हॅप्पी वाली दिवाळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2020
Total Views |

happy wali diwali_1 
 
 
 
विनाफटाक्यांच्या आतषबाजीची, पण आदिवासी पाड्यावरील चिमुकल्यांच्या गालावर उमटलेल्या निखळ आनंदाची. विना लख्ख रोषणाईच्या झगमगाटाची, पण तरीही भटक्या कुत्र्यांच्या आश्रमात सहज सुखावणाऱ्या समाधानी झुळुकीची. विना लांब पल्ल्यांच्या गाठीभेटींची, पण वृद्धाश्रमातील आजोबा-आज्जींच्या बेधुंद नाच-गाण्यात मग्न झालेल्या निःस्वार्थ नात्याची... अशी एक आगळीवेगळी दिवाळी ‘हॅप्पीवाली फीलिंग’ची!
 
 
‘दिवाळी’ हा सणच मुळात ‘नातं’ नावाच्या रेशीम बंधाला अजून घट्ट करणारा आहे. दिवाळीत भाऊबीज असते तेव्हा बहीण-भावाचं नातं अजून घट्ट होते. दिवाळीत पाडवा असतो, त्यात नवरा-बायकोच्या नात्याला खूप महत्त्व असते. इतकंच काय तर दिवाळीची चाहुल लागली की, सर्वात आधी आपण आपल्या घराची साफसफाई करतो, म्हणजे दिवाळी आपल्या राहत्या वास्तूसोबतदेखील आपले नाते अधिक निकट करते. अशा या खास सणाच्या औचित्याने मुंबईमधील ‘हॅप्पीवाली फीलिंग’ या संस्थेने ‘निखळ आनंद ’ नावाचे निःस्वार्थ नाते जपू पाहिले आणि खाली नमूद तीन उपक्रम राबवले.
१. ‘राड्याचा पाडा’ या कसारा येथील आदिवासी/वनवासी कुटुंबांतील सहासष्ट चिमुकल्यांना नवीन कपड्यांचे वाटप केले.
२. ‘स्वीट ओल्ड ऐज होम’ या नवी मुंबई - कोपरखैरणे येथील वृद्धाश्रमातील आज्जी-आजोबांना नवीन कपडे आणि सोबत दिवाळीचा गोडवा देऊ केला.
३. ‘भूमी जीवद्या’ नवी मुंबई - तुर्भे या भटक्या कुत्र्यांना निवारा देणाऱ्या संस्थेच्या नूतनीकरणात त्यांना गरज असलेल्या साहित्याची (पंख्याची) मदत सुपूर्द केली.
उपक्रमाबद्दल संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे -
२०२० हे इतर वर्षांहून खूप वेगळे आहे. कारण, या वर्षी आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अनुभवल्या, ज्याबद्दल या आधी कोणी कल्पनादेखील केली नव्हती. कोरोना आजार ‘लॉकडाऊन’ याचा परिणाम जनसामान्यांच्या जीवनात खूप खोलवर उमटला आहे. पण आम्हा भारतीयांचा उत्साह कोणी कमी करू शकला आहे का ! कोरोनामुळे फक्त आपल्या मित्र आप्तेष्टांच्याच गाठीभेटी थांबलेल्या नाहीत तर अनेक आश्रमांना/वनवासी पाड्यावर दिल्या जाणाऱ्या भेटी तसेच मिळणारी मदत देखील कमी झालेली आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन यंदाची दिवाळी काही खास पद्धतीने साजरी करण्याचा संकल्प ‘हॅप्पीवाली फीलिंग’ संस्थेने केला. ‘भारतमाता सेवा प्रतिष्ठान’ (भांडुप) या सेवाभावी संस्थेकडून अभय जगताप यांच्या नेतृत्वाखाली राड्याचा पाडा-कसारा या आदिवासी/वनवासी पाड्यावर दिवाळी तिथल्या बंधू-भगिनींसोबत गेली कित्येक वर्षं साजरी केली जाते. त्यांना फराळ आणि जुने पण वापरण्यास योग्य कपड्यांचे वाटप करण्यात येतात. या वर्षी ‘हॅप्पीवाली फीलिंग’ संस्थेच्या संयुक्त सहभागाने पाड्यावर राहणाऱ्या ६६ चिमुकल्यांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. (कोरोना आजाराचा संसर्ग आणि इतर संरक्षणस्पद गोष्टी लक्षात घेता जुने कपडे वगळून - नवीन कपड्यांचा उपक्रम राबवण्यात आला.)
चला, सणाचा गोडवा वाढवूया... यंदाची दिवाळी ‘हॅप्पीवाली’ साजरी करूया या ब्रीदवाक्याने एक मेसेज समाज माध्यमांवर अनेकांना पाठवण्यात आला. मदतीसाठी आव्हान केले गेले आणि केलेल्या या अहवानाला मदतीचे बरेचसारे हात आपसूक जोडले गेले, ज्यात जनसामान्यांसोबत पोलीस वर्ग, डॉक्टर यांचादेखील सहभाग लाभला आणि उपक्रमाला लागणार निधी ठरवलेल्या योग्य वेळेत गोळादेखील झाला. नवी मुंबई-कोपरखैरणे येथील ‘वर्षा कलेक्शन’ या दुकानातून चिमुकल्यांसाठी लागणारी कपडे खरेदी करण्यात आली. इथे दुकानाचे नाव नमूद करण्याचे विशेष कारण म्हणजे, दुकानाचे मालक सचिन मोकाशी आणि विजय धोंडे यांनी मोठ्या मनाने लागणारी सर्व कपडे खरेदी किमतीत, म्हणजेच ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर तर दिलीतच, पण सोबत त्यांनी स्वखर्चाने पाड्यावरील दहा महिलांसाठी साड्या आणि १९ मुलांसाठी पँटदेखील देऊ केले. म्हणतात ना, चांगल्या कार्यामध्ये चांगल्या माणसांचे योगदान आपोआप मिळत जाते, याचा जणू साक्षत्कार म्हणजे सदर दुकान मालक मंडळी.
