ठाण्यात ४५ लाखाच्या ३० अॅम्ब्युलन्स पडल्या धूळखात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2020
Total Views |

Ambulance_1  H
ठाणे : "ठाणे महापालिकेने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी तब्बल ४५ लाख रुपये खर्च करून विकत घेतलेल्या ३० बाईक अॅम्ब्युलन्स धूळखात पडल्या आहेत. ठाणे पालिकेच्या अनेक योजना या लोकहिताच्या आहेत. मात्र, योग्य अंमलबजावणी होत नसल्याने या योजना फक्त कागदावरच राहिल्या आहेत. याला जबाबदार कोण ?" असा सवाल मनसेचे स्वप्नील महिन्द्रकर यांनी उपस्थित केला आहे. यासंबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महिन्द्रकर यांनी केली आहे.
 
 
तब्बल ३० बाईक अॅम्ब्युलन्स या एक वर्षापेक्षा जास्त काळ पालिकेच्या विविध प्रभाग समितीत, रुग्णालय आणि पालिकेच्या मुख्यालयात धूळखात पडलेल्या आहेत. या बाईक अॅम्ब्युलन्ससाठी पालिकेने ४५ लाखाचा निधी खर्ची केला. त्याचा उपयोग झालेला दिसत नाही. बाईक अॅम्ब्युलन्स शुभारंभानंतर पंधरवड्यातच या अॅम्ब्युलन्स दिसणे बंद झाले. कोरोनाच्या काळात रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नव्हत्या. तेव्हा या बाईक अॅम्बुलन्सचा वापर करता आला असता. पंरतु कोरोनाच्या काळात या बाईक अॅम्ब्युलन्सचा वापर झाला नसल्याचा आरोप मनसेच्या स्वप्नील महिन्द्रकर यांनी केला आहे.
 
 
या ३० बाईक अॅम्ब्युलन्स पैकी १५ अॅम्ब्युलन्स विविध प्रभाग समितीमध्ये आणि पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असल्याचा तक्ता मनपा प्रशासनाने पाठविला. मात्र, इतर १५ बाईक अॅम्ब्युलन्स कुठे आहेत ? याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही. याबाबत पालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राजु मुरूडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद होता. तर, उपायुक्त संदीप माळवी यांना संपर्क होऊ शकला नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@