दीदींची अशीही दादागिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2020   
Total Views |

mamta bannerjee_1 &n


बिहार निवडणुकीतील नेत्रदीपक विजयानंतर भाजपने आपला मोर्चा आता पश्चिम बंगालकडे वळविला आहे. भाजप अध्यक्षांपासून, गृहमंत्री, पंतप्रधान ते अगदी पन्नाप्रमुख स्तरापर्यंत अगदी नियोजनबद्ध अभियानाला प्रारंभ झाला असून, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची वाळू सरकलायला सुरुवात झालेली दिसते. म्हणूनच की काय, दीदींनी बुधवारच्या आपल्या बाकुंडा येथील रॅलीत, “केंद्र सरकारने हिंमत असेल तर मला अटक करून दाखवावीच. मी, तुरुंगातून निवडणूक लढवेन आणि जिंकूनही दाखवेन.” आता दीदींच्या या वक्तव्याला अतिआत्मविश्वास म्हणायचे की, मनात दाटून आलेली अतिभीती?
 
त्यामुळे दीदी कुठल्याही निवडणुकांपूर्वी जशा सवयीप्रमाणे बिथरतात, तशीच त्यांची गत यंदाही झालेली दिसते. फरक एवढाच की, २०२१ मध्ये साधारण मार्चच्या दरम्यान होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी भाजपने आघाडी घेतल्याने दीदींनीही प्रचारसभांचा धडाका लावला. नेहमीप्रमाणे ममतादीदींच्या टीकेचा रोख होता तो पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे. त्यांच्यावर आसूड ओढत ममतादीदी भाजपबद्दल म्हणाल्या की, “हा राजकीय पक्ष नाही, तर खोट्याचा कचरा आहे.” पण, आता दीदींनी कितीही आरोप केले तरी बंगालची जनता भुलणारी नाही. कारण, दीदींच्या दादागिरीच्या कारभाराला सामान्य बंगाली जनताही तितकीच पिचली आहे. बंगालचे पोलीस दलही तर इतके तृणमूलमय झाले आहे की, कोण पोलीस आणि कोण तृणमूलचे कार्यकर्ते यातील फरकही समजू नये. शारदा, नारदा चिटफंडांच्या भ्रष्टाचाराचे कलंकही त्यांच्या माथी आहेत. शिवाय, शेकडो भाजपच्या कार्यकर्त्यांच्या रक्तानेही दीदींचे हात रंगले आहेत. त्यामुळे राज्यात विकासाचे कुठलेही नामोनिशाण नसून तृणमूलच्या गुंडाराजपुढे कोणाचेच काही चालत नाही. खुद्द राज्यपालांनाही जिथे सुरक्षित वाटत नाही आणि त्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखविली जाते, तिथे सामान्यांची काय गत? घमेंडखोर दीदींना बोलण्याचे तारतम्य यापूर्वीही कधीच नव्हतेच आणि आता तर फक्त प्रचाराची सुरुवात आहे. तेव्हा, आगामी काळात दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतील, टीकेची झोड उठेल आणि राजकीय हेवेदाव्यांचा धुराळा उडेल; पण बंगालची जनता सुज्ञ असून, ती दीदींच्या हेकेखोरीला यंदा नक्कीच उखडून फेकेल!
 
 
अबकी बार बंगाल...
 
 
‘अबकी बार बंगाल, हो सके तो संभाल’ म्हणत भाजपने आपली पूर्ण ताकद पश्चिम बंगालच्या निवडणुकीत केंद्रीत केली आहे. विधानसभेच्या २९४ जागांपैकी २०० हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने व्यक्त केला असून, हे ध्येय साध्य करण्यासाठी तितकीच दमदार यंत्रणा मैदानातही उतरवलेली दिसते. डिसेंबरपासून भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डाही बंगालच्या दौऱ्यावर असून त्यांनीही बंगाल जिंकण्यासाठी ‘मिशन २०० प्लस’चे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्यातच कित्येक तृणमूल काँग्रेसचे नेते, आमदार हे ममतादीदींच्या कारभाराला कंटाळून तृणमूल काँग्रेलसा सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये रवींद्रनाथ भट्टाचार्यजी, शुभेंदु अधिकारी यांसारख्या तृणमूलच्या ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश आहे, हे विशेष. त्यातच बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात असून सौरव गांगुली यांचेही नाव या शर्यतीत चर्चेत आहे.
 
तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जींव्यतिरिक्त सभेला गर्दी खेचू शकणारे नेतेही अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत. त्यात तृणमूल काँग्रेस हा तसा तळागाळात रुजलेला पक्ष असला जरी कार्यकर्त्यांच्या लुटारी वृत्तीमुळे हा पक्षही हळूहळू आपला जनाधार गमावताना दिसतो. याउलट भाजपने आपल्या गेल्या काही वर्षांपासून आपल्या संघटनावर जोर दिला असून त्याचे सकारात्मक परिणाम लोकसभा निवडणुकीतही दिसून आले. काँग्रेस आणि कधीकाळी बंगालवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या डाव्यांचीही आज या राज्यात बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे बिहारप्रमाणेच ‘हाता’त ‘कोयता’ घेऊन बंगालमध्येही ते एकत्रित निवडणुका लढविणार आहेत. बिहारमध्ये पाच जागा खिशात घालत, सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेल्या एमआयएमने बंगालमध्येही आपली ताकद आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. ममतांच्या तृणमूलचा मोठा आधार असलेल्या मुस्लीम व्होटबँकेला एमआयएममुळे मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे ममतादीदींना यंदाची निवडणूक जिंकणे हे निश्चितच सहजसोपे नाही. त्यात भारतीय जनता पक्षाचे कोरोना काळातील काम हे पुरेसे बोलके ठरावे. नरेंद्र मोदींचा करिष्मा आणि अमित शाह यांची तृणमूलला बंगालमधून पूर्णपणे उखडून टाकण्याची चाणक्यनीती, यामुळे ममतादीदींच्या निरंकुश सत्तेला अंकुश बसेल, तो दिवस आता दूर नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@