समाजऋण व्यक्त करणारे प्रा. दीपक वर्मा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2020
Total Views |

Shefal_1  H x W
 
 

ज्येष्ठ चित्रकार प्रा. दीपक वर्मा हे पुलंच्या व्याख्येतील शिक्षक नसून हाडाचे कलाध्यापक असल्याचे त्यांना कृत्रिम सौंदर्य वा ओढून-ताणून, धाक-धपटशाने आणलेल्या सौंदर्यापेक्षा, नैसर्गिक सौंदर्य टिपण्यातच अधिक, ईश्वरीय आनंद लाभत असावा. दुसरे म्हणजे कुसुमाग्रज म्हणतातत्याप्रमाणे म्हणजे त्यांच्या रुपरेषेत कलेबाबतचे फार अनुकरणीय विचार त्यांनी मांडलेले आहेत.
 
 
खूप पूर्वी म्हणजे रामायण काळात, वनवासी राम-सीता आणि लक्ष्मण हे माता कैकयीच्या सूचनेनुसार १४ वर्षांसाठी वनवासाला पाठविण्यात आलेले क्षत्रिय! वनवासाच्या काळात फिरत असताना ते तत्कालीन दंडकारण्यात जे पर्वतराज ब्रह्मगिरीच्या परिसरात होते, तेथे आले. ही कथा सर्वश्रुत आहे. मला या लेखप्रपंचात आठवायचं कारण हा योगायोग म्हणता येणार नाही. याच दंडकारण्य उपाख्य नासिकाभुमी उपाख्य नाशिक क्षेत्री, प्रत्यक्ष श्रीरामांनी, गोदेकाठी महादेवाची पिंड स्थापन करून जेव्हा रामकुंड असलेल्या स्थळी महादेवाची पूजा केली, तेव्हा साक्षात् शंकर भगवान तेथे प्रकट झाले आणि प्रभू रामचंद्रांना ‘वरदान’ मागण्यास सांगितले. त्यावेळी प्रभू रामचंद्र भगवान शंकरांकडे हवा तो वर मागू शकले असते. पण, त्यांनी तसे न करता शंकराकडे वर मागितला की, ‘या भूमीला आपण ‘महानराष्ट्र’ बनवावे.’ तेच पुढे ‘महानराष्ट्र’ अर्थात ‘महाराष्ट्र’ झाले. महाराष्ट्राचं नाक म्हणजे नाशिक, असंच म्हणायला हवं. पंडित नेहरूंच्या काळात भाषेनुसार प्रांतविभागणी झाली, तेव्हा याच नाशिक शहराला, ज्याच्यामुळे या भूमीला ‘महाराष्ट्र’ असे नाव पडले, त्याच या नाशिकला ‘महाराष्ट्राची राजधानी’ बनविण्याचा निर्णय, या राज्याच्या निर्मितीच्या वेळी होणार होता. कारण, महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राच्या, जवळजवळ मध्यभागीच नाशिक शहर वसलेले असल्याने हा निर्णय होणार होता. असो. पण तसं घडलं नाही. मला मात्र आज हा लेख लिहिताना आठवायचं कारण मात्र समयोजित आहे, असं वाटतंय!
 
 
ज्येष्ठ चित्रकार शिवाजी तुपेंनी आणि रामकालीन चित्रकारांनी नाशिकच्या निसर्गसौंदर्याच्या द्विमितीत बद्ध करण्यास प्राधान्य दिले. पंडित सोनवणी, वसंत सोनवणी, मोरे, पंडितराय देशमुख, दिनकर जानमाळी, अगदी सावंत बंधू, अनिल अभंगे, ज्येष्ठ शिल्पकार मदन गर्गे आणि कलोपासक गर्गे परिवार, अगदी उमद्या दमाचा शिल्पकार मयूर मोरेंसह अनेक कलाकार मंडळी त्यांचं कलाविषयक अस्तित्व पुण्या-मुंबईपेक्षा कुठेही कमी नाही, हेच जणू ‘कृती’ने दाखवित आहेत. साक्षात् दादासाहेब फाळके, साक्षात् कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकरांसारखी आकाशाला गवसणी घातलेली महान मंडळी या नाशिकने कलाविश्वाला बहाल केली आहे. तसेच जी नावे समोर आलीत, ती लेखणीच्या प्रवासात कागदावर उमटली. मात्र, अशी बरीच नावे जी कलाक्षेत्रातील सिंहाचा वाटा उचलणारी ‘सिंहस्तंभ’ ठरलेली आहेत. याच नाशिकने आणखी एका प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या कलाकाराची दीपज्योत कलाप्रकाशाच्या तेजाला आणखी तेजस्वी करण्यासाठी बहाल केली आहे. अशा या ‘कलादीपा’चं नाव आहे ज्येष्ठ चित्रकार प्रा. दीपक वर्मा!
 
