‘राष्ट्र सर्वप्रथम’ मानणाऱ्या निशिगंधाताई!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2020   
Total Views |

Nishigandha Mogal_1 
 
 
 

‘राष्ट्र सर्वप्रथम’ असे केवळ न म्हणता तसे आचरण करून आदर्श निर्माण करणे आवश्यक असते. नाशिक येथील रहिवासी आणि विधान परिषदेच्या माजी आमदार निशिगंधाताई मोगल यांनी हे सिद्ध केले आहे. त्यांनी भारतीय सैन्याला स्त्रीधन अर्पण करण्याचा निश्चय केला. मात्र, सैन्य दागिने स्वीकारत नसल्याने दागिन्यांच्या किमतीएवढी रक्कम म्हणजे २० लाख रुपये त्यांनी भारतीय सैन्याच्या सैनिक कल्याण निधीला अर्पण केले आहेत. त्यांचे दातृत्व व त्यांचे एकंदरीत व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्यांच्याशी केलेली खास बातचीत...
 
 
भारतीय सैन्याला मदत करण्यामागच्या आपल्या दातृत्वाच्या प्रेरणेविषयी काय सांगाल?
 
 
आज सैन्य आहे म्हणून आपण सर्व भारतीय सुरक्षित जीवन व्यतीत करत आहोत. आपल्या राज्याला कोणतीही आंतरराष्ट्रीय सीमा लागून नाही. तरीही आपण रात्री शांत झोपत आहोत. चिंताविरहीत जीवन व्यतीत करत आहोत. हे केवळ भारतीय सैन्य आणि पोलीस दल करत असलेल्या अविरत कार्यामुळे शक्य आहे. त्यामुळे मला सैन्य आणि पोलीस या दोन्ही दलाबद्दल नितांत आदर आहे. खरं तर मी जे केले ते स्वयंप्रेरणेने केले. हो मात्र, सोने देण्याचा जो विचार माझा मनात आला, त्यामागे दोन घटना आहेत. पहिली म्हणजे आणीबाणी पश्चात जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा मोहन धारिया यांच्या सभेचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी जनसंघासाठी मदतीचे आवाहन केले होते. तेव्हा सभेत एका महिलेने सोन्याची बांगडी दान केली होती. दुसरी घटना म्हणजे, जेव्हा सुधीर फडके स्वा. सावरकर यांच्या जीवनावर चित्रपट काढत होते, तेव्हा त्यांना अनंत आर्थिक अडचणी आल्या. त्यामुळे तो चित्रपट रखडला होता. तेव्हा एका महिलेने आपले सोन्याचे दागिने देऊ केले होते. अशी घटना माझ्या वाचनात आली होती. एका स्त्रीकडे तिच्या हक्काचे केवळ स्त्रीधन असते. त्यामुळे मी सैन्याला सोन्याचे दागिने देण्याचा निर्णय घेतला होता.
 
 
सैन्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदरभाव हा असतोच. तेव्हा आपल्या आयुष्यातील काही विशेष घटना, प्रसंग अथवा आठवणी, ज्यामुळे सैन्याबद्दलचा हा आदर, विश्वास वृद्घिंगत झाला?
 
 
इंडो- सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या माध्यमातून १९८४ मध्ये मी सोव्हिएत रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. तेथे युद्ध स्मारकास भेट दिली असता, तेथे दिसून आले की, लहान मुले, नवीन लग्न झालेली जोडपी ही आपल्याकडे जसे आपण देवदर्शनाला जातो, तशी युद्ध स्मारकाच्या दर्शनास येत होती. तेथील नागरिकांच्या मनात सैनिकांबद्दल, त्यांच्या बलिदानाबद्दल कमालीचा आदर दिसून आला. तसेच, तिथे एका ठिकाणी रात्रीच्या वेळी एक २० ते २२ वर्षांची महाविद्यालयीन तरुणी गस्त घालत होती. तिला मी ‘तुला भीती वाटत नाही का?’ असे विचारले असता तिने सांगितले की, “सर्व राष्ट्र माझ्या मागे उभे आहे.” म्हणजेच राष्ट्राची सुरक्षा व्यवस्था तिच्या मागे उभी आहे. “तेव्हा मला कसली आली भीती?” असे ती तरुणी म्हणाली. या दोन घटनांनी सैन्याचे कार्य माझ्या मनावर कायमचे कोरले गेले.
 
