धन्य ते गायनी कळा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2020
Total Views |

Samarth Ramdas Swamy_1&nb
 
 
समर्थ संप्रदायातील प्रत्येक शिष्य ज्ञानोपासक, कर्मयोगी तर असावाच; पण, त्याने चारित्र्य संपन्नतेचा आदर्श समाजासमोर ठेवला पाहिजे, असा समर्थांचा आग्रह असे. याचा अर्थ तत्कालीन इतर संप्रदायांत चारित्र्याला फारसे महत्त्व दिले जात नव्हते, असा होत नाही आणि तसा तो कोणी काढूही नये. इतर संप्रदायातील शिष्यवर्ग चारित्र्यसंपन्न होता, भक्तिमार्गात आणि परमार्थ क्षेत्रात चारित्र्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे तर खरे, पण इतर संप्रदायातील शिष्यांकडून समाजाचे नेतृत्व करण्याची अपेक्षा नव्हती. समर्थ संप्रदायातील शिष्यांनी चारित्र्यसंपन्न असावे, असा समर्थांचा आग्रह यासाठी होता की, त्या शिष्यांना महंत म्हणून लोकोद्धारासाठी दूरवरच्या मठात पाठवल्यावर त्यांना जनसमुदायात जाऊन काम करावे लागे. अशावेळी या पुढारी महंताचे चारित्र्य उत्तम असून त्याने भ्रष्टाचारापासून दूर राहिले पाहिजे. ते त्यांच्या आणि संप्रदायाच्या हिताचे होते. महंताचे निष्कलंक चारित्र्य पाहून समुदायातील लोक त्यांचे अनुकरण करु लागतील. अशा शुद्ध आचरण असणाऱ्या लोकांना भक्ती, ज्ञान, प्रपंचविज्ञान म्हणजे राजकारण यांचे शिक्षण देणे सोपे जाईल, असा समर्थांचा कयास होता. सत्त्वगुणांच्या आधारावर लोकसंग्रह करण्याची स्वामींची कल्पना सर्वहितकारक होती. ती लोकांच्या व राष्ट्राच्या हिताची होती.
 
समर्थ संप्रदायातील शिष्यांच्या ठिकाणी ज्ञानोपासना व इतर कलागुण असले पाहिजेत, पण लोकोद्धाराच्या कामासाठी सक्षम व्हावे म्हणून त्यांना ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करण्याची आवश्यता होती, हे आपण मागील लेखात पाहिले आहे. शिष्याने शाश्वत निगुर्र्ण ब्रह्मतत्त्व जाणल्यावर त्याला कशाचीही भीती राहणार नाही, असा स्वामींचा विचार असावा. त्यामुळे ते ब्रह्मज्ञानाविषयी आग्रही होते. मायेच्या आच्छादनाखालील ब्रह्माचा निवाडा झाल्यावर शिष्याच्या मनातील दडपण कमी होते. दृश्य जगतात दिसणारी अशाश्वत असलेली, पण खरी वाटणारी माया आणि शाश्वत स्वरुपात वावरणारे ब्रह्म याची नीट कल्पना आल्यावर माणसाच्या ठिकाणी भय राहत नाही. त्यामुळे ‘आता होणार ते होईना का आणि जाणार ते जाईना का’ अशी निर्भीड अवस्था साधकाला अनुभवता येते. समुदायात काम करणाऱ्या पुढाऱ्यासाठी अशाच निर्भयतेची आवश्यकता असते. अध्यात्मात असे मानले जाते की, पूर्ण ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर माणसाला मृत्यूचे भय राहत नाही. असे असले, तरी जन्म-मृत्यू या कल्पना पूर्णपणे मनातून काढून टाकणे हे सहजासहजी जमत नाही. त्यासाठी काही काळ जावा लागतो. तोपर्यंत मृत्यूची कल्पना साधकाला मधूनमधून भेडसावत असते. अशावेळी सद्गुरु हा मोठा आधार असतो. जन्म-मृत्यूची आशंका पूर्णपणे तुटत नाही, तोपर्यंत सद्गुरु सांगतील, त्याप्रमाणे वागणे व ते सांगतील ती साधना करीत राहणे, हे साधकाच्या हिताचे असते. त्यामुळे समर्थ संप्रदायातील शिष्य रामदास स्वामींच्या सूचना कटाक्षाने पाळणारे होते. परिणामतः संप्रदायात स्वार्थी, भ्रष्टाचार असल्या अवगुणांना जागा नव्हती.
 
