वैदिक सणांचे योग रहस्य भाग - ५

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2020
Total Views |

Narak Chaturthi_1 &n
 
नरक चतुर्दशी
 
 
नरक चतुर्दशीपासून दीपावली सुरू होते. मोठ्या पहाटेस भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदिवासात असलेल्या १६,१०० स्त्रियांना मुक्त केले आणि हस्तिनापुराला परत आले. परंतु, नरकासुराला मारल्यामुळे त्याचे नरकतुल्य रक्त श्रीकृष्णार्जुनांच्या अंगावर सांडल्याने त्यांनी मोठ्या पहाटेसच अभ्यंगस्नान केले आणि ते नरकासुराच्या पापातून मुक्त झाले. चतुर्दशीलाच त्यांनी असले अभ्यंग स्नान केल्यामुळे तेव्हापासून आपण नरक चतुर्दशीला मोठ्या पहाटे उठून सूर्योदयापूर्वीच स्नान करतो आणि जो असे ब्राह्ममुहूर्ती स्नान करणार नाही त्याच्या अंगावर नरक पडेल असे मानतो. कथेच्याच दृष्टीने विचार केल्यास असे दिसून येईल की, नरकासुराला मारले श्रीकृष्णार्जुनांनी व त्याचे नरकतुल्य रक्त त्यांचे अंगावर सांडले. पण, त्याबद्दल शुद्ध होण्याकरिता त्यांनीच स्नान करावयास हवे. पांडवांचा काळ आजपासून सहा सहस्र वर्षांपूर्वीचा मानल्यास त्यांनी तसले अभ्यंगस्नान सहा सहस्र वर्षांपूर्वीच केले. आता त्यांच्या त्या अभ्यंग स्नानाची उसनी ऐट आम्हाला दरवर्षी आणायची काय आवश्यकता? नरक चतुर्दशीचे साधनाशास्त्र समजण्याकरिता आम्हाला त्यातील प्रत्येक शब्दाचा सखोल साधना अर्थ समजावा लागेल.
 
 
साधकाच्या शरीरात ज्या सहस्रावधी म्हणजे ठोकळमानाने १६,१०० योगनाड्या असतात, त्या अत्यंत प्राकृतिक असल्या की, त्याद्वारे प्रत्येक जीवात्मा या अनंत विश्वातील शक्तिप्रवाह ‘कर्षण करून’ आपली जीवनयात्रा चालवत असतो. या नाड्या मोकळ्या म्हणजे प्रकृतिस्थ असतील तरच हे कर्षण सहज सुलभ होऊन जीवात्मा अधिक उत्क्रांत होत जातो. असल्या प्रकृतिस्थ शरीरातील जीवात्म्यालाच श्रीकृष्ण असे म्हणतात, ‘कर्षति इति कृष्ण:’ साधकाची असली परमसंपन्न अवस्था म्हणजेच भगवान श्रीकृष्ण होत. परंतु तसल्या शुद्ध आणि योग्य कर्माला उत्तेजन देणारी साधकाची जी उत्क्रांतवृत्ती तिला अर्जुन असे म्हणतात. वेदात हा ‘अर्जुन’ आणि ‘अर्जुनी’ शब्द बरेचवेळा आला आहे आणि त्याचा प्रत्येक वेळेस अर्थ वरीलप्रमाणेच आहे. तोच अर्थ वास्तविक आपण घ्यायला हवा. या अर्थाने ती अर्जुन उत्क्रांतवृत्ती सहासहस्र वर्षांपूर्वी न होता आजही प्रत्येक प्रयत्नशील साधकाच्या रूपाने जीवंतच आहे. मग भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन जर आजही आपल्याद्वारे जीवंत असतील, तर नरकासुराचे राज्यही आपल्यातच असायला पाहिजे, हे खरे आहे. असाधकावस्थेतील शरीराच्या योगनाड्या शुद्धावस्थेत नसल्याने प्रवाहित नसतात. त्या आपल्या वाईट कर्माने तुंबल्या असल्याने त्यातून विश्वाच्या प्राकृतिक शक्तिकर्षण केल्या जात नाहीत आणि साधकाचे शरीर तुंबलेल्या घाण पाण्याप्रमाणे जागच्या जागी नरकाप्रमाणे सडत राहते. न सरकणारा तो नरक, म्हणजे जड अज्ञानमय जीवन जगणारे मानवी शरीर, म्हणजे नरकासुर होय. परंतु, साधकाला असले नरकतुल्य शरीर घेऊन साधनेत प्रगती करता येईल का? सावध साधक आपल्या प्रेरणाशक्तीने आपल्या शरीराला साधनेद्वारे अत्यंत प्राकृतिक करून त्यातील नरकासुराला मारतो. वाईट सवयींचा नायनाट करतो. सावध साधक म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि त्याची प्रेरणा देणारी उत्तेजक शक्ती म्हणजे अर्जुन होय.
 
