धर्मांध खालिदची दांभिक नास्तिकता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2020
Total Views |

Umar Khalid_1  
 
 
 
उमर खालिद डाव्यांच्या संगतीत राहून आपल्या कृतीच्या माध्यमातून स्वतःला मोठा नास्तिक आणि प्रगतिशील म्हणवून घेतो. पण, दंगलीदरम्यान इस्लामी कट्टरतेचा चोळणा ओढून हिंसाचार माजवतो, असा उल्लेख पोलिसांच्या चार्जशीटमध्ये आहे. महत्त्वाचे म्हणजे, दिल्ली पोलिसांनी काल्पनिक आधारावर हा उल्लेख केलेला नाही, तर यासंदर्भातील भक्कम पुरावेदेखील दिले आहेत.
 
 
दिल्लीतील हिंदुविरोधी दंगलीसंदर्भात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दाखल केलेल्या चार्जशीटमधून जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालिदच्या विचार व भूमिकेची पुरती चिरफाड केल्याचे नुकतेच समोर आले. उमर खालिदने स्वतःच्या नास्तिकत्वाचे केवळ ढोंग केले, प्रत्यक्षात मात्र तो कट्टर मुस्लीम असून भारताचे तुकडे करणे, हेच त्याचे लक्ष्य असल्याचे या चार्जशीटमध्ये पोलिसांनी म्हटले आहे. उमर खालिद डाव्या विचारांच्या मंडळींच्या संगतीत राहून आपल्या कृतीच्या माध्यमातून स्वतःला मोठा नास्तिक आणि प्रगतिशील म्हणवून घेतो. पण, दंगलीदरम्यान इस्लामी कट्टरतेचा चोळणा ओढून हिंसाचार माजवितो, असा उल्लेख या चार्जशीटमध्ये आहे. महत्त्वाचे म्हणजे, दिल्ली पोलिसांनी कोणत्याही काल्पनिक आधारावर उमर खालिदची सच्चाई मांडलेली नाही, तर त्याचे पुरावेदेखील या चार्जशीटमध्ये मिळतात. डाव्या विचारांच्या लोकांवर असे काही आरोप केले गेले की, नेहमीच त्या कळपातून पुरावे नाहीत, असे सांगत स्वतःच्या निर्दोषत्वाचा कांगावा केला जातो. पण, उमर खालिदविरोधातील चार्जशीट व त्यातील पुरावे इतके भक्कम आहेत की, त्याच्या पाठीराख्यांचीही दातखीळ बसेल. धक्कादायक म्हणजे, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिक्षण घेतलेला, उच्चशिक्षित उमर खालिद हाच दिल्ली दंगलीचा मुख्य सूत्रधार असल्याचे दिल्ली पोलिसांनी आपल्या चार्जशीटमध्ये नमूद केले आहे; अर्थात एकेकाळी मासूम, निरागस विद्यार्थी म्हणून त्याची कड घेणारे अनेक लोक होते. पण, वास्तवात उमर खालिद तर अराजकाचा कर्ताकरविता असल्याचेच स्पष्ट होते.
 
 
 
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये उमर खालिदबद्दल नेमके काय म्हटले हे नक्कीच वाचायला हवे. जेणेकरून प्रसारमाध्यमांतून किंवा तथाकथित पुरोगामी, बुद्धिजीवी वर्गातून पीडित म्हणून पेश केलेली व्यक्तीच खरी रक्तपिपासू असल्याची खात्री पटते. दिल्ली पोलीस चार्जशीटमध्ये म्हणतात की, “सन २०१६ साली देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी नारे देणारा उमर खालिद २०२० साल येता येता इतका पुढे गेला की, एका दहशतवाद्याप्रमाणे त्याने दंगल प्रत्यक्षात घडवून दाखविली.” पोलिसांच्या चार्जशीटमध्ये उमर खालिदच्या, ‘तेरा मेरा रिश्ता क्या हैं, ला इलाहा इलल्लाह’, या बदललेल्या नव्या नाऱ्याचाही उल्लेख आहे. तसेच देशाचे तुकडे तुकडे करण्याचे स्वप्न पाहणारा उमर खालिद २०२० साली ‘उम्मा’साठी पार्श्वभूमी तयार करण्याच्या कामाला लागल्याचेही चार्जशीटमध्ये म्हटले आहे. ‘उम्मा’ म्हणजेच इस्लामी विश्वबंधुत्व किंवा जगभरातील सगळीकडचे मुस्लीम एक आहेत व त्यांच्या रक्षणासाठी एकत्र येणे, लढा देणे. त्याच मालिकेंतर्गत दिल्लीच्या जाफराबाद व जामियानगरमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्याच्या आड दंगली भडकाविण्याचे संपूर्ण नियोजन उमर खालिदने केले. त्यासाठी सीलमपूरमध्ये एका बैठकीचेही आयोजन करण्यात आले होते व उमर खालिदची दंगलखोरांबरोबरची छायाचित्रेही पोलिसांनी आपल्या चार्जशीटमध्ये जोडलेली आहेत. पोलिसांच्या या चार्जशीटमधूनच उमर खालिदची नास्तिकता, प्रगतिशीलता, डावे विचार किती दांभिक व इस्लामप्रेम किती कट्टर आहे, याचा प्रत्यय येतो. मात्र, अशा व्यक्तीची बाजू घेऊन देशाच्या एकता, अखंडता व सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी उभ्या ठाकणाऱ्यांचा विरोध करणाऱ्यांचे काय? पोलिसांची चार्जशीट पाहून ते सुधारले तर ठीक; अन्यथा त्यांच्यात आणि उमर खालिदमध्ये कसलाही फरक राहणार नाही, दोन्हीही देशविघातक व देशविरोधीच!
 