समर्थ संप्रदायात लोकोद्धारासाठी काम करणारे शिष्य धैर्यवान तर असले पाहिजेत, पण समुदायात राहून काम करण्यासाठी त्यांच्या ठिकाणी काही गुण व कला असणे आवश्यक होते. संप्रदायातील प्रत्येकाने कीर्तन आणि गायन या कला आत्मसात केल्या पाहिजेत. कारण, या गुणांनी त्यांना लोकांना आकर्षित करता येईल व त्यांच्या मनात ईश्वरप्रेम, भक्ती निर्माण करता येईल, असे समर्थांचे सांगणे असे. संन्यस्तवृत्तीने पाहणारे समर्थ विरक्त, वैरागी असले तरी ते अंतःकरणाने रसिक होते. गायन कलेवर त्यांचे प्रेम होते. त्यांनी लिहिलेल्या ‘धन्य ते गायनी कळा’ या काव्यावरून ते स्पष्ट होते. गायनकला ही अशी आहे की, त्यात देश-काळाचे बंधन राहत नाही. गायन हे सर्वांना आवडते. चांगली गायनकला अवगत असेल, तर त्याद्वारा लोकांना प्रेमाने भजन करायला लावता येते. त्यातून भगवंताची कीर्ती वाढते. लोक राजी राहतात. म्हणून मी देवाची कीर्ती गायनातून वर्णन करतो, असे स्वामी म्हणतात. यासाठी गायनकला धन्य होय.
धन्य ते गायनी कळा।
सर्व सद्या मनोरथा ।
विदेश पाहता नाही ।
धन्य ते गायनी कळा ॥
राहती लोक राजी ।
आवडी उपजे मनीं ।
वर्णितो कीर्ति देवाची।
धन्य ते गायनी कळा ॥
येथे स्वामींच्या ठिकाणची रसिकता दिसून येते. समर्थ ज्ञानी होते, विद्वान होते, पण विद्वज्जड नव्हते. स्वामींनी संप्रदायासाठी सांगितलेल्या 20 लक्षणांत गायन व नृत्य या कला समाविष्ट केल्याचे आपण मागे पाहिले आहे. या गायन कलेने देवाचे वैभव वाढवता येते. श्रोत्यांची मने जिंकता येतात. यासाठी रामदासी महंताला रामोपासना व ईश्वरभक्ती वाढवण्यासाठी गायन कला आवश्यक होती. समर्थ नुसता उपदेश करीत नसत, तर ‘आधी केले मग सांगितले’ अशी त्यांची वागण्याची पद्धत होती.
समर्थांना स्वत:ला गायनाची उत्तम जाण होती. समर्थ विरक्त असूनही गायनाचा आणि संगीताचा आनंद घेणारे रसज्ञ होते. विरक्त संत असल्याने त्यांच्या अंगची रसिकता ही सर्वव्यापी झाली होती, त्यांच्या मते, रामकथा ब्रह्माण्ड भेदून पैलाड न्यावी, त्यासाठी व ईश्वरभक्तीकडे लोकांची मने वळवण्यासाठी गायनासारखे, संगीतासारखे दुसरे साधन नाही, असे समर्थ सांगतात.
येकांकी महंती येते ।
उदंड कीर्ति वाढते।
विख्यात सकले लोकी।
धन्य ते गायनी कळा॥
रामदास स्वामी स्वत: उत्तम कीर्तन करीत असत, त्यांना गाण्याची आवड होती, तसेच ते उत्तम गातही असत आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांना स्वत:च्या रचना गाऊन दाखवत असत, अनेक रागांतील त्यांनी लिहिलेली पदे उपलब्ध आहेत. त्यांच्या पदात, कल्याण, कामोद, भूप, अहेरी, जयजयवंती, धनाश्री, मारु, केदार, बिहाग, सोहनी, कानडा, भैरव इत्यादी रागांतील त्यांच्या रचना प्रसिद्ध आहेत, स्वामींचा आवाज गोड आणि खडा होता. त्यामुळे त्यांच्या रचना कीर्तनातून त्या त्या रागात गाताना श्रोते त्यांच्या गायनात तल्लीन होऊन जात, तीर्थाटनाच्या काळात समर्थांनी सारा हिंदुस्थान पायी फिरुन न्याहाळला. ते जातील तेथे त्यांच्या कीर्तनात श्रोते मंत्रमुग्ध होत असत. उत्तर हिंदुस्थानातील बहुतेक प्रांतांची भाषा हिंदी होती. स्वामींना उत्तम हिंदी भाषा अवगत होती, तेथे त्यांनी हिंदी भाषेतून कीर्तने केली होती. त्यासाठी त्यांनी लिहिलेली हिंदी पदेही उपलब्ध आहेत, त्यातील काही पदे खमाज, काफी, सारंग, मुलतानी, मारु इत्यादी रागांत लिहिलेली आढळून येतात. त्यातून त्यांची रसिकता तसेच गायनाचे व संगीताचे ज्ञान स्पष्ट होते, धन्य ते रामदासस्वामी!
आणि धन्य ते गायनी कळा!
 
- सुरेश जाखडी
 
 
@@AUTHORINFO_V1@@