अंतरी लावली ज्ञानज्योती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2020
Total Views |

Madhukar Mahajan_1 &
 
 
भारतीय जनसंघाच्या संस्थापक कार्यकारिणीचे सदस्य आणि महाराष्ट्राचे पहिले संघटन मंत्री, उत्तम लेखक, वक्ते व निरपेक्षपणे काम करणारा कार्यकर्ता, स्थितप्रज्ञाचे जीवन जगणारा संसारी माणूस म्हणजे मधुकरराव महाजन. प्रभावी व्यक्तिमत्व, स्वच्छ पोशाख, निर्मळ स्वभाव आणि पुरोगामी विचार यामुळे आजही मधुकरराव सर्वांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभानिमित्त त्यांच्या कन्या डॉ. विद्या देवधर यांनी त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...
 
 
 
मधुकरराव म्हणजे माधव पुरुषोत्तम महाजन आणि आमचे तात्या. १५ नोव्हेंबर, १९२१, त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी माधवचा जन्म झाला. तात्यांच्या आईचे नाव सत्यभामाबाई, वडील पुरुषोत्तम विठ्ठल महाजन हे रेल्वेत मोठे अधिकारी होते. महाजन कुटुंबीय देशभक्त आणि तत्त्वनिष्ठ होते. परदेशी साखर महाजनांच्या घरात येत नव्हती. स्वदेशी फटाके नव्हते तेव्हा फटाक्याशिवाय दिवाळी साजरी होई आणि बॅण्डशिवाय लग्नकार्ये होत. स्वदेशी, स्वराज्य यांचे प्रेम त्या घरातील मुलं दैनंदिन व्यवहारातून शिकली होती, तसेच लहानपणापासूनच व्यायामाची आवड जोपासली गेली होती. संघामध्ये जडणघडण झाल्यामुळे त्यांच्या मनातून जातीभेद पार हद्दपार झाले होते. तात्यांचा पिंड खरा विचारवंत अभ्यासकाचा. कॉलेज शिक्षणासाठी ते पुण्याला आले. स. प. महाविद्यालयात कै. बापूसाहेब उर्फ श्री. म. माटे यांचे ते विद्यार्थी. त्यांच्या प्रभावामुळे तात्यांनी पूर्णवेळ समाजकार्य करायचे ठरवले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जात होते. १९४२ साली तात्या पूर्ण वेळ प्रचारक म्हणून काम करू लागले. १९४५ मध्ये एमए झाले, त्यावेळी ते ठाणे जिल्हा प्रचारक होते. संवेदनशील मन आणि विस्तृत वाचन, यामधून येणाऱ्या चिंतनामधून तात्यांनी आपल्या जीवनाची दिशा निश्चित केली होती. वेद आणि उपनिषदांतील तत्त्वज्ञान आणि जीवनविषयक आश्रमव्यवस्थेवर त्यांची श्रद्धा होती. त्यामुळे वयाच्या ३० वर्षांपर्यंत संघप्रचारक राहून आता गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याचे त्यांनी ठरविले.
 
