कथा भोस्ते वाडीच्या पुनर्बांधणीची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2020
Total Views |

bhoste wadi_1  
 
 
 
 
आज कोरोना महामारीने जगभर हैदोस घातला आहे. सगळे व्यवहार महिनोन्महिने ठप्प राहण्याची माणसाच्या अनुभवातली ही पहिलीच घटना असावी. त्यात महाराष्ट्रात अजून एका महाभयंकर संकटाची भर येऊन पडली. ते संकट म्हणजे ३ जूनला आलेले ‘निसर्ग’ नावाचे वादळ. या वादळाने तर कोकण किनारपट्टीवर हाहाकार माजवला. घरे, बागा, शेती सगळ्याचेच ‘न भूतो न भविष्यति’असे म्हणावे इतके नुकसान झाले. प्रचंड असे महावृक्षही या वादळापुढे जिथे टिकाव धरू शकले नाहीत तिथे आमच्या आदिवासी वस्त्यांतली छोटीछोटी कच्चीपक्की घरे कोलमडून पडली, उखडली गेली तर नवल ते काय?
 
 
पण हार जाईल तो मनुष्यप्राणी कसला? आमच्या विविध संघटना एकमेकांना आधार देत-घेत कामाला लागल्या. कितीतरी प्रकारची मदत लागत होती आणि ती मिळूही लागली. अगदी वादळाने झालेला कचरा साफ करण्यापासून ते निर्वासितांच्या भोजन-निवासाची व्यवस्था करण्यापर्यंत सगळी कामे पहिल्या टप्प्यात लोकांनी पार पाडली. अनेक आदिवासी वाड्यापाड्या पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्या आहेत हे जनकल्याण समिती, संघ, वनवासी कल्याण आश्रम अशा संघटनांच्या कार्यकर्त्यांना दिसत होते. आपण एकेक काम हातात घेऊन होईल तितके जास्तीत जास्त उत्तम प्रकारे पुरे करत जाऊ असा निर्णय झाला. त्यानुसार रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते वाडीच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव समोर आला. अंधेरीच्या प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्टने आर्थिक जबाबदारी स्वीकारली. नरेशजी पडिया यांनी स्वतः पुढाकार घेऊन कामाला सुरुवात केली. त्यामुळे वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांना खूपच हुरूप आला. भोस्त्याची ही वस्ती परत उभारायची योजना तयार झाली. गवंडी आणले. गावकरी म्हणाले, ‘तुम्ही इतकी मदत करता आहात तर आमची घरं आम्हीच बांधू. मजुरीचा खर्च वाचवू. तुम्ही सामानाची व्यवस्था करा’. आणि हां हां म्हणता गाव परत डौलदारपणे उभेही राहिले की!
 
 
दि. १ नोव्हेंबर रोजी या १६ घरांचा हस्तांतरण कार्यक्रम पार पडला. बायाबापड्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पुरूष कौतुकाने, स्वाभिमानाने या नव्या-कोर्‍या वस्तीत वावरत होते. येणार्‍या अभ्यागतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करत होते. सार्‍यांचा मिळून एकच गृहप्रवेश झाला. त्याचा पेढाही मिळाला. दोन-चार लाभार्थी महिलांशी बोलण्याची संधी मला मिळाली. त्या म्हणाल्या, इतकं सुंदर आणि मजबूत घर आम्ही स्वप्नातही पाहिले नव्हते. प्रतिबिंबचे पडियाजीही आश्चर्यचकित झाले होते; कारण इतक्या कमी खर्चात आणि अशा विक्रमी वेळात हे काम पुरे होईल, अशी कल्पना त्यांना नव्हती. जाताना त्यांनी या कुटुंबांना लागतील त्या सर्व भांड्यांचा सेट देण्याविषयीही बोलणे केले. तसेच अजून तीन वस्त्यांचे अशाच प्रकारे पुनर्निर्माण करण्याचे कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे असे मला सांगण्यात आले. त्याचेही काम लवकरच सुरू होईल. त्या प्रायोजित वस्त्यांवरचे लोकही या कार्यक्रमाला आले होते. या कार्यक्रमाला कल्याण आश्रमाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
ठमाताई पवार यांनी अध्यक्षपद भूषवले. आनंदाने सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे मार्गदर्शक सोमय्या जुलूजीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. ते भाषणात म्हणाले, “एका घराचं गणेशपूजन झालं तर ते एक कुटुंब एकत्र येते. पण इथे तर १६ घरे एक कुटुंब म्हणून एकत्रितपणे राहणार आहेत. ही खूपच आनंदाची बाब आहे. इतकेच नाही तर या कामात ज्या लोकांचे कमी-अधिक मदतीचे हात लागले ते सगळेच या विस्तृत कुटुंबाचा एक भाग झाले आहेत.” काळाच्या प्रवाहात समाजपुरूषाची संघटित शक्ती अशी अनंत असते. आज अशीच सकारात्मक कामे करण्यासाठी समाजातील दात्या हातांची वनवासी कल्याण आश्रमाला आणि आपल्या वनबंधूंना गरज आहे. या विस्तारलेल्या कुटुंबाचे सदस्य होण्यासाठी आपण काय काय करू शकाल?
 
- अमिता आपटे
@@AUTHORINFO_V1@@