मनसे पदाधिकारी हत्या : राष्ट्रवादीचे नगरसेवक चौकशीच्या फेर्‍यात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2020
Total Views |
Thane n_1  H x


ठाणे : ठाण्यात सोमवारी दिवसाढवळ्या गोळी झाडून मनसे प्रभाग अध्यक्ष जमिल शेख यांची हत्या करण्यात आली. या पूर्वनियोजित हत्येप्रकरणी मृतकाच्या पुतण्याने राबोडी पोलिसात नोंदविलेल्या जबाबात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या नावाचा उल्लेख केल्याने नगरसेवक मुल्ला चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीच मनसेसह काही सामाजिक संघटनांनी क्लस्टरच्या वादातून हा खून केल्याचा संशय व्यक्त केला होता. दरम्यान, यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण होते.
 
 
ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमिल शेख यांची सोमवारी भरदिवसा राबोडी परिसरात गोळी झाडून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या हेल्मेटधारी दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या हल्लेखोराने शेख यांच्या डोक्यात गोळी झाडली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून राबोडी पोलीस मारेकर्‍यांचा शोध घेत असताना मृतक जमिल शेख याचा पुतण्या फैसल शेख (२९) रा. पहिली राबोडी, याने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात घटनेचा वृत्तांत कथन केला आहे.
 
 
सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बिस्मिल्ला हॉटेलजवळ, डॉ. अन्सारी रोड, दुसरी राबोडी येथे उभा असताना अचानक गोळीचा आवाज आला. दुचाकीवरील एक व्यक्ती कोसळल्याचे दिसले. जवळ जाऊन पाहिल्यानंतर ते, माझे काका जमिल शेख (४९) असुन त्यांच्या डोक्यातून आणि नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसले.त्यांना त्वरित ज्युपिटर रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.हल्लेखोर दुचाकीस्वार आणि गोळी घालणारा साथीदार दोघेही ३० ते ३५ वयोगटातील असल्याचा जबाब फैसल याने नोंदविला.
 
 
पुढे जबाबात फैसल याने, मृतक जमिल याच्यावर 2014 मध्येही जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले. याबाबत राबोडी पोलीस ठाण्यात नोंद असून त्यावेळी मृतक जमिल यांनी राबोडी पोलिसांना केलेल्या तक्रारीत मुख्य सूत्रधार म्हणून राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांचे नाव नोंद करावे, असे तक्रारीत नमूद केल्याचेही फैसल याने जबाबात नमूद केले. मृतक जमिल शेख हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.तर राष्ट्रवादी नगरसेवक नजीब मुल्ला यांचे कट्टर विरोधक होते.
 
मुल्ला यांनी केलेल्या कामाची माहिती, माहितीचा अधिकारात काढुन तक्रार केल्याने मुल्ला यांच्या कामात अडथळे निर्माण होत होते.म्हणूनच काटा काढण्याच्या हेतूनेच नजीब मुल्ला यांनी जमील शेख यांची हत्या करण्याचे कारस्थान केल्याचा दाट संशय असल्याचा जबाब फैसल याने पोलिसांत नोंदविला आहे.त्यामुळे आता नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यासंदर्भात राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आर.एस. शिरतोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
 
सुरज परमार प्रकरणातही आले होते नाव
 
 
दरम्यान, नजीब मुल्ला यांचे नाव यापूर्वी बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणातदेखील आले होते.या प्रकरणी, मुल्ला यांना गजाआड व्हावे लागले होते.त्यामुळे,कायदा व सुव्यवस्थेच्या गमजा मारणार्‍या गृहमंत्र्यांनी या हत्येप्रकरणात निष्पक्ष कारवाई करण्याची मागणी जोर धरीत आहे.
 
मनसे पदाधिकारी हत्येप्रकरणी खरा सूत्रधार शोधावा : प्रवीण दरेकर
 
 
“समाजसेवक व मनसे पदाधिकारी जमिल शेख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करून खर्‍या सूत्रधारांना गजाआड करावे,” अशी विनंती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे. ठाण्यात सोमवारी दिवसाढवळ्या घडलेल्या हत्याकांडाची विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गंभीर दखल घेतली.
ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेबरोबरच शांतता कायम राहावी, यासाठी त्यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करण्याची विनंती केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून खर्‍या सूत्रधारांना गजाआड करावे. तसेच त्यातील कट उघड करावा, अशी विनंतीही प्रवीण दरेकर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.



@@AUTHORINFO_V1@@