 
 
दरम्यान, उमर खालिदने दंगलीच्या आरोपातून स्वतःचा बचाव व्हावा म्हणून २३ फेब्रुवारीला पलायन केले व तो बिहारच्या समस्तीपूरला गेला. मात्र, त्याने तिथूनच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून दंगल मॉनिटर केली व यावरूनच पोलिसांनी त्याला रिमोट कंट्रोलद्वारे दंगलीला मॉनिटर केल्याचा आरोपी ठरविले. महत्त्वाचे म्हणजे, दिल्लीच्या कडकडडुमा न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटची दखल घेतल्याने उमर खालिदवर किती गंभीर आरोप आहेत, हेही समजते. न्यायालयाने यावेळी म्हटले की, पोलिसांच्या चार्जशीटनुसार जे आरोप उमर खालिद व शरजील इमामवर लावले व त्याचे दस्तावेज पाहता या दोघांविरोधात खटला चालविण्यासाठी ते पुरेसे आहेत. म्हणजेच, न्यायालयानेदेखील उमर खालिद व शरजील इमामविरोधात खटला चालविता येईल, असे मत व्यक्त केले. पोलिसांच्या चार्जशीटमध्ये उमर खालिदच्या षड्यंत्राबाबत अधिक विस्तृत माहितीही मिळते व तो कोणत्या थराला जाऊ शकतो, हेही समजते. भारतीय मुसलमान इस्लामची विकृत व्याख्या स्वीकारणार नाही, याची जाणीव उमर खालिदला होती. म्हणून त्याने बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांचा आपल्या कपटकारस्थानासाठी वापर करून घेण्याचे ठरविले. स्थलांतरित बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांना राजधानी दिल्लीत वसवून त्यांच्या आर्थिक स्थितीचा फायदा उचलावा, असा विचार उमर खालिदने केला व ते प्रत्यक्षात आणलेही.
 
 
 
उमर खालिदने ‘पॅन इस्लाम’ अभियानांतर्गत मुस्लिमांना चिथावणी देणाऱ्या तसेच खोट्यानाट्या, बनावट बातम्या प्रसारित केल्या. त्यातून मुस्लिमांचा सरकारविरोधातील संताप वाढावा, अशी त्याची अपेक्षा होती व दिल्लीत उसळलेल्या दंगली त्याचीच परिणती होती. त्यामुळेच या दंगली अतिशय हिंसक झाल्या व दिल्ली अक्षरशः होरपळली. पोलिसांच्या चार्जशीटमध्ये उमर खालिदच्या ढोंगाबद्दलही लिहिलेले आहे. उमर खालिद आपल्या अब्बूचा वारसा म्हणून इस्लामी विचारधारा पुढे घेऊन जात आहे, तर दुसरीकडे स्वतःची राजकीय कारकिर्द घडविण्याच्या व स्वतःला डाव्या विचारांचा दाखविण्याच्या दिशेनेही तो वाटचाल करत आहे. योगेंद्र यादव या व्यक्तीच्या धोरणांशी उमर खालिदची ही भूमिका मिळतीजुळती असल्याचा या चार्जशीटमध्ये उल्लेख आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेली चार्जशीट, त्यात उमर खालिदबद्दल व्यक्त केलेली मते, आरोप, पुरावे व न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण पाहता, उमर खालिद कट्टर इस्लामच्या अविचाराने पुरता बरटबटलेला असल्याचे दिसते; अर्थात हे डाव्या विचारांच्या मंडळींच्या आतापर्यंतच्या वर्तनाला साजेसेच, हिंदुत्व व राष्ट्रीयत्वाला विरोध करायचा आणि इस्लामला जवळ करायचे, हे धोरण त्यांनी नेहमीच अवलंबिले. त्याची कितीतरी उदाहरणे देशभरात आढळतात. मात्र, उमर खालिदने त्याहीपुढे जात मुस्लिमांना केवळ जवळच केले नाही, तर आपल्या मनातील कट्टरतेचे विष त्यांच्याही मनात कालवत थेट दंगली घडविल्या. हे जितके धोकादायक व भयंकर तितकीच पोलिसांनी केलेली कारवाई, अशा हिंसक अराजकाच्या मुळापर्यंत जाऊन, त्याला नेस्तनाबूत करण्याची ग्वाही देणारीही!
 
 
@@AUTHORINFO_V1@@