 
राजकीय क्षेत्र
 
 
कल्याणच्या सुशीला साठेंबरोबर तात्यांचे दि. १३ मार्च, १९५२ रोजी लग्न झाले. आईसुद्धा राष्ट्र सेविका समितीची शहर बौद्धिकप्रमुख होती. त्याचवेळी तत्कालीन सरसंघचालक पू. गुरुजींनी तात्यांकडे जनसंघाच्या पूर्णवेळ कामासाठी विचारणा केली. राजकारणाच्या माध्यमातून देशसेवा, समाजसेवा साधण्याची ही संधी आहे, असे आई-तात्या दोघांनाही वाटत होते. भारतीय जनसंघाच्या स्थापनेच्या सभेला तात्या दिल्लीला गेले. ते अखिल भारतीय कार्यकारिणीचे सभासद होते. १९५३ मध्ये मुंबई प्रदेशाच्या कार्यकारिणीमध्ये ते संघटनमंत्री झाले. मुंबईत गिरगावमधील चाळीतल्या दोन खोल्यांच्या पोटमाळ्यावर त्यांचा संसार सुरू झाला. पुढे नावारूपास आलेली मोठी माणसे व त्या वेळची संघाची वरिष्ठ मंडळी-दीनदयाळजी, मोरोपंत पिंगळे, आबाजी थत्ते वगैरेही या लहान घरातही येऊन गेली, याचे आईला आजही समाधान आहे. काश्मीर प्रश्नाने उग्र रूप धारण केले होते. जनसंघाचे अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींसह तात्यांचे महाराष्ट्रात, सुमारे अडीच महिने भाषणे आणि दौरे सुरू होते. दि. १६ मे, १९५३ या दिवशी काश्मीर सत्याग्रहासाठी निघण्याचे नक्की झाले. सत्याग्रह म्हणून काश्मीरमध्ये ‘व्हिसा’ न काढता जाण्याचे त्यांनी ठरवले. या सत्याग्रहींना पकडले, तीन महिन्यांची शिक्षा होऊन आग्रा जेलमध्ये ठेवले. तेथेच श्री. हशू अडवाणी व तात्या यांची विशेष मैत्री झाली व शेवटपर्यंत ती कायम राहिली. हे तुरुंगात असताना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा संशयास्पद मृत्यू झाला. श्यामबाबूंच्या आठवणीने तात्यांचे डोळे नेहमी पाणावत असत.
 
 
१९५४ साली जनसंघाचे पहिलेच अखिल भारतीय अधिवेशन व नगरहवेली-सिल्व्हासा मुक्तिसंग्राम या महत्त्वाच्या घटना. जनसंघाचे काम वाढवायचे तर नवनवीन योजना कार्यकर्त्यांसमोर ठेवण्याचे राजकारणाचे तंत्र तात्यांना चांगले अवगत होते. अन्य राजकीय पक्षांसह जनसंघ गोवा-विमोचन आंदोलनात सामील झाला. तात्या या समितीचे सह-कार्यवाह होते. स्वातंत्र्यसैनिकांनी २२ जुलै, १९५४ रोजी दादरा मुक्त केले. दि. २९ जुलैच्या प्रभातकाळी भारतीय राष्ट्रध्वज नरोली पोलीस ठाण्यावर डौलात फडकला. २ ऑगस्ट, १९५४ रोजी सिल्व्हासा सर झाले. पाठोपाठ गोवामुक्ती चळवळ सुरू झाली. ‘महाजन म्हाळगी करे पुकार, गोवा छोडो सालाझार’ अशी एक घोषणा देत जनसंघाचे सत्याग्रही गोव्यात घुसत होते. आई-तात्या बनामाहॉल लेनमधील पोटमाळ्यावरून भुलेश्वरला जयहिंद इस्टेटमध्ये राहायला गेले. या पाच मजली इमारतीत संघाची पाच खोल्यांची सदनिका होती. सर्वश्री दीनदयाळजी उपाध्याय, अटलजी, जगन्नाथरावजी, बच्छराजजी व्यास, प्रेमजीभाई असर, सुंदरसिंह भंडारी, कुशाभाऊ ठाकरे असे कितीतरी कार्यकर्ते जयहिंदवरच उतरत.
 
