प्रिय होऊ सर्वांमध्ये...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2020
Total Views |
 
s_1  H x W: 0 x
 
 
 
साने गुरुजींच्याच शब्दात सांगावयाचे झाल्यास ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे!’ समाज असो की राष्ट्र, त्यात राहणार्‍या प्रत्येक मानवाच्या मनामनात आपले स्थान निर्माण होण्यासाठी मानवाने प्रियव्यवहार करावयास हवा. ज्ञानदानाचे व परोपकाराचे कार्य करणारे विद्वान ब्राह्मण असोत की राष्ट्राचे रक्षण करणारे क्षत्रिय वृत्तीचे शूर सैनिक वा नेतृत्व करणारे नेते.......! या सर्वांमध्ये आपण प्रिय व्हावयास हवे!
 
 
प्रयं मा कृणु देवेषु प्रियं राजसु मा कृणु।
प्रियं सर्वस्य पश्यत उत शूद्र उतार्ये॥ (अथर्ववेद १९/६२/१)
 
 
अन्वयार्थ
 
 
हे परमेश्वरा! तू (मा) मला (देवेषु) विद्वान - देवांमध्ये ( प्रियं कृणु ) प्रिय बनव! (मा) मला (राजसु) राजांमध्ये, क्षत्रियांमध्ये, शूर-वीर सैनिकांमध्ये (प्रियं कृणु) प्रिय बनव! (उत शूद्रे) तसेच शुद्र-सेवक आदींमध्ये आणि (उत आर्ये) श्रेष्ठ जनांमध्ये ही मला प्रिय बनव. त्याचबरोबर (सर्वस्य पश्यत:) मला पाहणार्‍या सर्वांचादेखील मी प्रिय (आवडता) बनू इच्छितो.
 
 
विवेचन
 
 
आज-काल लोकप्रिय होण्यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे. लवकरात लवकर आपण प्रसिद्धीच्या झोतात कसे येऊ आणि सर्वांचे चाहते कसे बनू, याकरिता नानाविध क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. प्रिय होण्यासाठी स्वतःचे बहिरंग सजविण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सर्वांचे प्रिय बनण्यासाठी कोणीही कोणाची स्तुती, प्रशंसा, खुशामदी करत बोलण्यातून किंवा लिखाणांतून अतिशयोक्ती अलंकाराचा प्रयोग करीत एखाद्याला उगीच नको ती संबोधने व पदव्या बहाल करीत त्यांच्या जवळचा होण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर यासाठी कुणी जाहिरातबाजी करतो, कुणी दानधर्म करतो, कुणी राजकारणात येतो, तर कोणी धार्मिक व सामाजिक कार्यातही भाग घेत राहतो, असे नानाविध मार्ग अवलंबिले जातात, लोकप्रिय बनण्यासाठी! त्यांची प्रसिद्धीदेखील होते! पण, अशा या प्रसिद्धी मागे प्रामाणिक दृष्टिकोन असेल तर काही उपयोग नाही. ही सगळी उठाठेव करण्यापेक्षा माणसाने आपल्यातील उत्तम गुणांचा व मानवी मूल्यांचा विकास करावयास हवा. मग तो सर्वांमध्ये आपोआपच प्रिय ठरतो. जी व्यक्ती आपल्यातील सद्गुण वाढीसाठी आणि शीलवंत होण्यासाठी प्रयत्न करीत असते, त्याची प्रसिद्धी आपोआपच होते. स्वच्छ चारित्र्य, दया, क्षमाशीलता, त्याग, सेवा, परोपकार, दानधर्म, सहिष्णुता, वात्सल्य, करुणा, समर्पण, सेवा, परदुःख कातरता यांसारख्या श्रेष्ठ गुणांना अंगीकारत जी व्यक्ती आपले जीवन सर्वदृष्टीने उन्नत बनविते, त्याची ख्याती तर चहुकडे आपोआप पसरते. एका सुभाषितकाराने म्हटले आहे-
 
 
गुणा: कुर्वन्ति दूतत्वं
दूरेऽपि च वसतां सताम्।
केतकीगन्धमाघ्राय स्वयम
आयान्ति षट्पदा: ॥
 