दिवाळीच्या ऐन पहिल्या दिवशी पाड्यावरील चिमुकल्यांना नवीन कपडे सुपूर्द करण्यात आले आणि हा उपक्रम राबवताना आरोग्यविषयक सुरक्षेच्या सर्व गोष्टींचे विशेष पालन करण्यात आले. नवीन कपडे उराशी कवटाळताना चिमुकल्यांच्या गालावर उमटलेल्या हसूचे, डोळ्यात चमकणाऱ्या आनंदाचे वर्णन शब्दात होणे नाही, तुम्ही तो आनंद या फोटोतून अनुभवू शकता. या उपक्रमात बिर्ला कॉलेज एनएसएस युनिटमधील तरुण प्रतिनिधींचे लाखमोलाचे योगदान लाभले, जे स्वतः स्वयंसेवक म्हणून उपक्रमात उपस्थितदेखील राहिले. म्हणतात ना, पृथ्वी गोल आहे आणि इथे घडणाऱ्या सर्व गोष्टी एकमेकांशी निगडित असतात, सदर उपक्रमासाठी लागणाऱ्या चिमुकल्यांच्या कपड्यांची खरेदी करण्यासाठी ‘हॅप्पीवाली फीलिंग’ संस्थेचे प्रतिनिधी दुकानात गेले असता त्यांची लगबग आणि विलक्षण उत्साह पाहता जवळच्याच झेरॉक्स दुकानात कामानिमित्त आलेल्या प्रतिभा केरेकर (वृद्धाश्रम अध्यक्ष) यांनी उत्सुकतेपोटी उपक्रमाविषयी माहिती विचारली आणि तेव्हाच ‘स्वीट ओल्ड एज होम’ वृद्धाश्रमाविषयी माहितीदेखील थोडक्यात दिली, तिथे असणाऱ्या अडचणी आपुलकीने कळवल्या आणि तेव्हाच त्या प्रतिनिधींनी दिवाळीचा गोडवा आश्रमातील आजोबा-आज्जींसोबत वाटण्याचा विचार व्यक्त केला आणि प्रतिभाजींनी त्यासाठी सकारात्मक होकार दिला.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वृद्धाश्रमातील आजोबा-आज्जींसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. त्यांना नवीन कपडे, गोड फराळ वाटण्यात आला. आजोबा-आज्जी खूप जास्त खूश झाले होते. त्यावेळी भावनिक होऊन त्यांना घट्ट मिठी मारावी, असे उपक्रमात सहभागी बऱ्याच स्वयंसेवकांना वाटत होते, पण भावनांना आवर घालून स्वस्थविषयक सर्व नियमांचे पालन करूनच उपक्रमाचे साजरीकरण पार पडले. कार्यक्रमाचे सर्व लक्ष वेधून घेतले ते आजोबा-आज्जी यांच्या गोड गाण्याने आणि सुंदर अशा नाचण्याने. ते पाहून खऱ्या अर्थाने दिवाळी गोड झाल्याची प्रचिती आली असे म्हणायला हरकत नाही.
गोळा झालेल्या निधीतून आणि परिवर्तन संस्था पुणे यांची मुंबई प्रतिनिधी हर्षदा सावंत यांच्या मदतीतून अजून एक उपक्रम पार पाडण्यात आला. ‘भूमी जीवद्या’ संस्था जी गेली कित्येक वर्ष भटक्या जखमी कुत्र्यांना निवारा देण्याचे त्यांवर औषध उपचार करण्याचे नि:स्वार्थ कार्य करते आहे, त्यांचे नूतनीकरण चालू असल्याने तिथे बऱ्याच साऱ्या गोष्टींची, मदतीची आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊन तिथे हवे असणाऱ्या पंख्यांची मदत पोहोचवण्यात आली. थोडक्यात संस्थेची माहिती - संस्थेत सत्याहत्तर भटक्या, जखमी कुत्र्यांवर औषध उपचार चालू आहे आणि त्यांचा निवारा संस्थेतच आहे, तसेच संस्थेचे स्वतःचे ऑपरेशन थेटर असून तिथे दोन डॉक्टर पूर्ण वेळ कार्यरत असतात. संस्थेची रुग्णवाहिका जखमी प्राण्यांसाठी २४ तास मुंबई आणि नवी मुंबई भागात सेवा देत आहे. मग कशी वाटली एकंदर ‘हॅप्पीवाली’ दिवाळी आणि या आगळ्यावेगळ्या दिवाळीचा ‘हॅप्पीवाला’ गोडवा? खात्री आहे नक्कीच तो तुम्हाला आवडला असेल. हा लेख वाचणाऱ्या प्रत्येक वाचकाला एकच आवाहन आहे, तुम्हीदेखील आपल्या घरात शिल्लक असलेला दिवाळीचा फराळ असंच एखाद्या गरजूसोबत वाटून पाहा. तुम्हाला ‘हॅप्पीवाली फीलिंग’ कडकडून भेटल्याशिवाय राहणार नाही ही माझी १०० टक्के हमी.
- विजय माने
 
@@AUTHORINFO_V1@@