सागरेश्वर अभयारण्यात प्रथमच बिबट्याचे दर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2020
Total Views |
leopard _1  H x


महाराष्ट्रातील सगळ्यात छोटे अभयारण्य म्हणून ओळख 

 
मुंबई (अक्षय मांडवकर) - सांगली जिल्ह्यातील 'यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्या'त प्रथमच बिबट्याचे दर्शन घडले आहे. अभयारण्यात लावलेल्या 'कॅमेरा ट्रॅप'मध्ये बिबट्याचे छायाचित्र टिपण्यात वन विभागाला यश मिळाले आहे. बिबट्याबरोबरच अभयारण्य क्षेत्रात गव्यांचेही आगमन झाले आहे. तृणभक्षी प्राण्यांच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असलेल्या सागरेश्वरमध्ये बिबट्यासारख्या मांसभक्षी प्राण्याचे आगमन झाल्याने येथील पर्यटनामध्ये काही बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
 
 
 
महाराष्ट्रातील आकाराने सगळ्यात छोटे वन्यजीव अभयारण्य म्हणून सागरेश्वर अभयारण्य ओळखले जाते. १० चौ.किमी क्षेत्रावर हे अभयारण्य विस्तारलेले आहे. वृक्षमित्र डी.एम.मोहिते यांच्या अथक प्रयत्नानंतर १९८५ साली या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. सागरेश्वरमध्ये सांबर आणि चितळांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अभयारण्याच्या निर्मितीपासून या परिसरात मांसभक्षी प्राण्यांचा अधिवास किंवा वावर आढळला नव्हता. यंदा ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या 'पक्षी सप्ताहा'दरम्यान ८ नोव्हेंबर रोजी सांगलीचे वन्यजीव अभ्यासक अमोल जाधव सागरेश्वरमध्ये पक्षीनिरीक्षणाकरिता गेले होते. त्यावेळी त्यांना अभयारण्यामध्ये बिबट्याचे पावलाचे ठसे आढळून आले. त्यांनी लागलीच याची माहिती अभयारण्याचे विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांना दिली. त्यानंतर माळी यांनी तातडीने अभयारण्य क्षेत्रात कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याच्या वास्तव्यास पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला. 
 
 

leopard _1  H x 
 
२० नोव्हेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट्याचे छायाचित्र टिपल्याची माहिती विशाल माळी यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. सागरेश्वरमध्ये प्रथमच बिबट्यासारख्या मांसभक्षी प्राण्याच्या अस्तित्त्वाचा पुरावा सापडल्याचे त्यांनी सांगितले. बिबट्याच्या वावरामुळे मानवी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अभयारण्यात सुरू असलेल्या पर्यटनावर काही प्रमाणात बंदी आणावी लागेल किंवा नियमांमध्ये काही बदल करावे लागतील, असे माळी यांनी नमूद केले. याशिवाय अभयारण्यात प्रथमच गव्यांचेही दर्शन घडले आहे. तीन गवे अभयारण्यात वावरत असल्याचे छायाचित्रण वन कर्मचाऱ्यांना मिळाले आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@