अर्थात, संत व सज्जन लोक हे दूर जरी राहत असले तरी त्यांचे वरील सर्व सद्गुण हे दूतांचे कार्य करतात. जसे की, केतकीच्या फुलांचा सुगंध ग्रहण करण्यासाठी भ्रमर (भुंगे) हे स्वतःहून त्या फुलांकडे धाव घेतात. वरील मंत्रात माणसाने सर्वांमध्ये लोकप्रिय होण्याचा उपदेश केला आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांशी आमचे आपुलकीचे नाते असावे. उच्च नीच, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा कोणताही भेदभाव न बाळगता सर्वांशी प्रिय व्यवहार हीच खरी माणुसकीची भाषा होय. माणूस ओळखण्याचे चिन्ह म्हणजे त्याचे सर्वांशी प्रेमाचे संबंध! समाजात चार प्रकारचे वर्ण कार्य करतात, ते म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र होत. हे चारही वर्ण जन्मानुसार नसून गुण, कर्म स्वभाव व वृत्तींवर आधारलेले असतात. ज्याची जशी वृत्ती तो त्या-त्या वर्णाचा! जन्माशी यांचा काहीही संबंध नाही. कारण, शास्त्रच सांगते - ‘जन्मना जायते शूद्र संस्कारात् द्विज उच्यते।’ समाज व राष्ट्राच्या प्रगतीसाठी अशा या गुणाधारित वर्णांची फारच गरज असते. ती काल होती, आज आहे व भविष्यातील राहील! म्हणूनच या मंत्रात देव, विद्वान (ब्राह्मण), राजवर्ग (क्षत्रिय), व्यापारी इत्यादी भले लोक (वैश्य) व सेवाभावी कर्मचारी मंडळी (शूद्र) या चारही समूहामध्ये आम्ही लोकप्रिय बनावे. सर्वांशी बंधुत्वाचे नाते जोडावे असा मौलिक उपदेश मिळतो. माणसाने जर आपल्या परिसरातील सर्व समाजघटकांशी प्रेमाचे संबंध जोडले नाहीत, तर माणुसकी लयास गेलीच समजा! अप्रिय व्यवहाराने माणूस हा मनुष्य राहत नाही. त्याचा हा दुर्व्यवहार त्याला राक्षसी वृत्तीकडे घेऊन जातो. म्हणूनच माणसाने सर्वांशी प्रिय व गोड वागावे. तो सर्वांचा जवळचा बनावा, याच भावनेपोटी अथर्ववेदातील वरील मंत्र माणसाला सर्वांशी प्रिय व्यवहार करायला शिकवितो. आजच नव्हे, तर अगदी पूर्वापार या संदेशाची फारच प्रासंगिकता दृष्टीस पडते.
 
व्यक्तिगत प्रगतीबरोबरच सामाजिक उन्नयन साधण्यासाठी प्रत्येकाने एक दुसर्‍यांशी मधुर व्यवहार केला पाहिजे. जेणेकरून माणूस हा एक समाजशील प्राणी असल्याचा प्रत्यय येऊ शकतो. हे निश्चितच खरे आहे की, धनाच्या बळावर माणसाला शाश्वत सुख किंवा आत्मिक आनंद मिळवता येत नाही; अन्यथा आज भली मोठी संपदा बाळगणारे व सांपत्तिकदृष्ट्या वैभवाच्या शिखरावर आरूढ होणारे अनेक धनाढ्य लोक दुःख, चिंता, वेदना, निराशा इत्यादीपासून दूर राहिले असते. पण, तसे दिसत नाही. ही सगळी मंडळी आज सर्व काही उपलब्ध असूनही आतून पोखरलेली आहेत. नानाविध दुःखे त्यांना सतावत आहेत. याउलट साधारण परिस्थिती असलेले लोक मात्र आपल्या गरजा मर्यादित ठेवत व अनावश्यक खर्च टाळत सुखाने व आनंदाने जगत आहेत. म्हणूनच तर उपनिषदांमध्ये विदुषी महाराणी मैत्रेयी वैराग्यवृत्ती धारण करणारे आपले यजमान राजे याज्ञवल्क्य यांना म्हणते-
 
‘येन अहं न अमृता स्याम्, तेन (धनेन) किं कुर्याम् इति।’
 
