‘सह्याद्री राईडर्स’ने केली आदिवासी पाड्यातील दिवाळी गोड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2020
Total Views |

sahyadri_1  H x
 
 

‘सह्याद्री राईडर्स’च्या ‘दिलवाली दिवाळी’ने आदिवासी पाड्यात उजळवल्या आनंदाच्या पणत्या

 
 
दिवाळी म्हटली की, आनंदाचा आणि दिव्यांचा उत्सव मात्र यावर्षी सर्वत्रच कोरोनाचे सावट असल्याने अनेकांची दिवाळी ही अंधारातच आहे. अनेकजणं नोकरी बुडाल्याने रोजच्या पेटणाऱ्या चुलीची ही भ्रांत पडली, अशात दिवाळी साजरी करणे हे दुरापास्तच झाले आहे. मात्र, याही परिस्थितीमध्ये सामाजिक भान जपणाऱ्या अनेक व्यक्ती असल्याने गोरगरिबांना काही अंशी का होईना दिलासा मिळत आहे. ‘सह्याद्री राईडर्स’ या दरी-खोऱ्यात आणि गड किल्ल्यांवर ट्रेकिंग करणाऱ्या ग्रुपने नाशिक जिल्ह्यात असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी पाड्यात जीवनावश्यक वस्तू, शैक्षणिक साहित्य, दीपावली फराळ व खाऊचे वाटप करून येथील वाड्या-पाड्यातील आदिवासी बांधवांसमवेत दिवाळी साजरी करत तरुणाईसमोर वेगळा असा एक आदर्श निर्माण केला आहे. नवीन पिढीत समाजभान रुजवणाऱ्या या ग्रुपचा हा उपक्रम अनेकांच्या कौतुकास पात्र ठरला आहे. हे करत असताना कुठल्याही प्रसिद्धीचा हव्यास नाही की धडपड नाही. दैनंदिन कामच्या व्यापातून थोडासा विसावा म्हणून दोन-चार दिवस सुट्टी काढायची. समविचारी मित्रांचा गोतावळा सोबत घ्यायचा. खांद्यावर ट्रेकिंगची बेग अडकवायची आणि आपल्यातल्या आपल्याला शोधायला दरी-खोऱ्यातल्या पायवाटा तुडवत स्वच्छंदीपणे फिरायचे आणि जाताना आनंदाच्या फुलांनी भरलेली ओंजळ इतरांच्याही हातात काहीशी रिती करून दुसर्यांचेही आयुष्य सुगंधी करायचे, असा या ग्रुपचा उपक्रम. ‘सह्याद्री राईडर्स’ हे गेली तीन वर्षं विविध गड किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जात असतात हे करत असताना येथील गडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यातील परिस्थिती पाहून, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष पाहताना येथील लोकांसाठी आपल्याला काय करता येईल, हा विचार त्यांच्या मनात आला आणि मग याच विचारातून ‘सह्याद्री राईडर्स’ या ग्रुपने ठरवले की दर दिवाळीला आपल्याकडून आदिवासी पाड्यामधील लोकांच्या मदतीसाठी ‘दिलवाली दिवाळी’ हा उपराम सुरु करायचा. २०१८ या उपक्रमाला प्रथम सुरुवात झाली. प्रथम वर्षी हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असल्या खेड्यात दिवाळी फराळ लहान मुलांसाठी खाऊ, वयोवृद्ध माणसांसाठी थंडीपासून बचाव व्हावा म्हणून ब्लँकेट्स अशा गोष्टींचे वाटप करण्यात आले. संपर्कातील अनेक मित्रमंडळी आणि नातेवाईकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत हातभार लावत मदत केली .
 
२०१९ लिंगाणा पथरा जवळील गावत दिवाळीला हाच उपक्रम राबवत सोलर दिवे-कंदील, ब्लँकेट्स, फराळ, किराणा यांसारख्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावर्षी २०२० दिवाळीमध्ये हरिहरगड सर करताना या गडाच्या पायथ्याशी असलेल्या हर्षेवाडी गावची कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती वाईट झाली आहे. ‘सह्याद्री राईडर्स’ ग्रुपच्यावतीने यावर्षी येथील शालेय मुलांना शाळेच्या बॅग्ज, पाण्याची बाटली, नोटबुक, स्टेशनरी यांसह जीवानावश्यक वस्तू आणि मिठाईचे वाटप करून ‘दिलवाली दिवाळी’ साजरी केली.जेव्हापासून हा उपक्रम आम्ही राबवतोय तेव्हापासून दरवर्षी पावलांना सह्याद्रीच्या डोंगर दर्यांची ओढ लागलेली असते. इथले डोंगर आम्हाला साद घालत असतात. इथली हिरवाई आम्हाला भुरळ पाडत असते. मात्र, हे असताना दुसरीकडे दिवाळीत आपण दिव्यांच्या रोषणाईचा आनंद साजरा करत असताना वंचित आणि दुर्बल घटकांच्या जीवनातही काही क्षण का होईना, आनंदाची एक पणती त्यांच्याहीदरात लागावी हा साधा आणि सरळ हेतू ठेवून आपण हा उपक्रम राबवत असल्याचे यावेळी ‘सह्याद्री राईडर्स’ या ग्रुपने सांगितले. खाऊ आणि शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर येथील मुलांच्या निरागस चेहऱ्यावर वेगळे असे समाधान पाहायला मिळाले.
- अजय शेलार
@@AUTHORINFO_V1@@