कलेचे धडे देणारा कलाशिक्षक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2020
Total Views |
Amol Patil _1  
 
 


खडतर परिस्थितीतून कलाशिक्षक झालेल्या व विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे देणार्‍या डोंबिवलीतील अमोल पाटील यांनी विविध विषयांवर चित्रे चितारली आहेत, आज जाणून घेऊया त्यांच्याविषयी...
 
कोरोना काळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी अमोल पाटील यांनी ‘अमोल फाईन आर्ट’ या युट्यूब चॅनलची सुरूवात केली. आता या माध्यमातून विद्यार्थी चित्रकलेचे शिक्षण घेत आहे. शिक्षक म्हणून सामाजिक बांधिलकी जपत खर्‍या अर्थाने कला जोपासण्याचे कार्य पाटील यांच्या हातून घडत आहे.
 
अमोल यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील हंबर्डी या खेडेगावात झाला. आपल्या मेहनतीवर आणि सच्चेपणावर पूर्णपणे विश्वास ठेवून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण व कला क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य केवळ अर्थाजनासाठी त्यांनी कधी केले नाही. ते समाजाच्या उन्नतीसाठी व विकासासाठी कार्य करीत आहेत. अमोल यांना बालपणापासून चित्रकलेची आवड असल्याने गावातील भिंती, रस्ते यावर कोळशाने चित्र रेखाटणे, शेतातील काळ्या मातीपासून गणपती, प्राणी, फळे बनविणे या छंदासोबत मुक्त व समृद्ध बालपण जगत त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण गावात पूर्ण केले.
 
 
त्यांचे आई-वडील हात मजुरी करीत असत. त्यांच्या घरी एक इंचदेखील शेती नाही. घरची परिस्थिती बेताची असली तरी त्यांनी चित्रकलेच्या अभ्यासक्रमासाठी खामगाव येथे प्रवेश घेतला. परंतु, खोलीचे भाडे, खानावळ या खर्चाची जाणीव ठेवून अमोल यांनी महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर ‘हिंदुस्तान लिव्हर’ कंपनीत जाहिराती रंगविण्याचे अर्धवेळ काम करण्यास सुरूवात केली. ‘आर्ट टीचर डिप्लोमा’ व ‘फाईन आर्ट’ या शिक्षणासाठी खिरोदा येथे प्रवेश घेऊन त्यांनी न खचता संघर्षमयरीत्या शिक्षण सुरू ठेवले. या काळात ‘जहांगिर आर्ट गॅलरी मान्सून शो’साठी त्यांची निवड झाली व त्यांची कला बहरू लागली.
 
 
याच काळात त्यांच्या आईचे अचानक निधन झाले. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी अमोल यांच्यावर येऊन पडली. अमोल यांनी आपले उच्च कलाशिक्षण अर्धवट सोडून दिले. डोंबिवली येथील शेठ के. बी. वीरा हायस्कूल येथे चित्रकला शिक्षक म्हणून ते रूजू झाले. शिक्षक म्हणून रूजू झाल्यानंतरही त्यांच्या नशिबी संघर्ष हा होताचा. पाच वर्षांत त्यांचे समायोजन कल्याण येथील के. सी. गांधी स्कूल येथे झाले. सध्या ते के. सी. गांधी शाळेत कायमस्वरूपी चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत असून विद्यार्थ्यांना चित्रकलेचे शिक्षण देत आहेत. अमोल यांना शिक्षण अर्धवट सोडले याची खंत स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी २००५ मध्ये ‘आर्ट मास्टर’ या उच्च कला शिक्षणासाठी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे प्रवेश घेतला व महाराष्ट्रातून सर्वात जास्त गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले.
 