 
म्हणजेच, ज्या धनाद्वारे मला आत्मकल्याण किंवा मोक्षामृत साधता येत नसेल, तर असे धन प्राप्त करून मी काय करू? ही गोष्ट खरी आहे की आपण भौतिक संसाधने ही धनाने प्राप्त करू शकतो, पण सुख व समाधान मात्र कदापि नाही. या साधनांच्या सदुपयोगाने किंवा संपत्तीच्या दानाने थोडेबहुत समाधान लाभते, हे खरे आहे. पण, आंतरिक भावना आणि मनाची उदारता यांद्वारे मानवांबरोबरच प्राणिसमूहाशी केलेला प्रिय व्यवहार हा काही वेगळाच असतो! म्हणूनच प्रेम, स्नेह, सद्व्यवहार, सहिष्णुता, परोपकार या बाबींची समाज व राष्ट्राच्या निर्मितीसाठी फारच गरज असते. थोर महात्मे व संत सुधारकांनीदेखील प्रिय अशा प्रेमपूर्ण व्यवहारालाच ‘खरा धर्म’ संबोधले आहे. साने गुरुजींच्याच शब्दात सांगावयाचे झाल्यास ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे!’ समाज असो की राष्ट्र, त्यात राहणार्‍या प्रत्येक मानवाच्या मनामनात आपले स्थान निर्माण होण्यासाठी मानवाने प्रियव्यवहार करावयास हवा. ज्ञानदानाचे व परोपकाराचे कार्य करणारे विद्वान ब्राह्मण असोत की राष्ट्राचे रक्षण करणारे क्षत्रिय वृत्तीचे शूर सैनिक वा नेतृत्व करणारे नेते.......! या सर्वांमध्ये आपण प्रिय व्हावयास हवे! इतकेच नव्हे, तर समाजात वावरणारे सामान्य कष्टकरी मजूर बांधव, कर्मचारी सेवक असोत की श्रेष्ठ महात्मे व चांगल्या वृत्तीचे लोक असोत. या सर्वांमध्ये मानवाला प्रिय बनावयास हवे. यासाठी अशा प्रकारचा प्रिय व्यवहार सर्वांनी शिकावा की आपल्या चांगल्या व माधुर्यपूर्ण वागणुकीतून आम्ही सर्वांना हवेहवेसे वाटावेत. मग ते वृत्तीने, गुणांनी व आचरणाने ब्राह्मण असोत की क्षत्रिय! अथवा राष्ट्राचे भरण-पोषण करण्यात तल्लीन असलेले व्यापारी, शेतकरी किंवा उद्योजक असोत तसेच सेवाभावी कर्मचारी शुद्र वर्ग असोत किंवा समाजातील इतर भली माणसे! हे सर्व माझेच आहेत, ते वेगळे कदापि असू शकत नाहीत. या सर्वांमुळेच आपला विकास होतोय, मी प्रगती करू शकतो, ही भावना विकसित व्हावयास हवी. माझा देश ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चारही वर्णांमुळे उन्नतीच्या दिशेने वाटचाल करू शकतो. म्हणूनच हे सर्व वर्ण तितकेच महत्त्वाचे असून ते माझे प्रिय आहेत. यांच्याशी मी कधीही भेदभाव बाळगू शकत नाही. कारण, हे सर्व माझ्या राष्ट्ररुपी कुटुंबातील घटक आहेत. मग यांच्याशी मी दुजाभाव किंवा वाईट वर्तन का करू? यांच्याशी मला बंधुत्वाचा आपुलकीचा व्यवहार करावयाचा आहे, जेणेकरून मी त्या सर्वांमध्ये प्रिय होईल! जेव्हा मी या सर्वांशी आपुलकीने व प्रेमाने व्यवहार करेन, तेव्हा त्यांच्या हृदयातदेखील माझ्याप्रति पवित्र प्रेमभावना जागृत होतील आणि ते मला वेगळे न समजता आपलेच समजतील! जगातील प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक मानव इतर पशु किंवा पक्षी हे प्रेमाचे भुकेले आहेत. सर्वांच्या हृदयामध्ये प्रेम व माणुसकीचा झरा वाहतोय. कोणालाही शत्रुत्व नकोसे आहे. वैरभावनांपासून सर्वांनाच दूर राहावेसे वाटते. म्हणूनच प्रिय व्यवहाराचा झरा सतत वाहता राहिला पाहिजे. चला, तर मग वरील मंत्राचा भावार्थ जीवनात अंगीकार करूया व एक दुसर्‍यांचे प्रिय बनून आनंदाने राहूया!
 
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
@@AUTHORINFO_V1@@