खुर्शीदांची अंधभक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2020   
Total Views |


खुर्शीद सलमान _1 &nb



खुर्शीद गांधी घराण्याच्या अंधभक्तीत इतकी ली(दी)न आहेत की, ते म्हणतात, “राजकीय पक्षाला अध्यक्ष असलाच पाहिजे, असा कुठे लिखित नियम आहे का? कित्येक पक्षांना अध्यक्ष नसून ‘जनरल सेक्रेटरीज’ आहेत. का म्हणून सगळ्या राजकीय पक्षांचे मॉडेल सारखेच हवे?” अगदी बरोबर, बाकी पक्षांचे सोडून द्या, पण राजकीय पक्ष कसा नसावा, याचे काँग्रेस मात्र एक उत्तम मॉडेल आहे, हे निश्चित.



काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संपुआच्या काळातील माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसमधील अंतर्गत नेतृत्व संघर्षावर रविवारी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. खुर्शीद म्हणतात, “जे आंधळे नाहीत, अशा काँग्रेस पक्षातील सर्वच नेत्यांचा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींना पूर्ण पाठिंबा आहे.” आता खुर्शीद यांना नेमके त्यांच्याच पक्षात कोणाला ‘अंध’ ठरवायचे होते, हे वेगळे सांगायला नकोच. थोडक्यात काय तर काँग्रेसमधील कपिल सिब्बल, गुलामनबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण अशा ज्या ज्या नेत्यांनी या देशातील सर्वात जुन्या पक्षाला, आपल्या नेतृत्वाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला, ते ते अंध. ज्यांनी ज्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली, ते सगळे अंध. गांधी घराण्याबाहेरच्या व्यक्तीने काँग्रेसचे नेतृत्व करावे, असे विचार बाळगणारे आणि ते जाहीरपणे सांगणारेही खुर्शीद यांच्या लेखी अंधच! तर खुर्शीद यांच्या म्हणण्याप्रमाणे, काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍यांची संख्या पक्षात जास्त की, त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांची संख्या जास्त, याचा निर्णय पक्षांतर्गत होईल. त्यासाठी जाहीर वक्तव्य करण्याची कुणालाही मुळात गरज नाही. पण, कदाचित खुर्शीद यांना विसर पडला असावा की, हे मुद्दे पक्षांतर्गत काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकांंमध्ये तसेच वेळोवेळी पत्र लिहूनही पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविले गेले. परंतु, परंपरेप्रमाणे त्याला बासनात गुंडाळून नेतृत्वाकडे अंगुलीनिर्देश करणार्‍या नेत्यांना ‘पक्षद्रोही’च ठरवण्यात आले. खुर्शीद ज्या काँग्रेस अंतर्गतच्या खोट्या लोकशाहीचे कौतुक करतायत, ती जर खरंच अस्तित्वात असती, तर आज गांधी घराण्यापलीकडील एक चेहरा कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान असता. तसे मात्र झाले नाही आणि भविष्यातही होईल, याची शाश्वती नाहीच. पण, खुर्शीद गांधी घराण्याच्या अंधभक्तीत इतकी ली(दी)न आहेत की, ते म्हणतात, “राजकीय पक्षाला अध्यक्ष असलाच पाहिजे, असा कुठे लिखित नियम आहे का? कित्येक पक्षांना अध्यक्ष नसून ‘जनरल सेक्रेटरीज’ आहेत. का म्हणून सगळ्या राजकीय पक्षांचे मॉडेल सारखेच हवे?” अगदी बरोबर, बाकी पक्षांचे सोडून द्या, पण राजकीय पक्ष कसा नसावा, याचे काँग्रेस मात्र एक उत्तम मॉडेल आहे, हे निश्चित. म्हणजे, आगामी काळातही काँग्रेसमध्ये स्थायी अध्यक्षाची नेमणूक न करताच, अशाचप्रकारे कारभार हाकला गेला, तर ‘काँग्रेसमुक्त भारता’चे स्वप्न आणखीन लवकर दृष्टिक्षेपात येईल, एवढेच!



