तरुणाईशी संवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2020
Total Views |

young_1  H x W:
 
 
तरुणाईशी संवाद मला माहीत नाही, माझे शब्द, माझे म्हणणे तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही? कारण, तुम्ही सगळे मोबाईलच्या प्रेमात आकंठ बुडून गेलेले असाल. कुणी व्हिडिओ गेम्स खेळण्यात, कुणी व्हिडिओ बघण्यात, कुणी मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग करण्यात, तर कुणी सेलिब्रिटीजना फॉलो करण्यात मग्न असाल. त्यामुळे या मान्यवर दैनिकातून मांडलेले माझे म्हणणे वाचायला कदाचित आपल्याला सवड होणार नाही. पण तरीही मित्रत्वाच्या नात्याने तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या सगळ्या व्यस्ततेतून वेळ मिळाला तर हा संवाद अवश्य वाचा. कारण, हा लेख तुमच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण वर्षांशी जोडलेला आहे.
 
तुमची पिढी अतिशय भाग्यवान आहे. देशातील तुमची पहिली पिढी जिला स्मार्टफोन वापरण्याचे भाग्य मिळत आहे. अतिशय स्वस्त दरात मिळणाऱ्या इंटरनेट डेटामुळे तुमचा दिवसातील जास्तीत जास्त वेळ हा मोबाईलवर जातो. आज बहुतांश तरुण-तरुणी दिवसातले किमान पाच ते सात तास मोबाईलच्या छोट्या पडद्यावर घालवतात. दिवसाच्या २४ तासांपैकी आठ तास वजा केले, तर १६ तास उरतात. त्यातील दररोज एक-तीन तास जर अशा अनुत्पादित कामावर जात असतील तर आपलं स्वत:चं आयुष्य आपण कसे घडविणार? दारु, सिगारेट, ड्रग्ज आदींप्रमाणेच मोबाईलचा अतिवापर हेसुद्धा एक व्यसनच आहे. ज्याप्रमाणे वरील व्यसने अनेक जीवने उद्ध्वस्त करतात, त्याप्रमाणे मोबाईलचा अतिवापर आपली जीवननौका दिशाहीन करते. मोबाईल व्यसनाचे परिणाम आपल्या करिअर आणि सर्जनशीलतेवर अधिक होतो. या गतीने मोबाईल व्यसनाधीनता वाढत गेली तर तो दिवस दूर नसेल ज्यावेळी आपल्या तरुणाईने स्वत:ची स्मरणशक्ती गमावलेली असेल. जीवनध्येय नसलेली, स्वत:च्या भविष्याबद्दल दिशाहीन असलेली आणि देश, समाज, संस्कृती याबद्दल काहीच देणघेणं नसलेली एक पिढी आपल्यासमोर उभी राहील.
 
