सह्याद्रीच्या खोऱ्यातून माशाच्या नव्या प्रजातीचा उलगडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2020
Total Views |
fish _1  H x W:


रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील नद्यांमध्ये अधिवास 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रत्नागिरीतील काजली नदीच्या प्रवाहातून माशाच्या नवीन प्रजातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. 'फिलामेंट बार्ब्स' असे सामान्य नाव असणाऱ्या 'डाॅकिन्सिआ' कुळातील या नव्या माशाचे नामकरण 'डाॅकिन्सिआ उत्तरा' असे करण्यात आले आहे. या संशोधनामुळे कोकण किनारपट्टीवरील खाऱ्या पाण्यातील सागरी जैवविविधतेबरोबरच सह्याद्रीच्या खोऱ्यातून वाहणाऱ्या गोड्या पाण्याच्या नद्यांमधील जैवविविधताही समृद्ध असल्याचे अधोरेखित झाले आहे. 
 
गोड्या पाण्याचा पुरवठा करणारे स्त्रोतही जैवविविधतेचे भांडार असतात. मानवाबरोबरच अनेक नानाविध जीव या परिसंस्थेवर अवलंबून आहेत. खाऱ्या पाण्यातील माशांबरोबरच गोड्या पाण्यातील माशांमध्येही वैविध्य आढळते. याच वैविध्याचा पुरावा नव्या प्रजातीच्या शोधामुळे समोर आला आहे. 'डाॅकिन्सिआ' कुळातील 'फिलामेंट बार्ब' गटामधील माशांच्या समूहाचा अधिवास भारत आणि श्रीलंकेतील नद्यांमध्ये आढळतो. शोभिवंत मत्स्यपालनाच्या जागतिक व्यवसायामध्ये 'फिलामेंट बार्ब' माशांचा समूह लोकप्रिय आहे. या समूहामध्ये आता नव्या प्रजातींची भर पडली आहे. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे (बीएनएचएस) आणि 'केरळ युनिव्हर्सिटी आॅफ फिशरीज अॅण्ड स्टडीज'च्या (केयूएफओएस) संशोधकांनी रत्नागिरीच्या काजली नदीमधून 'डाॅकिन्सिआ' कुळातील नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. या शोधामध्ये 'बीएनएचएस'चे शास्त्रज्ञ व 'केयूएफओएस'चे पी.एच.डीचे विद्यार्थी उन्मेष कटवाटे, ज्येष्ठ सागरी संशोधक व 'बीएनएचएस'चे प्रभारी संचालक डाॅ. दीपक आपटे आणि 'केयूएफओएस'चे प्राध्यपक राजीव राघवन यांचा समावेश आहे. शुक्रवारी या शोधाचे वृत्त ‘वर्टिब्रेट झूलाॅजी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालीकामध्ये प्रकाशित करण्यात आले. 


fish _1  H x W: 
 
संशोधक उन्मेश कटवाटे यांच्या आईच्या नावाकरुन या प्रजातीचे नामकरण 'डाॅकिन्सिआ उत्तरा' असे करण्यात आले आहे. शिवाय उत्तर पश्चिम घाटामधून या प्रजातीचा उलगडा झाल्याने 'उत्तरा' हे नाव या मत्स्य प्रजातीला साजेसे आहे. तसेच यापुढे या प्रजातीचे सामान्य नाव ‘नॉर्दर्न फिलामेंट बार्ब’ असे असेल. 'फेलामेंट बार्ब' या मत्स्य समूहामधून उलगडण्यात आलेली 'डाॅकिन्सिआ उत्तरा' ही तेरावी प्रजात आहे. या प्रजातीचा अधिवास सध्या केवळ महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजली, तेरेखोल आणि जगबुडी नद्यांमध्ये आहे. या नवीन संशोधनामुळे पश्चिम घाटाच्या गोड्या पाण्यातील जैवविविधतेच्या संवर्धनास प्राधान्य मिळाले असूून येथील गोड्या पाण्याचे स्त्रोत वाचवण्याची आवश्यकताही अधोरेखित झाल्याचे मत डाॅ. दिपक आपटे यांनी मांडले. तसेच पश्चिम घाटामधील नद्यांची परिसंस्था गोड्या पाण्यातील माशांच्या विविधतेचे केंद्र असून पश्चिम घाटातील वाढत्या मानवी अतिक्रमणापासून ही परिसंस्था वाचविणे आवश्यक असल्याचे राजीव राघवन यांनी सांगितले. 
 
 
 
'डाॅकिन्सिया' कुळातील 'फिलामेंट बार्ब' या मत्स्यसमूहातील नव्या प्रजातींचा शोध घेणे कठीण आहे. कारण या समूहातील प्रजाती एकसारख्या दिसतात. मात्र, 'डाॅकिन्सिआ उत्तरा' या प्रजातीचे संशोधन एकात्मिक वर्गीकरणाच्या दृष्टीकोनातून केल्याने या प्रजातीचे वैशिष्ट्ये समोर आली आहेत. ज्यामुळे या समूहातील माशांचे वैविध्य समजून घेण्यास मदत होणार आहे. - उन्मेष कटवाटे, संशोधक
 
 
@@AUTHORINFO_V1@@