‘ग्राऊंड बुकिंग’ने बेस्ट’ तोट्यात : थांब्यावर बस थांबतच नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2020
Total Views |

BEST_1  H x W:
 
 
 
मुंबईः खर्चाचा तपशील न दिल्यामुळे ‘बेस्ट’ला देण्यात येणार्‍या मदतीबाबत महापालिका प्रशासन हात आखडता घेत असतानाच, आता ‘ग्राऊंड बुकिंग’मुळेही ‘बेस्ट’ला अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ‘बेस्ट’ तोट्यात येत असून कामगारांनाही मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
 
 
‘बेस्ट’ची प्रवासी वाहतूक म्हटली की, ड्रायव्हर-कंडक्टर असे दोन कामगार आणि प्रवासी यांचे अतूट नाते जुळलेले असते. मात्र, ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे बसेस खरेदी करणे थांबविण्यात आले. त्याचबरोबर कामगारभरतीला ब्रेक लागला. त्यामुळे अनेक विभागात कामगारांची टंचाई जाणवू लागली. विशेषतः ज्यांच्यामुळे ‘बेस्ट’ ओळखली जाते, त्या ड्रायव्हर-कंडक्टरचीही ‘बेस्ट’मध्ये कमतरता आहे. त्यावर उपाय म्हणून ‘बेस्ट’ने वेट लीजच्या (भाड्याच्या) गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
 
 
वेट लीजच्या गाड्या कंडक्टरशिवाय चालविल्या जातात, तर ड्रायव्हर कंत्राटदार कंपनीचे असतात. या गाड्यांसाठी ‘बेस्ट’चे कंडक्टर काही थांबे सोडून ग्राऊंड बुकिंग करतात. त्यामुळे मधल्या थांब्यांवर प्रवासी घेतले जात नाहीत. परिणामी, प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांचा वेळ फुकट जातो. त्यांना ‘बेस्ट’च्या बसची वाट पाहत उभे राहावे लागते. ग्राऊंड बुकिंग करताना काही कंडक्टर गाडीत शिरत नाहीत. त्यांना आत जाऊन बुकिंग करण्याची परवानगी नसते, असे सांगितले जाते. त्यामुळे बसमध्ये बसलेले प्रवासी दरवाजापर्यंत जाऊन कंडक्टरकडून तिकीट घेतात, तर काही प्रवासी तिकिटाशिवाय जातात.
 
 
काही आगारांमध्ये सुरुवातीच्या थांब्यावरच तिकिटे दिली जातात. तर काही आगारांमध्ये सुरुवातीच्या थांब्यावर तिकीट न देता पॉईंटला असलेल्या कंडक्टरकडून तिकीट घेण्याबाबत सांगितले जाते. त्यामुळे मधल्या थांब्यावरच्या प्रवाशांना घेतले जात नाही. परिणामी, बस रिकामी पाठविली जाते. या प्रकारामुळे ‘बेस्ट’चे मोठे नुकसान होत असल्याचे ‘बेस्ट’च्या कामगारांचेच म्हणणे आहे. सध्या ‘बेस्ट’मध्ये तिकीट तपासनिसांचीही कमतरता आहे. त्यामुळे गाड्यांमध्ये शिरून तिकीट तपासणी करण्यात येत नाही.
 
 
या इन्स्पेक्टरना ठरावीक पॉईंटवर उभे राहून गाड्या थांब्यावर लावून घेण्याचे काम सोपविण्यात आले आहे. म्हणजे काही ठरावीक पॉईंटवर ग्राऊंड बुकिंग करणारा एक कंडक्टर आणि एक इन्स्पेक्टर असे दोन कर्मचारी असतात. गाडी पॉईंटला आल्यानंतर कंडक्टर गाडीमध्ये असलेल्या प्रवाशांना तिकीट देण्यास सुरुवात करतो. त्यामुळे त्या पॉईंटला गाडी पाच ते दहा मिनिटे थांबवावी लागते. यात प्रवाशांचा वेळ वाया जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
कामगारांची होरपळ
 
ग्राऊंड बुकिंग करणार्‍या कंडक्टरला त्याची ड्युटी संपेपर्यंत एकाच स्टॉपला उभे राहून प्रवाशांना तिकिटे द्यावी लागतात. त्यामुळे त्याला कुठेही बाजूला होता येत नाही. उन्हातान्हात उभे राहत होरपळत त्यांना हे काम करावे लागते. त्याचा त्यांना फारच मनःस्ताप होत आहे. निरीक्षकांनाही गाड्या थांब्याला लावून घेण्यासाठी त्याच ठिकाणी उभे राहावे लागते. त्यांनाही कुठे हलता येत नाही. कामगारांची कमतरता असल्याने कामाचा ताण आहेच, शिवाय उन्हातान्हात उभे राहून काम करावे लागत असल्याने त्यांना फारच मनःस्ताप सोसावा लागत असल्याचे अनेक थांब्यावरच्या कर्मचार्‍यांनी सांगितले.
 
दोन कर्मचार्‍यांची गरज
जवळच्या ठरावीक तिकीट असणार्‍या अंतरावर कंडक्टरशिवाय गाडी चालविणे ठिक आहे. पण, लांब अंतरावर जाणार्‍या गाड्यांमध्ये ड्रायव्हर-कंडक्टर असे दोन कर्मचारी असणे आवश्यक असल्याचे मत कामगारांनी व्यक्त केले. अनेकदा गाडी मागे-पुढे घेता साहाय्यकाची आवश्यकता लागते. तसेच मध्येच एखादा वाईट प्रसंग घडल्यास प्रवाशांनी कोणाकडे मदत मागावी, असाही या कामगारांनी प्रश्न केला आहे. घाटकोपर आगाराच्या चेंबूरकडे जाणार्‍या बसवरील चालकाला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस फुटपाथवरील भाजीच्या दुकानात घुसली.
 
सुदैवाने बसमधील प्रवासी व पादचारी कोणी जखमी झाले नाहीत. पण, अशावेळी बस प्रवासी भांबावून जातात. त्यामुळे लांब अंतरावर जाणारी कोणतीही बस असो, त्या बसमध्ये ड्रायव्हर-कंडक्टर असावेत, अशी मागणी कामगारांची आहे. ड्रायव्हर-कंडक्टरमुळे ‘बेस्ट’ बसचा प्रवासही जलद होईल, प्रवाशांचा वेळही वाचेल आणि ‘बेस्ट’चे उप्तन्नही वाढेल, अशा कामगारांनी सूचना केल्या असून, त्याचा ‘बेस्ट’ प्रशासनाने विचार करावा, अशी त्यांची मागणी आहे.



@@AUTHORINFO_V1@@