 
तसेच, भाजपमध्ये काम करत असताना जम्मू- काश्मीर, आसाम प्रश्न खऱ्या अर्थाने समजले. काश्मीरचा अभ्यास केल्यावर तेथे असणारे सैनिक कोणत्या स्थितीत आपले जीवनमान व्यतीत करत आहे, हे उमगले. देशाची फाळणी झाल्यावार पाकिस्तानने जो भारतावर हल्ला केला, तो आपल्या सैनिकांनी परतवून लावला. पाकिस्तानवर विजय मिळविला, तेव्हा तो विजय साजरा करण्याऐवजी पं. नेहरू यांनी तो प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेला. त्यामुळेच कारगिलसारखे युद्ध पुन्हा घडले. कारगिल युद्धाच्या वेळी मी विधान परिषद आमदार व महिला मोर्चाची अध्यक्ष होते. तेव्हा कारगिल युद्धाची माहिती देणारी व्याख्याने आम्ही आयोजित केली होती. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी कारगिल विजयोत्सव साजरा केला. कारगिल विजय दिनाच्या दिवशी कारगिल येथे भेट दिली असता, भौगोलिक परिस्थिती, खडतर हवामान यात आपले सैनिक देशाची सुरक्षा करत आहे, हे पाहिले. त्यामुळे सैनिकांबद्दल आदरभाव अधिकच वाढत गेला.
 
 
सैन्याला आर्थिक स्वरुपात मदत करण्यामागची आपली भूमिका काय होती?
 
 
भारतात तिन्ही सुरक्षा दले मिळून लाखोंच्या संख्येत सैनिक आहेत. त्यांच्या केवळ जेवणाचा खर्च जरी आपण डोळ्यांसमोर आणला, तरी तो किती जास्त आहे, याची आपल्याला कल्पना येईल. इतर खर्च आहेत, ते वेगळेच. सैन्याच्या खर्चाचा भार सरकारवर आहे. सरकार तो खर्च करतही आहे. मात्र, नागरिक म्हणून आपणदेखील काही देणे लागतो. देशाने आपल्याला जे जे म्हणून का दिले, ते आपण घेतच असतो. त्यामुळे देशाचे आपण देणे लागत नाही का?
 
 
माझे स्पष्ट मत आहे की, केवळ युद्धाच्या वेळी आपण सैनिकांना लक्षात घेतो हे चुकीचे आहे. मी जो निधी दिला आहे, तो सैनिक कल्याण निधी आहे. वीरपत्नी, हुतात्मा सैनिकांची मुले, अपंगत्व आलेले सैनिक यांच्यासाठी हा निधी खर्ची होणार आहे. सरकार आपले काम करत असतेच. मात्र, आपण थोडा हातभार लावला तर, सरकारलादेखील आणखी सुविधा देणे शक्य होईल. आयुष्यभर आपली सुरक्षा करणाऱ्या सैनिकांना माझ्या आयुष्याच्या संध्याकाळी थोडीफार मदत करणे मला आवश्यक वाटले.
 
 
आर्थिक साहाय्याव्यतिरिक्त सैन्याला अजून कोणत्या स्वरुपात मदतीची गरज आहे, असे आपल्याला वाटते?
 
 
सैन्याला प्रेमाची, आपुलकीची आणि मायेचीही तितकीच गरज आहे. दया म्हणून नाही, तर ते गाजवत असलेले शौर्य म्हणून त्यांना याची गरज आहे. सैनिकांना आपण भारतीयांनी ‘सर्व देश तुमच्या पाठीशी आहे,’ असा विश्वास देणे आवश्यक आहे. त्यांचे आत्मबळ आपण वाढविणे आवश्यक आहे. घरातील लोक जेव्हा कौतुक करतात, तेव्हा माणसाला नक्कीच उभारी येते. तसाच हा प्रकार.
 
 
आपल्या या मदतकार्याला सैन्याकडून कसा प्रतिसाद लाभला?
 