‘पॅशन’च्या नावाखाली ‘फॅशन’



सलमान खुर्शीद हे गांधी घराण्याशी सुरुवातीपासूनच अगदी एकनिष्ठ. म्हणूनच की काय, संपुआच्या काळात त्यांना परराष्ट्र मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे आपली गांधी घराण्यावरील निष्ठा, भक्ती दाखवण्यात त्यांनी कुठलीही कुसूर सोडली नाही. म्हणूनच की काय, परराष्ट्रमंत्री असताना आपल्या पक्षश्रेष्ठींचे अगदी सुमधूर संबंध असलेल्या लाडक्या चीनच्या राज्यकर्त्यांना खुश करण्यासाठी “मला बीजिंगमध्येच राहायला आवडेल,” अशी दर्पोक्ती करुन ते मोकळे झाले होते. खुर्शीद यांनी गांधी परिवाराच्या कौतुकाचा हा वसा आजतागायत सोडलेला नाही. इतका की, त्यांना पॉलिटिक्स हे आता ‘पॅशन’ वाटू लागले. हो, हो, तेच ‘पॅशन’ जे फक्त खुर्शीद आणि त्यांच्यासारख्या काँग्रेसच्या अंधभक्तांना आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींमध्ये अगदी ठासून भरलेले दिसते. पण, घराण्याच्या खोट्या प्रतिष्ठेचा, निष्ठेचा हा चष्मा काढला, तर त्यांना कदाचित ही ‘पॅशन’ नसून पॉलिटिकल ‘फॅशन’ असल्याचाच साक्षात्कार होईल. तसे या जन्मी तरी होणे शक्य दिसत नसले तरी ‘पॅशन’च्या नावाखालची ही ‘फॅशन’ मतदारांनीही नाकारुन काँग्रेसला चांगलीच ‘टशन’ दिली, हे नुकतेच बिहारच्या निकालावरुनही अधोरेखित झालेच. ज्याप्रमाणे अभिनेत्याचा मुलगा अभिनेता, त्याप्रमाणे राजकारण्याचा मुलगा राजकारणी होण्याची ही ‘फॅशन.’ गांधींच्या याच खुर्शीदांसारख्यांना जाणवणार्‍या ‘पॅशन’बद्दल मात्र अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात मांडलेले विचार जगासमोर आले अन् या पॉलिटिकल ‘फॅशन’ची पुरती पोलखोलही झाली. इतके होऊनही काँग्रेस सुधारेल, आत्मचिंतन करेल तो काँग्रेस पक्ष कुठला म्हणा! पण, खुर्शीदांना वाटते हा दोष गांधी घराण्याचा नव्हेच. ते म्हणतात, “जर मतदारांना तुमची विचारसरणी आकर्षित करु नसेल, तर तुम्ही तरी आपले तोंड बंद केले पाहिजे किंवा प्रतीक्षा केली पाहिजे. आम्ही मतदारांना (काँग्रेसच्या विचारसरणीकडे) आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला कदाचित वेळही लागेल.” इथेच तर काँग्रेस मार खाते. कारण, या पक्षाची नेमकी विचारसरणी काय, याबाबत जर पक्षांतर्गतच स्पष्टता नसेल, संभ्रम असेल, तर मतदारांना काँग्रेस पक्ष कुठून आकर्षित करणार? म्हणूनच राजकारण ही नावापुरती ‘पॅशन’ आणि मिरवण्यापुरती ‘फॅशन’ वाटणार्‍या नेतृत्वापासून जोपर्यंत काँग्रेसची मुक्तता होत नाही, तोपर्यंत काँग्रेसींच्या नशिबी केवळ रिकामा ‘हात’च!
@@AUTHORINFO_V1@@