आपलेसे वाटणारे दादा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2020   
Total Views |

Vinayak Patil_1 &nbs
 
 
काही व्यक्ती निवर्तल्याने केवळ शब्द म्हणून नव्हे, तर खर्‍या अर्थाने समाजाचे मोठे नुकसान होत असते. हेच विनायकदादांच्या निधनाने नाशिकरांना जाणवत आहे. त्यांच्याविषयी...
 
 
राजकारणातील व्यक्तिमत्त्वे ही कायमच नाना प्रकारे चर्चेत असतात. त्यातील कोणाचे निधन झाले, तर काही दिवस तो नेता जनतेच्या लक्षातदेखील राहतो. निधनाच्या काही दिवस त्या नेत्यांच्या जवळच्या व्यक्तीला त्यांची पोकळीदेखील जाणवते. मात्र, काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, ते राजकीय व्यक्ती म्हणून नव्हे तर आपलेच अगदी जवळचे वाटतात. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही क्षण जरी ती व्यक्ती हयात असताना सहवासात आली असली तरी, ती गेल्यावर तिची उणीव क्षणोक्षणी भासते. आपले जवळचे कोणीतरी निवर्तले आहे, असेच भाव मनात येतात. अशीच काहीशी अवस्था वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या निधन पश्चात नाशिककरांची झाली आहे. देशात वनशेती, पर्यावरण, सहकार, उद्योग, राजकारण, समाजकारण, साहित्य अशा विविध क्षेत्रांत आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे नुकतेच निधन झाले.
 
 
विनायकदादा पाटील यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व कविवर्य कुसुमाग्रज यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले होते. कोणत्या एका पक्षाचे नेते अशी दादांची कधीही ओळख नव्हती आणि ते गेल्यावर तर हे अधिकच जाणवते. पक्ष कोणताही असो, नेता कोणताही असो, समस्या कोणतीही असो उत्तर एकच असायचे विनायकदादा! वनशेती हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि अभ्यासाचा विषय. त्यामुळे भारतातील सहकारी वनशेतीचे ते खर्‍या अर्थाने जनक ठरले. वनस्पतीच्या तेलापासून डिझेल या इंधनाची निर्मिती होऊ शकते, हा विचार दादांनी खर्‍या अर्थाने पुढे आणला. त्यासाठी ‘जेट्रोफा’ या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर तंत्रशुद्ध शेती त्यांनी १९८६ मध्ये केली होती. या वनस्पतीपासून प्रायोगिक तत्त्वावर डिझेलनिर्मिती करून, त्यांनी तेव्हा जगाचे लक्ष वेधून घेतले होते. विनायकदादा पाटील यांना वनशेतीतील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण आणि ‘वनश्री’ तर भारत सरकारचा ‘इंदिरा प्रियदर्शनी’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ‘फूड अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्स’चा ‘आऊटस्टॅण्डिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया’ तसेच जीनिव्हा येथील ‘रोलेक्स अ‍ॅवॉर्ड’ही त्यांनी पटकावले. हे पुरस्कार मिळवणारे ते पहिले व एकमेव भारतीय होते. यासह विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले होते.
 
 
विनायकदादा पाटील यांचा जीवनप्रवास थक्क करणारा होता. निफाड तालुक्यात कुंदेवाडीचे सरपंच म्हणून त्यांनी राजकारणात श्रीगणेशा केला. त्यानंतर निफाड तालुका पंचायत समिती सभापती, निफाडचे आमदार, विधान परिषद सदस्य अशी भरारी घेत, त्यांनी राज्य मंत्रिमंडळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवकसेवा अशा विविध खात्यांच्या मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सहकार क्षेत्रातही त्यांचा दबदबा राहिला. सहकारी सोसायटीचे चेअरमन, नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राज्यमंत्रिपदाच्या दर्जासह त्यांनी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही भूषविले.त्यांच्या निधनाने शेतकर्‍यांच्या हितासाठी काम करणार्‍या आणि आदराचे स्थान असलेल्या दादांना आपण कायमचे मुकलो असल्याची भावना पदोपदी नाशिककर व्यक्त करताना दिसत आहेत.
 
 
वनात रमणारे आणि वनात राबणार्‍यांसोबत अतूट नाते जपणार्‍या दादांनी ग्रामीण व वनवासी भागातील जनतेला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ते सदैव कार्यरत राहिले. ‘बायफ’ संस्थेच्या माध्यमातून आंबा व काजू लागवड करून सर्वसामान्य व अडाणी माणसाला त्यांनी निर्यातक्षम बनविण्यासाठी केलेले कार्य आजही अनेक शेतकर्‍यांच्या जीवनात समृद्धी फुलवत आहे. अफाट वाचन, शब्द आणि त्याचे अर्थ यांना कायमच महत्त्व देणारे दादा हे महिला सन्मानासाठीदेखील कायम आग्रही असे. नाशिक येथील मविप्र संस्थेच्या शतक महोत्सवाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारताना प्राध्यापकांसाठी सूत्रसंचालनाची कार्यशाळा घेतली, ते प्राध्यापकांचे प्राध्यापक होते. दादांच्या जाण्याने मविप्र समाज संस्था पोरकी झाली असल्याची भावना संस्थादेखील व्यक्त करत आहे.राजकीय क्षेत्रात कार्यरत असणार्‍या व्यक्तीला राजकारण, संख्याबळ, मतदारसंघातील समस्या व त्यावर सत्ताधारी नेत्यांकडून असणार्‍या अपेक्षा किंवा आपण स्वत: करत असलेले कार्य, याबाबत रूढ अर्थाने माहिती असते. मात्र, सर्वच क्षेत्रातील विस्तृत माहिती, त्याची मांडणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समस्येवरील उपाय याबाबत विनायकदादांचा असणारा हातखंडा हा सुपरिचित होता. जिल्ह्याच्या विकासकार्यात कायमच विनायकदादा आदर्शस्थानी होते. स्वभावातील निर्मळता, विचारातील पारदर्शकता हे दादांच्या स्वभावाचे चिरस्थायी वैशिष्ट्य. दादा हे समाजातील प्रत्येक क्षेत्रातील चालते-बोलते शब्दकोश होते. मोजकं व नेमकं बोलणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. ते गेल्याने पितृछत्र हरपल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त केली जात आहे. अशा या दादांच्या मार्गदर्शनाचे नाशिक जिल्ह्यातील अनेकविध संस्थांना कोंदण लाभलेले आहे. काही व्यक्ती गेल्याने केवळ शब्द म्हणून नव्हे, तर खर्‍या अर्थाने समाजाचे मोठे नुकसान होत असते. हेच दादांच्या निधनाने नाशिकरांना जाणवत आहे. त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे आदरांजली.
@@AUTHORINFO_V1@@