 
सैनिक कल्याण निधीला मदत करावयाची आहे, याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यामार्फत सैन्याला दिली. त्यानंतर सैन्याने आपण सोने स्वीकारत नसल्याचे सांगितले. म्हणून मग त्या किमतीची रोख मदत करण्याचे ठरविले. सैन्याने खाते क्रमांक दिला. त्यात आम्ही पैसे जमा केले. याबद्दल नाशिकमधील माजी सैनिक संघटनेने भेट घेत कृतज्ञता व्यक्त केली.
 
 
दानाला हिंदू संस्कृतीत फार पूर्वीपासूनच अनन्यासाधारण महत्त्व आहे. त्याविषयी आपण काय सांगाल?
 
 
अगदी बरोबर. मी देखील यापूर्वी भरपूर श्रमदान केले आहे. विविध संस्थांना विनाअट आर्थिक मदत केली आहे. मात्र, हिंदू संस्कृतीनुसार दान सांगायचे नसते, त्यामुळे दान केले म्हणजेच कर्तव्य पार पाडले, हीच आमची भावना आहे. कोरोना काळात पंतप्रधानांनीदेखील मदत केली आहे. दान देताना मदतीचा विश्वास असणे आवश्यक आहे. तसेच आरोग्य आणि सुरक्षा यांना महत्त्व दिले. दान सत्पात्री असावे म्हणून सैनिक कल्याण निधीला मदत केली.
 
 
लोकप्रतिनिधी कसा असावा, असे आपले मत आहे?
 
 
 
लोकप्रतिनिधी हा खऱ्या अर्थाने लोकांचा प्रतिनिधीच असावा. लोकप्रतिनिधीला प्राप्त होणारे अधिकार हे जनसेवेसाठी आहेत. स्वतःच्या पिढ्या समृद्ध करण्यासाठी नाहीत. याचे भान त्यांनी राखणे आवश्यक आहे. मी जेव्हा आमदार होते, तेव्हा माझ्या एका चिठ्ठीने काम होत असे. आता मी आमदार नाही, तेव्हा माझ्या चिठ्ठीने आता काम होईलच, असे नाही. तेव्हा मी सेवा केली याचे मला समाधान आहे. आता ज्यांच्या हातात अधिकार आहेत, त्यांनी देखील जनसेवेचे काम करावे. जनतेचे नाव घेत काही लोकप्रतिनिधी स्वतःचीच सेवा करून घेतात, जे अत्यंत चुकीचे आहे.
 
 
लोकप्रतिनिधींची कर्तव्य आणि जबाबदारी याविषयी काय सांगाल?
 
 
यात दोन भाग आहेत. स्थानिक व राष्ट्रीय प्रश्न. स्थानिक प्रश्न हे एकटा एक लोकप्रतिनिधी सोडवू शकतो. त्यासाठी त्यांनी अभ्यास कारणे आवश्यक आहे. आपल्या जिल्ह्याच्या सीमा, तेथील व्यापार, आर्थिक स्त्रोत, उद्योग, नागरिकांचे राहणीमान त्यांचा गरजा अशा सर्वच बाबतीत त्यांनी अभ्यास करावा. जे राष्ट्रीय मोठे प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी शासनकर्त्या पक्षाने सामूहिक कार्यक्रम घेणे आवश्यक आहे. जसे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यावे, ही संकल्पना मांडली. अशा संघटित प्रयत्नांची आज नितांत गरज आहे.
 
 
नागरिकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ओळखून वागण्यासाठी त्यांना काय संदेश द्याल?
 
 
आपण देशाकडून आयुष्यभर सर्वकाही घेत असतो. नागरिक म्हणून आपण कायम हक्कांना महत्त्व देत असतो. मात्र, आपण कर्तव्य विसरत जातो. आपली संस्कृती कर्तव्यावर आधारित आहे. हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण आधी लाभ पाहतो, ही सवय सोडावी. फुकट काही घेऊ नये, सर्वकाही कष्टाने कमवावे. देशासाठी नि:स्वार्थ भावनेने नागरिक व लोकप्रतिनिधी यांनी कार्य करावे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@