 
प्रा. दीपक वर्मा यांच्या कलाध्यापनातून नियत वयोमानानंतर सेवानिवृत्तीनंतरच्या कलासृजनाला खऱ्या अर्थात वसंताची पालवी फुटली. सर्वसाधारणपणे कलाकार विशेषतः चित्रकार हा चित्र रंगविण्यासाठी वा व्यक्तिचित्रणासाठी समोर जे किंवा जी ‘मॉडेल्स’ निवडतो, ती सर्वश्रुत आहेत. अगदी राजा रविवर्मापासून आपणांस किंवा कलाकार व कलारसिकांना माहिती असेलच आणि माहिती असायलाच हवं. मात्र, हे ‘वर्मा’ जरा अपवादात्मक यादीतील चित्रकार आहेत. यांच्या व्यक्तिचित्रणातील ‘मॉडेल्स’ म्हणजे गोदेच्या म्हणजे दक्षिण गंगेच्या काठावर पापक्षालनासाठी अथवा पुण्यांश वाढविण्याच्या इराद्याने देवाचे-आराध्याचे नामस्मरण करणारा एखादा साधू, एखादा फकीर वा संन्याशी असतो. ही ‘मॉडेल्स’ वर्मा सरांनी का निवडली असावीत, असा माझ्यातीलही बालबुद्धीच्या कलाकाराला प्रश्न पडला होता. पण, माझ्यातल्याच संशोधकाने उत्तरही देऊन टाकलं.
 
 
ज्येष्ठ चित्रकार प्रा. दीपक वर्मा हे पुलंच्या व्याख्येतील शिक्षक नसून हाडाचे कलाध्यापक असल्याचे त्यांना कृत्रिम सौंदर्य वा ओढून-ताणून, धाक-धपटशाने आणलेल्या सौंदर्यापेक्षा, नैसर्गिक सौंदर्य टिपण्यातच अधिक, ईश्वरीय आनंद लाभत असावा. दुसरे म्हणजे कुसुमाग्रज म्हणतातत्याप्रमाणे म्हणजे त्यांच्या रुपरेषेत कलेबाबतचे फार अनुकरणीय विचार त्यांनी मांडलेले आहेत. मला प्रा. दीपक वर्मा सरांचा कलाप्रवास या तत्त्वांनी सुरु असलेला दिसतो. ‘रुपरेषां’च्या संदर्भानुसार कलेचे आधारभूत तत्त्व हे सौंदर्य-नीती-आत्मनिष्ठा इत्यादीपेक्षा अहंकार, अनुभव आणि आविर्भाव या कलेच्या आधारभूत तत्त्वांनुसारच चिरंतन कलाकृती निर्माण होते. ‘अहंकार’ हा शब्द आपण लौकिक अर्थाने ‘स्वाभिमान’ या शब्दाजवळ जाणारा असा अभिप्रेत धरत! कलाकाराला स्वत:चा विश्वास, स्वाभिमान, अनुभव जो स्वत:लाच घ्यावा लागतो आणि आविर्भाव हा अनुभवजन्य असला तरच येतो, आणता येत नाही, आणण्याचा प्रयत्न केलाच कुणी, तर त्याला नाटकीय स्वरुप प्राप्त होते. म्हणून मी जबाबदारीने म्हटले की, प्रा. दीपक वर्मा यांच्या कलाकृती या ट्रेसिंग पेपरच्या वा कॅनव्हास प्रिंटवर रंगवलेल्या नसल्याने त्या अजरामर आहेत. त्यांची कलासाधना या आधुनिक तंत्रज्ञानातील कलाबाजारातही चिरंजीव आहे, या अर्थाने ती स्वाभिमानी आहे. कोरोनाच्या काळातही या तरुण मनाच्या कलाकाराने गोदेच्या तीरावर रोज रेखांकने आणि निसर्गचित्रणे रंगविताना आजूबाजूला उत्सुकतेपोटी जमणाऱ्या अगदी तीन वर्षांच्या मुलापासून तर कलेची आवड वा कलेची रसिकता असणाऱ्या तरुण मनाच्या वृद्धांपर्यंत जो वा जे येतील, त्यांना कलासाधनेत सहभागी करवून घेतलं. सध्या तर ते गरीब मुलांपासून इच्छुक रसिकांना लॅण्डस्केप रेखांकने, स्केचिंग वगैरे अनौपचारिक-‘शांतिनिकेतन’ पॅटर्नप्रमाणे कलाशिक्षण देत आहेत.
 