माझी मुलगी सकाळी अंथरुणातून उठल्याबरोबर मोबाईल शोधते. मी तिला म्हणतो, काही घाबरु नकोस, तू झोपलेली असताना जगात कोणतीही क्रांती झालेली नाही. सांगण्याचा मुद्दा असा की, माझे तरुण मित्र-मैत्रिणी किती याच्या आहारी गेले आहेत. मोबाईलच्या अतिवापराने महत्त्वाचे तीन दुष्परिणाम मला दिसतात.सर्वात महत्त्वाचे आहे तो म्हणजे वेळेचा अक्षम्य दुरुपयोग, वेळेची नासाडी. आपण कल्पना करा की, मोबाईल वापरायचे दिवसातले केवळ तीन तास आपण वाचवावे आणि तो वेळ शरीरस्वास्थ्य, नवीन कला, भाषा शिकणे, अभ्यास अधिक जोमाने करणे, व्यायाम, योग, नोकरी-उद्योगासाठी नेटाने प्रयत्न, नवीन व्यवसाय सुरु करणे इ. साठी खर्च केला तर जीवनाची दशा आणि दिशाच बदलून जाणार नाही का! दिवसभर अर्थहीन गोष्टी सतत मेंदूत कोंबत राहिल्याने आपल्या मेंदूची आकलनशक्ती हळूहळू बधीर होत जाते. आपल्या मेंदूमध्ये दोन भाग आहेत, एक आकलनविषयक आणि दुसरा भावनिक. ज्यांचे दोन्ही भाग सारख्या प्रमाणात कार्यरत असतात. त्यांचे व्यक्तिमत्व अधिक समतोल होते. तुम्ही ज्यावेळेला अर्थहीन कचरा मेंदूत कोंबत जाता त्यावेळी मेंदूतील आकलनविषयक क्षमता हळूहळू कमी होत जाते आणि कालांतराने ती कार्य करणे थांबविते. परिणामी आपली विचार करण्याची, चिकित्सा करण्याची आणि तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता जवळजवळ संपुष्टात येते. त्यामुळे एखाद्या गोष्टीची, प्रश्नाची दुसरी बाजू किंवा त्या प्रश्नाचा साधक-बाधक विचार करण्याची आपली क्षमताच संपते. मेंदूची आकलन, पृथ्थकरण करण्याची शक्ती बधीर झाल्यामुळे तुम्ही मेंदूच्या भावनिक भागाचा जास्त वापर करता. त्यामुळे भावनांचा कल्लोळ उसळतो. कधी तीव्र संताप, कधी विचारांचे टोकाचे ध्रुवीकरण, कधी एखाद्या सेलिब्रिटी अथवा राजकीय नेत्याबद्दल तीव्र प्रेम किंवा तिरस्कार वाटतो आणि ते सर्व समाज माध्यमांवर प्रकट होताना दिसते. आपली तार्किक विचार करण्याची शक्ती बधिर होऊन फक्त भावनिक कोषच काम करत असल्यामुळे हे होत असते. त्यामुळे आपण आपल्या आजुबाजूला बघितले तर लक्षात येते की, जे लोक केवळ मेंदूतील भावनिक कोषाचाच वापर अधिक करतात, ते आयुष्यात यशस्वी होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या मेंदूतील सर्जनशील, आकलनक्षमता असलेल्या भागाला बधीर करणे, निष्क्रिय करणे, थांबवायला हवे आणि त्यासाठी काही सकारात्मक, उत्पादनक्षम गोष्टीत स्वतःला गुंतवून घ्यावे लागेल.
 
तासन्तास मोबाईलच्या स्क्रीनवर राहिल्यामुळे आपली ऊर्जा आणि प्रेरक शक्ती मंदावते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी समोर एक ध्येय ठेवावे लागते. त्या ध्येयासाठी स्वत:ला प्रेरित करुन प्रचंड मेहनत करावी लागते. पण याउलट आपण सतत मोबाईलवर राहिल्यास आपल्याला आळस येतो. कार्यक्षमता कमी होते. आत्मविश्वास डळमळतो. त्यामुळे आपल्याकडून १०० टक्के प्रयत्न होत नाहीत. परिणामी आयुष्यात अपयश येते. मग त्या अपयशाचे कुणावर तरी खापर फोडण्यासाठी आपण शत्रू उभा करतो. कधी राजकीय पक्ष, कधी आरक्षण, तर कधी वशिलेबाजी याला दोष देऊन आपण मोकळे होतो. आपल्या देशाच्या कार्यप्रणालीमध्ये काही दोष अवश्य आहेत. पण आपल्या अपयशाला केवळ त्यालाच जबाबदार धरुन समाज माध्यमांवर सतत व्यक्त झाल्याने प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी प्रयत्न तुम्हालाच करावे लागतील. सतत नकारघंटा वाजवण्यापेक्षा मी सकारात्मक कोणती कृती करु शकतो. ज्यामुळे माझे जीवन बदलून जाईल, मी एक सक्षम व्यक्ती बनेन, असा विचार करण्याची गरज आहे. तुम्ही स्वत:लाच प्रश्न विचारा, स्वत:चे जीवन उन्नत करण्यासाठी मी माझी पूर्ण क्षमता वापरतो का? ज्यांना विजयी व्हायचे आहे ते अडचणींचा बागुलबुवा न करता वेगळी वाट शोधतात. तुम्हीसुद्धा हे करु शकता. पण आवश्यकता आहे ती कर्णपिशाच्चाचा (चेलळश्रश झहेपश) अतिवापर टाळण्याची. अलीकडे सुशांत सिंह राजपूतच्या तथाकथित आत्महत्येसंदर्भात झालेल्या पोलिसांच्या चौकशीत अनेक ड्रग्जस्ची नावे समोर आली. त्यातील बहुतांश ड्रग्जस्च्या वापरांवर बंदी आहे. पण आपल्या खिशातील स्मार्टफोनवर तशी बंदी नाही. काही वेळा त्यातून अनेक उपयुक्त गोष्टींची माहिती मिळते, अनेक ऑनलाईन कोर्सेस आपल्याला शिकता येतात. पण त्याचबरोबर मोबाईलची नशा तरुणाईचे जीवन खराब करत आहे, किंबहुना एका पिढीची सर्जनशीलता नष्ट होत आहे.
 