 
गोवा आंदोलनानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने निवडणुका लढविण्याचे ठरले. “चेंबूर मतदारसंघात जर मधुकरराव उभे राहत असतील, तरच आम्ही ती जागा त्यांच्यासाठी सोडू,” असे आचार्य अत्रे व कॉम्रेड डांगे यांनी सांगितले. कॉ. डांगे, एस. एम. जोशी वगैरे मुरब्बी राजकारण्यांमध्ये तात्या टिकून राहिले होते. जनसंघाची भूमिका ते ठामपणे मांडत होते. या निवडणुकीत तात्या पराभूत झाले. पण, ते अगदी शांत होते. त्यांच्या मते, हा पुढील यशाचा पाया होता. त्यानंतर माननीय हशू अडवाणींची ही जागा पक्की झाली आणि भारतीय जनसंघ आणि भाजप यांनी हा मतदारसंघ तेव्हापासून पुढे अनेक वर्षे आपल्याकडे राखला. १९६२च्या निवडणुकांचे वेध लागले होते. अचानक तात्यांना जनसंघाचे काम थांबविण्याचा आदेश आला. २०व्या वर्षापासून सतत २० वर्षे त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले होते. संसाराच्या प्रारंभापासून सभा, बैठका हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता. मात्र, भारतीय तत्त्वज्ञान व कर्मयोगी विचार यामुळे ते सावरले. तसेच संघ-जनसंघाचे सर्व अधिकारी नेहमीच आमच्याकडे येत राहिले. तात्यांनी तोपर्यंत कोणाकडे नोकरी केली नसल्यामुळे परिस्थितीशी जमवून घेणे म्हणजे सत्त्वपरीक्षा होती. मात्र, या काळात तात्यांच्या आग्रहामुळे आई बी.ए., एस.टी.सी. झाली होती. तिला लगेच पार्ले टिळक विद्यालयात नोकरी मिळाली. एक दोन ठिकाणी नोकरी केल्यानंतर तात्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. पैशामागे वेड्यासारखे पळायचे नाही, या धोरणाने त्यांनी काम केले, म्हणूनच चोख व्यवहार करून आई व तात्या दोघेही समाधानी राहिले.
 
 
पंडितमैत्री
 
 
शिक्षण, साहित्य, समाजकार्य, राजकारण, व्यवसाय आणि देशाटन अशा विविध क्षेत्रात तात्यांना अनेक मान्यवर व्यक्ती किंवा जिज्ञासू अभ्यासक भेटत गेले. कार्यक्षेत्र किंवा अभ्यासविषय बदलले तरी सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना तसेच कुटुंबीयांना तात्यांबद्दल ममत्व व आदर वाटत असे. स्पष्ट बोलणे असूनही प्रामाणिक व द्वेषरहित जीवनदृष्टीमुळे लाभलेली ही ‘पंडितमैत्री’ आई-तात्यांच्या संसारातील जमेची बाजू आहे. आमचे तात्या हिंदुत्ववादी होते. कर्मकांडात अडकून न पडताही धर्मततत्त्वज्ञानावरील श्रद्धा आम्हा सर्वांनाच जगण्याचे बळ देत आली आहे. १९४८ मध्ये संघावरील बंदीकाळात विस्तृत वाचन करायची संधी मिळाली, असे ते सांगत. मराठी, इंग्रजी व संस्कृत ग्रंथवाचनाच्या वेळी त्यांनी सुवाच्च अक्षरात काढलेल्या टिपणांच्या २०-२५ वह्या आमच्या संग्रही आहेत. धार्मिक वाङ्मयाच्या वाचनामुळे आणि थोरामोठ्यांच्या, संतांच्या सहवासामुळे ते तटस्थपणे जीवनाकडे पाहू शकले. संघबंदी उठल्यानंतर, पूर्ववत शाखा सुरू झाल्या, तेव्हा पीएच.डी.चा प्रबंध लिहावा असे त्यांनी ठरविले. भारतभर असलेली भागवताची लोकप्रियता लक्षात घेऊन ‘भागवताचा हिंदी-मराठीवरील परिणामाचा वेध’ असा प्रबंध त्यांना प्रा. अ. का. प्रियोळकर यांच्याकडे पूर्ण करावयाचा होता. परंतु, त्याच वेळी जनसंघाच्या स्थापनेमुळे एक नवी जबाबदारी त्यांच्यावर पडली. संघाच्या सामाजिक व जनसंघाच्या राजकीय वातावरणात ते २० वर्षे रमले. तरुण वयात म्हणजे चाळीशीपर्यंतच फार मोठमोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. प.पूज्य श्री. गोळवलकर गुरुजी, मा. आबा थत्ते, मा. मोरोपंत पिंगळे या सर्वांचाच तात्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास होता.
 