 
अशा अकृत्रिम जीवनप्रवास करणाऱ्या कलादीपक कलाकाराच्या कलाजीवनाचा वारसा हा घरातूनच प्राप्त झालेला!म्हणजे तीर्थरुप वडील हे उत्कृष्ट सुवर्णकार आणि मूर्तिकार, बंधू कलाशिक्षक! त्यामुळे कलाजीवनास खतपाणीच मिळाले. मुंबईतील त्यावेळेच्या सुप्रसिद्ध जे. जे. स्कूल येथे डीप.एएड पूर्ण केले. बापू उर्फ गोपाळराव देऊसकर, प्रताप मुळीक अशा कलाधुरिणांचे योग्यवेळी, योग्य वयात मार्गदर्शन लाभल्यामुळे दीपक वर्मा प्रतिथयश चित्रकार बनले. पेन्सिल्स, पेस्टल्स् इंक ऑईल कलर्स, वॉटर कलर्स, कलरपेन्सिल्स अ‍ॅक्रेलिक कलर अशा सर्वच रंगमाध्यामांवर त्यांची अनुभवी हुकमत आहेच. तथापि वुडवर्क, ताम्रपटावरील कोरीव काम, फायबर ग्लास वा मातीकाम या माध्यमांवरही त्यांची हुकूमत चालते. कलातपस्वी एस. एम. पंडित यांच्याबरोबरही त्यांनी काही महिने त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले, तरीही ‘वॉटरप्रूफइंक’ माध्यमातील वर्मा सरांचे काम हे अटकेपार झेंडा फडकाविणारे आहे. तांब्यांच्या पत्र्यावर काम करण्याची त्यांची ‘मास्टरी’ थक्क करणारी आहे. त्यांच्या या बहुआयामी अनुभवाचा लाभ त्यांच्या विद्यार्थ्यांना खूप झाला आणि आजही होत आहे. प्रामाणिक आणि सव्यसाची अभिजात चित्रकाराची कलाकृती ही आपल्या संग्रही असावीच, असे कुणाला वाटणार नाही! त्यांच्या कलाकृती अनेकांच्या खासगी संग्रहाची शोभा वाढवत आहेत.
 
 
सध्याच्या कला शिक्षणावर, कला विद्यार्थ्यांच्या बदलल्या मनोवृत्तींवर वर्मा सरांनी फार चिंता व्यक्त केली. त्यांनी एका प्रशस्त जागेत एका म्युझियम निर्मितीचा संकल्प मूर्त स्वरूपात आणण्याचा वसा जोपासला आहे. रस्त्यावर उपजीविका करणारे, भाजी विक्रेते, औषध विक्रेते, जडीबुटी विकणारे, रस्त्यावर फिरणारे म्हणजे फिरते विक्रेते, फेरीवाले, गरीब मुले यांच्यातील सुप्त कलागुण वर्मा सरांनी हेरले असून सध्या ते अशा लोकांमधील सुप्त, अदृश्य कलाप्रतिभेला जागवत आहेत. त्यांना गरजेपुरतं कलाकाम शिकवून त्यांच्याकडून कलाकृती निर्माण करवून घेत आहेत. कलेला सामाजिक बांधिलकीची जोड देऊन एका अर्थाने विपश्यना म्हणजे ‘चांगलं पाहायला शिकणं’ हे प्रा. वर्मा सर करीत असून, समाजातील फाटलेल्या कलारसिकतेला कलाप्रतिभेची ठिगळं जोडून रंगीत गोधडी तयार करता आली तर थंडीसह सर्व ऋतुचक्रांमध्ये मायेची, कलेची ऊब निर्माण करता येईल. या समाजातील हातावर पोट असणाऱ्या वर्गावर एवढं इमानइतबारे करता आलं तरी समाजाप्रति कृतज्ञता व्यक्त करता येईल. असं समाधान मानणाऱ्या या कलासाधकाच्या सृदृढ कलाप्रवासास निरोगी दीर्घायुष्य लाभावे ही सदिच्छा!
 
- प्रा. गजानन शेपाळ
 
 
@@AUTHORINFO_V1@@