला. त्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. "लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे असा ठाकरे सरकारचा कारभार आहे," असा घणाघात भाजप आमदार आशिष शेलारांनी केला आहे.
"अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र यामुळे मुंबईकरांना त्रास होत आहे. आज ज्या पद्धतीच्या गोष्टी समोर येत आहेत, त्यावेळेलासुद्धा सांगताना आम्ही म्हटले होते. मीठागर आयुक्त सॉल्ट कमिश्नरची परवानगी जागा नावावर करताना घेतली होती का?", असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला. मेट्रोच्या कारशेडवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.