 
संघकार्यातील सामाजिक समरसता त्यांच्या उदार मनोवृत्तीला भावली होती. राजकीय पक्षाची जडणघडण करताना, आंदोलनांची आखणी करताना, निवडणूक लढवताना त्यांच्या बुद्धीचा, कल्पकतेचा आवाका सर्वांना चकित करून सोडणारा होता. तरुण वय असूनही प्रसिद्धीच्या, यशाच्या नशेत ते कधी वाहावत गेले नाहीत. श्रीगुरुजी किंवा पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारख्या तत्त्वचिंतक कर्मयोग्यांच्या सहवासात, पुस्तकांच्या चिंतनात ते भारतीय तत्त्वज्ञान जगले होते. तात्यांनी जीवनप्रवासात किती वेगवेगळी आणि मोठमोठी माणसे जोडली होती ते आता जाणवते आहे. संघ, जनसंघाची संपूर्ण भारतातील, सर्व क्षेत्रातील विद्वान मंडळी तात्यांची आजही आठवण ठेवतात, यातच तात्यांचा वेगळेपणा दिसतो. पं. सातवळेकरांकडे तात्यांचे बरेच जाणे-येणे होते. पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याशी त्यांची तरुण वयापासून मैत्री होती. अभ्यास आणि चिंतनशीलता हाच त्यांच्या मैत्रीचा दुवा, जो शेवटपर्यंत टिकला होता. स्वामी चिन्मयानंद, मसुराश्रमाचे ब्रह्मचारी विश्वनाथजी यांच्या संपर्कात तात्या नेहमी होते. तात्यांच्या वयाला ६० वर्षे झाली आणि त्यांनी सहजपणे आपला व्यवसाय मुलीच्या, सुषमाच्या हाती सोपविला. त्यानंतर बुद्धप्रणित मुक्तीमार्ग म्हणजे ‘विपश्यना’ याचे प्रमुख प्रसारक दा. ना. गोएंका यांच्याशी त्यांचा परिचय वाढत गेला.
 
 
लेखन-संशोधन
 
 
तात्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्यांचे वक्तृत्वही अतिशय प्रभावी होते. तात्या गोष्टी खूप रंगवून सांगत याचा अनुभव आम्ही मुलींनीही घेतला आहे. संघशाखांवरील बौद्धिकांमुळे अभ्यासाला, वाचनाला एक शिस्त लागलेली होती. १९४५ पासून अप्पाजी जोशी, गुरुजी यांच्या बौद्धिकांच्या टिपणाच्या वह्या अजून आहेत. भाषणांसाठी, लेखनासाठी मराठी व इंग्रजीमधील अनेक अवतरणे, सुभाषिते यांच्या संग्रहाच्या स्वतंत्र वह्या आहेत. त्यांनाच काय आज मलाही भाषणासाठी, लेखनासाठी त्याचा उपयोग होतो. कॉलेजात शिकताना, ऐन उमेदीच्या वर्षांत समाजकार्य, राजकारण यांची नशा अनुभवतानाही वाचन, मनन, चिंतन आणि लेखन यांची साथ त्यांनी कधीही सोडली नाही. उत्तम वक्तृत्व व व्यक्तिमत्त्व यावर ते सभा जिंकू शकत होते. पण, तरीही प्रत्येक भाषणातून लोकांना नवी माहिती, नवा विचार देण्याबाबत ते आग्रही असत.
 
 
भारतीय जनसंघाची स्थापना झाली, तेव्हा प्रत्येक प्रांतातील निवडक संघ स्वयंसेवकांना घेऊनच जनसंघाची राष्ट्रीय कार्यकारिणी तयार केली गेली. स्वयंसेवकांनी राजकारण समजून घ्यावे म्हणून त्यांनी कल्याणच्या गोपाळ टोकेकर यांच्या मदतीने १९६० मध्ये, ‘भारतीय राज्यशास्त्र’ हा ग्रंथ लिहिला. भारतीय सणांचे सुगम विवेचन करणाऱ्या ‘आली दिवाळी भुवन उजळणी’ या लेखसंग्रहाबरोबर तात्यांच्या ओघवत्या आणि लालित्यपूर्ण भाषेतील त्यांचा आणखी एक लेखसंग्रह म्हणजे ‘अशा व्यक्ती असे तेज!’ थोरामोठ्यांच्या जीवनाचा पट दाखविणारे लेखन हा त्यांच्या लेखनाचा विशेष होता. अशा लेखनासाठी लागणारी गुणग्राहक आणि सहृदय वृत्ती तात्यांच्या जवळ होती. तात्यांच्या कर्करोगाचे निदान झाले ते डॉक्टर हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. डॉक्टरांच्या आठवणी लिहिण्यासाठी ही अखेरची संधी आहे, असे समजून तात्यांनी दहा दिवसांत ‘केशवाय नमः’ हे छोटे पुस्तक लिहून पूर्ण केले. लेखनाला त्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान होते.
 