अमोल यांनी ‘लॉकडाऊन’कडे एक संधी म्हणून पाहिले. कलावंताची दृष्टी, विचार वेगळेच असतात. हे विचार त्यांनी अनेक चित्रातून रेखाटले. त्यांच्या अनेक चित्रांपैकी एक ‘वेदनादायी प्रवास’ या चित्राची पी अ‍ॅण्ड सी आर्ट अरेना नॅशनल लेव्हल ऑनलाईन स्पर्धेसाठीनिवड झाली. ‘मदर लव्ह’ या चित्राची ‘द फोर्टी हंट इव्हेंट’ ऑनलाईन स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी निवड झाली.
 
कोरोनासारख्या संसर्गजन्य विषाणूबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने ‘सार्‍या विश्वाचा एकच ध्यास, एकजुटीने करू कोरोनाचा सर्वनाश’, ‘लॉकडाऊन’चे नियम पाळा, ‘कोरोनाचा संसर्ग टाळा’, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, ‘कोरोना संसर्ग रोखण्याची घेऊ खबरदारी’ अशा घोषवाक्यांसह जनजागृतीपर अनेक चित्रे काढून त्यांनी विविध समाजमाध्यमांद्वारे सतत समाज प्रबोधन केले. तसेच ऑनलाईन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांनासुद्धा यात सक्रिय करून घेतले. या उपक्रमाची दखल घेत ‘इंटरनॅशनल ह्युमन राईट्स कौन्सिल’द्वारे त्यांना सन्मानित करण्यात आले. स्थानिक, जिल्हा, राज्य पातळीवरसुद्धा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 
दिवाळीच्या दिवसात सतत पाच तास बसून ५११ पणत्या रंगविण्याचा विक्रम त्यांनी केला आहे व या पणत्या सर्व सेवा देणार्‍या कोरोना योद्ध्यांना कृतज्ञतेतून देण्यात आल्या. या उपक्रमाची नोंद ‘ओएमजी डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड’ने नोंदविली आहे. अमोल हे गेल्या २० वर्षांपासून विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षणाचे धडे देत आहेत. त्याचबरोबर शालेय अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांसाठी सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनासह अनेक नवनवीन सामाजिक उपक्रम ते सातत्याने राबवित असतात.
 
कल्याण-डोंबिवली शहरातील तसेच रेल्वे फलाटावरील भिंतीवर व्यसनाचे दुष्परिणाम, पाणी वाचवा, अवयवदान, जीवनदान, रक्तदान, मुली वाचवा अशा सामाजिक विषयावर विद्यार्थ्यांच्या मदतीने चित्रे काढून सातत्याने समाजप्रबोधनाचा संदेश देण्याचे काम ते करीत असतात. विद्यार्थ्यांना विविध चित्रे, हस्ताक्षर, पोस्टरस्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी करून यशस्वी करण्यासाठी ते नेहमीच खटाटोप करीत असतात. त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा, राज्यपातळीवर बक्षिसे मिळवून उत्तम यश संपादन केले. महाराष्ट्र शासनाच्या एलेमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी मेरिटमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. हे त्यांच्या सातत्यपूर्ण कुशल नि:स्वार्थीपणाने केलेल्या अध्यापनाची व कलासाधनेची साक्ष देते.
 
 
पाटील यांची बहुतेक चित्रे ग्रामीण भागातील उंच डोंगर/दर्‍या, घरे, झोपड्या, गाई, म्हशी, शेळ्या, कष्टकरी स्त्रिया, त्यांचे सौंदर्य, शेतकरी यांच्या मूर्त-अमूर्त आकारातून तयार झालेली आहेत. मनमोहक शांत व करडी रंगसंगती त्यांच्या चित्रांचे विशेष आकर्षण असून त्याद्वारे ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडते. त्यांची चार ते पाच चित्र प्रदर्शनेसुद्धा झाली आहेत. अनेक दिवाळी व उन्हाळी अंक पुस्तकांच्या मुखपृष्ठासाठीसुद्धा त्यांनी चित्रे रेखाटली आहेत. अशा या अष्टपैलू चित्रकला शिक्षकांचा रंगरेषांचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी सतत ऊर्जा व प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. या कलावंताच्या पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!



- जान्हवी मोर्ये  
@@AUTHORINFO_V1@@