'संस्कृत नॉन ट्रान्स्लेटेबल’चे ऑनलाईन प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2020
Total Views |

book_1  H x W:



 
 
काही वर्षांपूर्वी कर्नाटकातील शृंगेरी येथील शंकराचार्य मठ आणि अमेरिकेतील कोलंबिया व़िद्यापीठातील श्री शंकर अध्यासनाचे म्हणजे प्राध्यापक डॉ. शेल्डॉन पोलॉक यांच्यात झालेला वाद अजून जगातील विद्यापीठीय अध्यासने क्षेत्रात गाजत आहे. डॉ. शेल्डॉन पोलॉक हे अमेरिकेतील ‘निओ- ओरिएंटॅलिझम’ चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते. युरोप अमेरिकेत अशी ही चळवळ आहे की, जगातील प्रामुख्याने भारतातील जुनी धर्मपीठे किंवा जुन्या संस्था यांच्यातील काही बाबींचा उदोउदो करून विश्वास मिळवायचा. त्यांच्याकडून मोठमोठी अनुदाने पदरात पाडून त्यांच्याच विषयावर संशोधन करायचे आणि ते देश, त्या संस्था, त्या विचारप्रणाली यांच्या विरोधात लेखन करायचे.



 कोलंबिया विद्यापीठातील श्री शंकर अध्यासनाबाबत असे झाले की, भारतीय महत्त्वाच्या व्यक्ती महर्षी वाल्मिकी, महर्षी व्यास, शंकराचार्य, स्वामी विवेकानंद, कविकुलगुरु कालिदास यांच्या मुद्रा असलेली काही प्रकाशने त्यांनी केली, पण त्यांचे निष्कर्ष असे होते की, संस्कृतमध्ये नवनिर्मितीच्या क्षमतेचा अभाव आहे. ती भाषा समाज विभागणारी आहे. भारतीय जीवनशैली जेथे लोकप्रिय होत चालली आहे, अशा ठिकाणी अशा स्वरुपाचे निष्कर्ष प्रचारित करणारी एक फार मोठी टोळी युरोप, अमेरिकेत आहे. अशाच स्वरुपाचे निष्कर्ष भारतात काढणाऱ्या ज्या संस्था आणि संघटना आहेत, त्यांचेच ते घटक आहेत. त्याचप्रमाणे भारत हा फार काळ एकसंघ राहता नये, अशी भूमिका असणारे युरोपीय आणि अमेरिकी अध्यासन प्राध्यापकांचाही त्यात समावेश आहे.
 

 
हा विषय फक्त फक्त अध्यासनाचे विषय आणि त्यांना मिळणारी अनुदाने एवढ्यापुरता मर्यादित नाही. भारताला भारताचा इतिहासच सापडू नये, भारत विखंडित व्हावा, त्या देशाचे तुकडे पडून अन्य देशांनी वाटून घ्यावे, त्याचप्रमाणे भारताला प्रगती करण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वासच सापडू नये, यासाठी गेल्या २०० वर्षांपासून काही टोळ्या कार्यरत आहेत. त्यांचे हे उपद्व्याप आहेत. याच विषयावर ज्यांनी पाच सहा पुस्तके लिहिली आहेत, असे डॉ. राजीव मल्होत्रा यांनी कोलंबिया विद्यापीठातील अध्यासनातील या प्रकाराचा छडा लावण्याचे ठरविले. त्यासाठी कोलंबिया विद्यापीठातील श्री शंकर अध्यासनाला ४० लाख रुपयांची देणगी दिलेले शृंगेरीपीठाचे शंकराचार्य यांची डॉ. मल्होत्रा यांनी भेट घेतली व अमेरिकेत भारतीयांचा गौरव करण्याच्या नावाखाली संस्कृत व भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याचा उद्योग करणारांचे उद्योग त्यांच्यापुढे मांडले. हा विषय समजून घेणाऱ्यांची एक समिती त्यांनी तयार केली व त्यांनीही तो विषय ऐकून घेतला. त्यांचेही तेच मत झाल्यावर शृंगेरीपीठाने ती मदत थांबविली.
 
 
 
साहजिकच ही मदत थांबवल्यावर त्याच्या बाजूने आणि विरोधात २००-२५० विचारवंतांची पत्रके निघाली आणि काही महिने वादही चालला. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेत राहणारे डाव्या विचारसरणीचे भारतीय विचारवंत असोत किंवा प्रथमपासूनच भारताला ‘सीपॉय’ म्हणजे ‘गुलामांचा देश’ मानणारे पाश्चात्य लोक असोत यांनी भारतीय संकल्पनांबाबत काही ग्रह करून घेतले आहेत. त्याचा परिणाम त्यांनी लिहिलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील लेखनावर तर झाला आहेच, पण भारतीय वाङमयावरही झाला आहे. यात डॉ. पोलाक असोत किंवा अन्य विद्यापीठीय अध्यासनी असोत, निरनिराळ्या ‘डिक्शनरीज’ किंवा एन्साक्लोपीडिया यांनी संस्कृत शब्दांचा अर्थ लावला आहे, तेथूनच या समस्येला आरंभ झाला आहे.