 
शरीरातील नरकासुराचा नाश म्हणजे वध झाल्यावर साधकाच्या शरीरातील ज्या १६,१०० नाड्या नरकासुराच्या बंदिवासात सडत पडल्या होत्या, त्या भगवान श्रीकृष्णाच्या परम प्रतापाने मुक्त होऊन पुन्हा प्राकृतिक झाल्या. त्यातून विश्वशक्तीचे कर्षण पूर्ववत झाल्यामुळे त्या नाड्या भगवान श्रीकृष्ण रूपी साधकाला नाहीतर कोणाला वरणार? भगवान श्रीकृष्णाने अशा तर्‍हेने नरकासुराच्या बंदिवासातील १६,१०० कुमारिका मुक्त करून त्यांच्याशी लग्न केले. साधकाच्या त्या परमपावन क्षणाचे स्मरण म्हणजेच ही नरक चतुर्दशी होय. नरकासुराला श्रीकृष्णार्जुनांनी मोठ्या पहाटे मारले. योगिजन मोठ्या पहाटेसच साधना करीत असतात. नरकासुराने इतक्या सहस्रावधी संख्येत देशोदेशीच्या कुमारिकांचे अपहरण करावे आणि त्या काळातील पराक्रमी आर्यांनी त्यांचा तो नंगा नाच उघड्या डोळ्यांनी पाहावा का? त्यावेळचे महान पराक्रमी आर्य पराक्रमहीन झाले होते? मग या नरकासुराने कोणत्या कुमारिकांना पळवून डांबून ठेवले? साधकाच्या शरीरातील असंख्य योगनाड्या म्हणजेच त्या १६,१०० कुमारिका होत, भगवान श्रीकृष्णाच्या १६,१०० आणि त्यापूर्वीच्या आठ स्त्रिया (अष्टांगयोग) मिळून आता श्रीकृष्णाला १६,१०८ स्त्रिया झाल्या. परकीय लोक तर आमच्या अशा १६,१०८ स्त्रियांचा दादला असलेला परमेश्वर पाहून आमच्या धर्मकल्पनांची थट्टा करतात. याचे कारण भगवान श्रीकृष्ण म्हणजे कोण? त्यांनी सोडविलेल्या १६,१०० स्त्रिया म्हणजे कोणत्या? याचे आम्हाला पूर्ण अज्ञान आहे. ‘शिवो भूत्वा शिवं यजेत’ जीवनभर कठोर साधनांचे कष्ट उपसावे लागतात, तेव्हा कोठे साधना पदरी पडतात. योगी वा सत्पुरुषाचे सोंग आणून कोणीच संत-महात्मे बनू शकणार नाही. त्यामुळे फार फार तर असले भोंदू बुवा चार दोन वा अधिक लोकांना आपल्या भजनी लावतील. अध्यात्मात साधकाचा जर कोणता मोठा शत्रू असेल, तर तो ढोंग आणि फसवणूक होय. असले धूर्त पुरूष समाजाला फसवून पर्यायाने स्वतःचीच फसगत करीत असतात आणि शेवटी स्वतःमध्येच एक अत्याधुनिक नरकासुर उत्पन्न करीत असतात. असल्या नरकासुरांना मारणे हेच श्रीकृष्णाचे कर्तव्य होय. जागृत तरुणांनी असल्या ढोंगी, कीर्ती आणि धनपरायण बुवा महाराजांना वठणीवर आणण्यास सदैव तत्पर असावे.
 
 
संक्रांती
 
 
आत्मज्ञान अथवा परमेश्वर प्राप्ती हेच खरे सौभाग्य आणि संपदा होय. संक्रांतीच्या दिवशी याच आत्मज्ञान प्राप्तीकरिता असलेल्या अवस्था वस्तूंची समक्रांती होत असते. प्रत्येक जीवाचे अस्तित्व दोन अवस्थांद्वारे असते आणि त्या अवस्थांची उत्तम कर्मानुसार उत्क्रांती होत असते. त्या दोन अवस्था म्हणजे एक आपले जड शरीर व दुसरा आपला जीवात्मा होय. शरीराच्या उत्क्रांतीचा जीवात्म्यावर परिणाम होऊन जीवात्मासुद्धा उत्क्रांत होत असतो आणि जीवात्म्याच्या उत्क्रांतीचा परिणाम शरीरावर होऊन शरीरसुद्धा पूर्वीपेक्षा अधिक उत्क्रांत होत असते. पण, त्या अगोदर त्या उत्क्रांतीकरिता साधकांतील कुंडलिनी जागृत व्हावी लागते. या कुंडलिनी जागृतीचे पर्व म्हणजेच साधक जीवनातील संक्रांत होय. या आध्यात्मिक संक्रांतीचे म्हणजेच कुंडलिनी जागृतीनंतर येणार्‍या जडशरीराच्या व आंतरिक अनुभवांच्या घटनांचा उल्लेख ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात केला आहे. असल्या समक्रांतीद्वारे साधकांचा पिंड म्हणजे शरीर व आत्मा अतिशय उत्क्रांत होऊन साधक त्यापलीकडील भव्यदिव्य अशा आध्यात्मिक जीवनात प्रवेश करतो. त्याला आता स्वर्गाचे व्दार मोकळे झालेले असते, कुंडलिनी जागृतीद्वारे! असल्या जागृतीला नवजीवनांची संक्रांत म्हणतात.
(क्रमशः)
 
 
 
- योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@