पारधी समाजातील पहिली ‘डॉक्टरेट’ महिला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2020   
Total Views |

Dr_1  H x W: 0
 
मळलेली वाट, त्या चौकटी सगळे लांघून डॉ. शुभांगी चव्हाण यांनी स्वत:चे अस्तित्व निर्माण केले, स्वत:बरोबरच पारधी समाजाचे नावही उज्जवल केले. पारधी समाजामध्ये पहिली डॉक्टरेट मिळवणाऱ्या डॉ, शुभांगी चव्हाण यांच्या जीवनाचा घेतलेला हा मागोवा..
 
 
आर्थिक आणि सामाजिक विषमता हा आपल्या समाजासाठी आणि पर्यायाने देशासाठी कलंक आहे. हा कलंक मिटविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान द्यायला हवे. माझ्या आयुष्यात मला यासाठीच काम करायचे आहे. नव्हे, हे माझे कर्तव्य आहे.” डॉ. शुभांगी चव्हाण सांगत होत्या. डॉ. शुभांगी चव्हाण यांनी हे विधान करणे याला महत्त्व आहे. त्या पारधी समाजातील पहिल्या ‘डॉक्टरेट’ मिळविलेल्या महिला आहेत. समाजातील पहिली महिला ‘डॉक्टरेट’ होण्यासाठी २०१९-२०२० साल उजाडावे लागले. यातच समाजाच्या एकंदर वंचित परिस्थितीची जाणीव होते.
 
 
असो. मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील घिरणे गावातील श्रीराम सिंग आणि कामिनाबाई या दाम्पत्याला तीन अपत्ये. दोन मुले, एक मुलगी. ती मुलगी म्हणजे शुभांगी होय. त्यावेळी हे कुटुंब मुंबईच्या गोरेगावमधील एका झोपडपट्टीत राहायचे, श्रीराम हे एका खासगी कंपनीत कामाला होते. या काळात श्रीराम यांनी मूळ गावात थोडी शेतजमीन खरेदी केली, पुढे कंपनी गोवा येथे स्थानांतरित झाली. त्यामुळे श्रीराम आणि कुटुंबही गोव्याला गेले. अचानक श्रीराम जिथे काम करायचे ती कंपनी बंद पडली. पैशांची मारामार निर्माण झाली. इतकी की एकवेळचे अन्न बनवायलाही पैसे घरी नसायचे. शेवटी श्रीराम यांनी निर्णय घेतला की, मूळ गावी जायचे. तिथे शेती करायची. मात्र, श्रीराम आणि कामिनाबाई तसेच मुलांना शेतीची कामे करता येत नव्हती. शून्यातून पुन्हा सगळे सुरू करायचे होते. मात्र, श्रीराम आणि कुटुंबीयांनी हार मानली नाही. जिद्दीने आणि मेहनतीने उपलब्ध माहितीद्वारे शेतात भाजीपाला पिकविला, त्यावेळी शुभांगी लहान होत्या. आईवडिलांचे कष्ट त्या पाहत असत, शेतजमिनीच्या तुकड्यात भाजीपाला पिकविण्यासाठी आईबाबा रात्रंदिवस एक करायचे. पिकलेला भाजीपाला शुभांगी यांचे भाऊ पहाटे ४ वाजताच बाजारात विकायला नेत, तर आई शेतीबरोबरच कोंबड्याही पाळू लागली. पण, इतके सगळे करूनही दोन वेळचे जेवण मिळविण्याइतकेच उत्पन्न मिळे.
 
 
शुभांगीने शिकावे, असे श्रीराम यांना वाटे. शुभांगी मग शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी गेल्या, तिथे त्यांच्या गावातले जोगी समाजाचे जोगी सर राहत. शुभांगी त्यांच्याकडे राहू लागल्या. पुढे पाचवीला त्या नवोदय विद्यालयाची परीक्षा पास झाल्या आणि दहावीपर्यंत त्यांचे नवोदय वसतिगृह विद्यालयामध्ये मोफत शिक्षण सुरू झाले. वसतिगृहामधली शिस्त, नियम अंगवळणी पडली. आपल्या वैयक्तिक लाडकोड आणि हौसमौजेपेक्षा आपले शिक्षण महत्त्वाचे हे त्यांना लहाणपणीच कळून चुकले. त्यामुळे पुस्तक नाहीत, कपडे नाहीत, अशा परिस्थितीमध्ये त्यांचे शिक्षण सुरू झाले. मला हे नाही मिळाले, ते नाही मिळाले, असा हट्ट काय, साधा उच्चारही त्यांनी कधी आईवडिलांकडे केला नाही. कारण, एकच की समाजात मुलींचे शिक्षण दैवदुर्लभ गोष्ट होती, समाजातले जेष्ठ किंवा इतर शुभचिंतक श्रीराम यांना सांगत असत की, मुलींना शिकून काय करायचे? लग्न लहान वयातच करून टाका. पण, कुणालाही न जुमानता श्रीराम आणि कामिनाबाईंनी शुभांगी यांना शिक्षणासाठी मुक्त आकाश दिले. आईबाबांचे हे मोठेपण शुभांगी यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले. डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी, असे त्यांना वाटे. मात्र, ‘सीईटी’मध्ये थोड्या गुणांसाठी संधी हुकली. खासगी महाविद्यालयात शिक्षण घेणे परवडणारे नव्हते, त्यावेळी श्रीराम शुभांगी यांना म्हणाले, “नाराज व्हायचे नाही, थांबायचे नाही, तुला खूप शिकायचे आहे.”
 
 
वडिलांच्या बोलण्याने शुभांगी यांचा हुरूप वाढला. त्यांनी ‘बीएसी अ‍ॅग्रिकल्चर’ शिक्षण सुरू केले. स्पर्धा परीक्षा दिल्या, लेखी परीक्षा पास झाल्या. मात्र, मुलाखतीमध्ये गुण कमी मिळत. मग त्यांनी ‘एमएसी अ‍ॅग्रिकल्चर’ शिक्षण घेऊन पुढे ‘डॉक्टरेट’ करण्याचे ठरविले, वैद्यकीय डॉक्टर नाही तर संशोधनातला डॉक्टर व्हावे, हा मानस ठरविला. ‘कृषी विस्तार शिक्षण’ या विषयावर त्यांनी ‘डॉक्टरेट’ केली. त्यामध्ये पालघर आणि नाशिक येथील आदिवासी शेतकर्‍यांची शेती आणि विशिष्ट योजना यावर त्यांनी संशोधन केले. त्यांचे पती नीरज चव्हाण हे शैक्षणिक क्षेत्रात, तसेच आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी समाजकार्य करतात. शुभांगी म्हणतात, “माहेर आणि सासर दोघांनीही मला नेहमीच प्रेरणा दिली. सहकार्य केले. माता सावित्रीने कठीणकाळात शैक्षणिक सेवेचा हिमालय निर्माण केला. ते मला नेहमीच आदर्श वाटते. पारधी समाजामध्ये मुलींच्या शिक्षणावर मला काम करायचे आहे. सामाजिक आणि आर्थिक विषमता संपलीच पाहिजे.” पारधी समाजातील ‘डॉक्टरेट’ मिळविणारी पहिली महिला म्हणून डॉ. शुभांगी चव्हाण यांचे अभिनंदन. त्यांच्या माहेरच्या आणि सासरच्यांचेही अभिनंदन.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@