 
संसार सुखाचा तात्यांचा संसार आणि भारतीय जनसंघाचे कार्य एकदम सुरू झाले. जनसंघासाठी पूर्णवेळ काम करण्याचे त्यांनी ठरविले, ते आईचे पूर्ण सहकार्य होते म्हणूनच. स्त्रीशक्तीवर तात्यांचा दृढ विश्वास होता. आईला समिती कार्यात त्यांचे मार्गदर्शन लाभलेच; पण समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशींसह समितीच्या अन्य अधिकारी व सेविकाही तात्यांशी चर्चा करीत असत. आम्हा मुलींना त्यांनी फार विचारपूर्वक घडविले, तसेच स्वतःचे निर्णय घेण्याचे नेहमी स्वातंत्र्य दिले. १९७५च्या आणीबाणीच्या काळात आम्ही दोघी बहिणी सत्याग्रहात निघालो, तेव्हा कॉलेजचे वर्ष फुकट जाईल, तुरुंगवास घडेल, असे कोणतेही धोके न दाखविता, आमच्या निर्णयाचे त्या दोघांनी स्वागतच केले.
 
 
तात्यांच्या आयुष्याकडे पाहिले की, एक पीएच.डी.चा प्रबंध सोडला तर त्यांनी कोणतेच काम अर्धवट सोडले नाही. ठरविले त्याप्रमाणे केले आणि ठरावीक काळाने आनंदाने त्यापासून दूर झाले. त्यांनी समाजकारण केले, त्यातूनच बाजूला होऊन पुढे राजकारणात आले. त्यानंतर व्यवसाय मनापासून केला, कौटुंबिक जबाबदाऱ्या संपल्यावर व्यवसाय सुषमाच्या हातात घेऊन संपूर्ण निवृत्त झाले. या सर्व प्रवासात ज्ञानसाधना मात्र अखंडपणे चालली होती. हिंदू धर्म तत्त्वज्ञानाचा त्यांचा अभ्यास होता आणि त्यांना त्याचा अभिमानही होता. परंतु, पेहराव, सौभाग्य अलंकार, मूर्तिपूजा, व्रतवैकल्य याचा त्यांनी कधीही आग्रह धरला नाही, कारण या वेदप्रणित समाज पद्धती नाहीत, असं ते सांगत. जीवनाचा शेवट दृष्टिक्षेपात आल्यावर तात्यांनी प्रायोपवेशन सुरू केले आणि आईला सांगितले की, आता फक्त १२-१३ दिवस हातात आहेत. ‘जाईचे फुलणे, फुलणे तेची सुकणे,’ हे लक्षात घेऊन मरणाची चाहूल लागली तरी ते शांत राहिले. तात्या गेले त्या रात्री जवळ बसलेल्या आईला त्यांनी झोपायला जायला सांगितले. मला आणि सुषमालाही सांगितले की, “तुम्ही इथे बसलात तर माझे मन एकाग्र होत नाही.” त्यानंतर जवळच्या सर्वांना जायला सांगून शवासनाप्रमाणे विश्रांती घेत त्यांनी शांतपणे जगाचा निरोप घेतला. तो दिवस होता २५ नोव्हेंबर, १९८९ कार्तिक वद्य त्रयोदशी संत ज्ञानेश्वरांचा समाधी दिवस!
 
 
- डॉ. विद्या देवधर
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@