आपण सगळे २१ व्या शतकात आहोत. भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. अशा परिस्थितीत आपल्या देशाला किती उंचीवर न्यायचे ते आजची युवापिढी ठरविणार आहे. आपल्या पूर्वीच्या पिढीने आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घेतली. त्यानंतरही मंडल आयोग आणि जंतरमंतरवरील अण्णा हजारेंच्या आंदोलनातही मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले. राष्ट्रीय प्रश्नांवर त्यावेळच्या युवा पिढीने जी संवेदनशीलता दाखविली ती आजची युवापिढी दाखवेल का? आज चटकदार, भडकावू घटनांवर तत्काळ वाहत जाणारी, भावनेचा उद्रेक होणारी पिढी आपण बघत आहोत. आज कोरोनाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येणे, ही प्राथमिकता आहे. सीमेवर सतत कुरापती काढणाऱ्या चीनची अर्थव्यस्था आपल्या पाचपट आहे. आपली अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन व्हावी असा संकल्प विद्यमान पंतप्रधानांनी सोडला आहे. आपल्या देशाला या उंचीवर नेण्यासाठी तरुणाईचे मोलाचे योगदान राहणार की ते सोशल मीडियावरील निष्फळ चर्चेत अडकून पडणार, ते आपल्या आणि पर्यायाने देशाच्या भविष्याचा विचार करणार की ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लील, हिंसक फिल्म्स बघण्यात आपले आयुष्य खर्ची घालणार?
 
आजच्या तरुणांनी याचे उत्तर शोधायचे आहे. वामनराव पै म्हणत असत, ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’ तरुणाईने स्वत:च्या भवितव्याचा विचार स्वतःच करायचा आहे. या देशातील नट-नट्या, राजकीय पुढारी हे काम तुमच्यासाठी करणार नाहीत. निर्णय तुम्ही करायचा, स्वत:बरोबरच देशाला वैभव संपन्न करायचे की आपला दिवसातला मौल्यवान वेळ मोबाईल मधील निरर्थक गोष्टी बघण्यात घालवायचा. मित्रांनो, स्वतःला कल्पक आणि नावीन्यपूर्ण कार्यात गुंतवा आणि स्वत:सोबतच देशाच्या उन्नतीत खारीचा वाटा उचला. आपल्या कर्तृत्वाने आपल्या देशाला विश्वगुरु बनवायचे की सर्जनशीलता हरविलेल्या पिढीचा भाग बनायचे हे तुम्हीच ठरवा.
 
 
- मोहन सालेकर
@@AUTHORINFO_V1@@