‘अबोली’ची प्रणेती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2020
Total Views |

auto_1  H x W:
 
 
महिला रिक्षाचालकांसाठी हेमांगिनी बाळासाहेब पाटील यांनी सुरू केलेल्या ‘अबोली’ रिक्षामुळे त्यांना ‘अबोलीच्या प्रणेत्या’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या कारकिर्दीचा हा आढावा...
 
 
शिक्षण हाच महिलांच्या विकासाचा मुख्य स्रोत असून स्त्रिया शिकल्याशिवाय कुटुंबाचा किंबहुना समाजाचा विकास होत नाही. त्यामुळेच जिद्दीने एक अबला आज सबला बनून केवळ स्वतःच्या कुटुंबाचा नव्हे, तर समाजाचाही आधार बनली आहे. प्रादेशिक परिवहन विभागातील डॅशिंग अधिकारी हेमांगिनी पाटील या गरजू महिलांना ‘अबोली’ रिक्षाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करणाऱ्या पहिल्या अधिकारी ठरल्या आहेत.
 
 
परिवहन खात्यात त्यावेळी साहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून रुजू झालेल्या हेमांगिनी पाटील २०१३ ते २०१७ ठाणे ‘आरटीओ’मध्ये होत्या. सध्या त्या वाशी ‘आरटीओ’मध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मूळच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील हेमांगिनी यांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण मालेगाव येथे झाले. त्यांच्या आई शिक्षिका होत्या. मात्र, अधिकारी म्हणून त्या निवृत्त झाल्या. सुरुवातीपासूनच त्यांच्या घरातील वातावरण शैक्षणिक होते. त्यांना दोन भाऊ असून, पालकांनी कधी मुलगा-मुलगी असा भेद केला नाही. उलट लेकीने अधिकारी व्हावे अशी वडिलांची इच्छा होती. अशी कौटुंबिक आठवणही पाटील यांनी जागविली. पुढे पुण्यातील कॉलेजमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर हेमांगिनी पाटील यांनी त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कामास सुरुवात केली. प्राध्यापकाचे काम हे एकाच ठिकाणी असल्याने कोणत्यातरी वेगळ्या क्षेत्रात जाण्याची त्यांची इच्छा होती. “जिल्ह्याला भरपूर डॉक्टर, इंजिनिअर मिळतील. मात्र, अधिकारी हा एकच असतो,” असे त्यांचे आजोबा नेहमी सांगायचे. त्यामुळे पाटील यांनी स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांना यश मिळाले. पहिल्याच प्रयत्नामध्ये परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सन २००१ साली ‘आरटीओ’मध्ये साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. नाशिक, वाशीम, कोल्हापूर, सांगली आदी वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्यानंतर २०१३ मध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर त्यांना पदोन्नती मिळाली. ‘आरटीओ’मधील जवळपास १८ वर्षांच्या सेवेमध्ये अनेक आव्हाने त्यांनी यशस्वीरीत्या पेलली आहेत. प्रशिक्षणादरम्यान त्यांचा परिचय बाळासाहेब पाटील यांच्याशी होऊन हेमांगिनी त्यांच्या जीवनसाथी बनल्या. बाळासाहेब ठाण्यात वाहतूक पोलीस उपायुक्त आहेत.
 
 
रिक्षाचालकांच्या अश्लील हावभावांना घाबरून ठाण्यात एका तरुणीने रिक्षातून उडी मारली. या प्रकरणामुळे मोठा गदारोळ उठून रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिला व मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्नावर मोहोळ उठले. त्याचबरोबर पुरुष रिक्षाचालकांच्या मुजोरीवर रकानेच्या रकाने सजू लागले. त्यावेळी, ठाणे आरटीओमध्ये कार्यरत असलेल्या हेमांगिनी पाटील यांच्या पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून महिलांच्या ‘अबोली’ रिक्षाचा पर्याय पुढे आला. तसा प्रस्ताव परिवहन खात्याच्या माध्यमातून पाटील यांनी तत्कालीन परिवहनमंत्र्यांना सादर केल्यानंतर २०१६ मध्ये महिलांसाठी ‘अबोली’ रिक्षा रस्त्यावर धावू लागल्या. पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात महिला प्रवाशांना सुरक्षा आणि महिला रिक्षाचालकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांना ‘अबोली रिक्षाच्या प्रणेत्या’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजघडीला सुमारे १,३०० हून अधिक ‘अबोली’ रिक्षा धावत आहेत. खचितच... त्याचे श्रेय हेमांगिनी पाटील यांनाच जाते.
 
 
‘अबोली’ रिक्षाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाल्याने गोरगरीब कुटुंबातील अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू लागल्या.‘आरटीओ’मधील १८ वर्षांच्या सेवेमध्ये पाटील यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अडचणी ऐकून त्या सोडविणे. घरी मुले चुकल्यावर रागावतो. तशीच भूमिका पालक म्हणून कार्यालयामध्येही त्या पार पाडतात. “आपण चौकटीत राहून व्यवस्थित काम केल्यास कोणत्याही क्षेत्रात आपण उंच भरारी घेऊ शकतो. जितके प्रामाणिक राहाल, तितकी चांगली फळे मिळतील,” असेही त्या सांगतात. पुरुषांची मुक्तेदारी असलेल्या परिवहन विभागात वरिष्ठ पदावर काही मोजक्याच महिला अधिकारी आहेत. त्यात हेमांगिनी यांचे काम उजवे आहे. मात्र, “काही गोष्टी आपल्यावरही अवलंबवून असून आपण चौकटीत राहून चांगले काम केल्यास यश मिळविता येते. तेव्हा जास्तीत जास्त महिलांनी परिवहन विभागात यावे. अगदीच कौशल्य नसले तरी, किमान ‘अबोली’चे सुकाणू हाती घेऊन स्वयंरोजगाराकडे वळावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे. वर्दी अंगावर चढली की, आपोआपच कर्तव्य बजाविण्याचे स्फुरण चढते. त्यामुळे कामगिरीलाही बळ मिळते, असे त्या मानतात. सध्या कोरोनाच्या काळातही विविध जबाबदारीची कामे त्यांनी पार पाडली असून आजवर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 
- दीपक शेलार
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@