गेली एक हजार वर्षे फारशी न वापरली गेलेली भाषा म्हणून एकदा ‘संस्कृत’ला ‘डेड लँग्वेज’ ठरविले की, त्यातील शब्दाचा अर्थ ठोकळेबाजपणे करायला ते विद्वान तयारच असतात. ‘धर्म’चा अर्थ ‘रिलिजन’ केला की, माणसाला, प्राण्यांना, वनस्पतींना आणि निसर्गालाही धारण करण्याचे आणि पदोपदी उपयोगी पडणारे शास्त्र असा अर्थ काढण्याचा प्रश्नच येत नाही. ‘आत्मा’ याचा अर्थ ’सोल’ असा करून ठेवला ,तर मग आत्मा, परमात्मा किंवा यष्टी, समष्टी, सृष्टी परमेष्टी हे प्रत्येक एकमेकात आहेत आणि स्वतंत्रही आहेत, असा विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा शब्दांचे हवे तसे अर्थ लावण्यातून फक्त चुकीचा अर्थ किंवा चुकीचे विवेचन झाले असे नव्हे तर युरोप ही हजारो वर्षांची महासत्ता आणि अन्य सारे जग म्हणजे ‘सीपॉय’पातळीचे लोक असा अर्थ काढला. या साऱ्या विषयावर प्रकाश पाडणारे डॉ. राजीव मल्होत्रा यांचे ‘संस्कृत नॉन ट्रान्स्लेटेबल’ हे पुस्तक दि. ६ डिसेंबर रोजी रा. स्व. संघाचे सरसंघचालक यांच्या उपस्थितीत ‘ऑनलाईन’ प्रकाशित होत आहे. या कार्यक्रमात स्वामी गोविंददेवगिरी महाराज, संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर त्याचप्रमाणे जगभरातील या विषयातील काही विचारवंत सहभागी होणार आहेत.
 

 
भारतावर ब्रिटिशांची दीडशे वर्षे सत्ता असल्याने भारतीयांना ‘सीपॉय’ मानणारे काही मूठभर लेखक आणि त्यांचे अनुकरण किंवा भाषांतर करून पदव्या आणि नोकऱ्या पदरात पाडून घेणारे भारतीय लेखक, प्राध्यापक ही मंडळी सोडली तर जगातील विद्वान मंडळी कोणताही नवा विचार समजून घेण्याच्या मानसिकतेत असतात. इंग्रजी भाषाही अशीच समृद्ध झालेली आहे. तेराव्या शतकात इंग्रजीमध्ये अवघे सहाशे शब्द होते. पण अन्य भाषातील शब्द आणि संकल्पना घेवूून ती भाषा जगातील बहुतेक भाषांतील संवादाचे माध्यम झाली आहे. ब्रिटिशांनी जसे भारतीयांना ‘सीपॉय’ मानले त्याप्रमाणे अनेक भारतीयांनी स्वत:लाच ‘सीपॉय’ जाहीर केल्याने त्यांचे विषय स्वीकारण्यालाही मर्यादा असे. संस्कृतमध्ये असे काही शब्द आहेत की, त्यांचे इंग्रजीमध्ये व अन्य भाषांमध्ये भाषांतर होऊ शकत नाही. त्या मूळच्या संकल्पनाच समजून घ्याव्या लागतात.



त्याने संस्कृतचा प्रचार होतो असे नाही तर गेल्या एका हजार वर्षाच्या परकीय वर्चस्वामुळे भारतीय संस्कृतीतील अनेक समृद्ध संकल्पना तशाच बाजूला राहिल्या. त्यांचा पुन्हा परिचय करून देणे असा त्या पुस्तकाचा उद्देश आहे. सध्या कोरोनामुळे बरेच कार्यक्रम ऑनलाईन असतात. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आनंद घेता तर येतोच पण शक्य झाले तर काही प्रश्नोत्तरातही सहभागी होता येते. या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात प्रश्नोत्तरेही आहेत. हे कार्यक्रम दि. ६ नोव्हेंबरवर सायंकाळी ५.३० वाजता युट्यूबवर राजीव मल्होत्रा ऑफिशियल, फेसबुकवर राजीव मल्होत्रा डॉट ऑफिशियल आणि इन्स्टाग्रामवर इन्फिनिटी फाऊंडेशन डॉट ऑफिशियल यावर बघता येणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@