लोकमान्य टिळक : आर्यांचे मूलस्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2020
Total Views |

Lokmanya Tilak_1 &nb
 
 
 
 
 
मागच्या लेखापासून आपण 'खगोलशास्त्र' (Astronomy) ही ज्ञानशाखा आर्यांच्या स्थलांतराच्या बाबतीत काय सांगते, याचा एक धावता आढावा घेत आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने वैदिक साहित्यातले खगोलीय उल्लेख, पृथ्वीची परांचन गती (Precession) आणि तिच्या आधारे स्व. लोकमान्य टिळकांनी केलेले संशोधनाचे मोठे काम आपण पाहिले. त्यांनी हे सगळे संशोधन त्यांच्या 'The Orion' या ग्रंथात मांडले आहे. त्याप्रमाणेच त्यांचा अजून एक ग्रंथ आहे 'The Arctic Home in Vedas' अर्थात 'आर्यांचे उत्तर ध्रुवीय मूलस्थान.' ग्रंथाच्या नावावरून लक्षात येते त्यानुसार आर्यांचे मूळचे स्थान उत्तर ध्रुवाच्या प्रदेशात होते आणि हिमोत्तर काळात हळूहळू तिथूनच ते जगभरात पांगले, असे मत टिळकांनी या ग्रंथात मांडले आहे. या लेखमालेच्या प्रतिपाद्य विषयाच्या अनुषंगाने लोकमान्य टिळकांनी मांडलेल्या या मताचासुद्धा उचित आढावा घेणे अगत्याचे ठरते.
 
 
आर्यांचे मूलस्थान - टिळकांचे मत
 
 
मागच्या लेखात वर्णन केल्याप्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सन १८९३ मध्ये 'The Orion' या त्यांच्या ग्रंथात वेदांचा काळ ठरविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांनी मृग नक्षत्र, कृत्तिका नक्षत्र आणि त्यांचा वसंत संपाताशी असलेला संबंध यांवरून ऋग्वेद आणि यजुर्वेदाची तैत्तिरीय संहिता यांचा काळ ठरविला. त्याचे विविध टप्पेसुद्धा दाखवून दिले. हा संपूर्ण कालखंड इ.स. पूर्व ६००० ते इ.स. पूर्व १४०० असा प्रदीर्घ दिसतो, हे आपण मागच्या लेखात पाहिले. यालाच जोडून लोकमान्य टिळकांचे अजून एक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध संशोधन आहे, ते म्हणजे वैदिक लोकांचे मूळ ठिकाण निश्चित करण्याविषयक. यावर आधी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी 'The Arctic Home in Vedas' अर्थात 'आर्यांचे उत्तर ध्रुवीय मूलस्थान' असा एक ग्रंथही सन १९०३ मध्ये लिहिला आहे.
 
 
या विषयाच्या मांडणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा तशाच वैदिक साहित्याचा आधार घेतला. याची एकूणच मांडणी करताना इतिहासपूर्व कालापासून सुरुवात करून हिमकाल (Glacial periods), ध्रुव प्रदेशाचे भौगोलिक वर्णन इत्यादी प्राथमिक मांडणी आधी केली. इथपर्यंत त्यांनी वैदिक साहित्याचा कुठे संदर्भ घेतलेला नाही. यापुढच्या विषय मांडणीत आधी सांगितलेले भौगोलिक वर्णन वेदांमध्ये कसे प्रतिबिंबित होते, याचे वैदिक साहित्यातले दाखले त्यांनी दिले आहेत. त्यात केवळ ध्रुवीय प्रदेशातच आढळणारे सहा-सहा महिन्यांचे दीर्घ दिवस-रात्र, वैदिक उषेचे वर्णन, महिने आणि ऋतूंची वर्णने, 'गवां अयनम' या वर्षभर चालणार्‍या दीर्घकालीन यज्ञाचा (सत्र) संदर्भ, 'निरुद्धा: आप:' नावाने आढळणारी 'वृत्र' नावाच्या असुराने अडविलेल्या पाण्याची कथा, पारशी धर्मग्रंथ 'झेंद अवेस्ता' मधले काही दाखले, गाथाशास्त्र (Mythology) मधले काही दाखले, अशी प्रदीर्घ मांडणी केली आहे. समारोप करताना प्राचीन आर्यांची जीवनपद्धती आणि धर्म यांवर काही भाष्य करत प्राचीन आर्यांचे मूळचे ठिकाण उत्तर ध्रुव प्रदेशातच (Arctic) कुठेतरी होते, अशी सिद्धांत मांडणी केलेली आहे. या ग्रंथाच्या निर्मितीची कथासुद्धा रोचक आहे. याचे लिखाण चालू असतानाच सन १८९७ मध्ये लोकमान्यांना दीड वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यामुळे लिखाणात खंड पडला. टिळकांनी तुरुंगाच्या अधिकार्‍यांना अर्ज-विनंत्या करून लिखाणाचे साहित्य, संदर्भ ग्रंथ, नकाशे, वगैरे साहित्य मागवून घेतले. त्यात काही महिने गेले. अशा रीतीने तिथे तुरुंगातच लोकमान्यांचा हा संशोधनाचा यज्ञ चालू झाला. वेद संहितांची मॅक्स म्यूलर यांनी केलेली भाषांतरे स्वत: मॅक्स म्यूलरनेच तुरुंगात लोकमान्यांकडे पोहोचविली. शिवाय त्यांनीच स्वत: इंग्रज सरकारकडे शब्द टाकून टिळकांच्या शिक्षेचा कालावधी कमी करवून घेतला. या सर्व मदतीबद्दल टिळकांनी मॅक्स म्यूलरविषयी विशेष कृतज्ञताही व्यक्त केली आहे. लोकमान्य टिळकांच्या राजकीय कार्यामुळे या ग्रंथाचे हस्तलिखित तयार होऊनही तो प्रसिद्ध होण्यासाठी काही वर्षे लागली. दरम्यान, या ग्रंथाचे प्रकाशन होण्याच्या आधीच मॅक्स म्यूलर यांचे निधन झाले. प्रकाशनाच्या वेळीही लोकमान्य टिळक सन १९०२ सालापासून चाललेल्या एका राजकीय खटल्याला तोंड देतच होते.
 
आर्यांचे मूलस्थान - लोकमान्य टिळकांचे खंडन
 
 
वस्तुत: हा ग्रंथ म्हणजे टिळकांच्या आधीच्या 'The Orion' ग्रंथाचीच पुढची पायरी होती. पण, भारतातल्या तत्कालीन वैचारिक जगतात 'The Orion'चे जसे स्वागत झाले, तसे स्वागत 'The Arctic Home in Vedas'च्या वाट्याला आले नाही. अत्यंत थोड्या भारतीय विद्वानांनी त्याचे स्वागत केले. अनेक युरोपीय विद्वानांनी मात्र अर्थातच याचे भरभरून स्वागत केले. याद्वारे त्यांचाही 'आर्य लोक भारताच्या बाहेरून भारतात आले' हे सांगण्याचा सुप्त मनसुबा परस्परच मार्गी लागणार होता. परंतु, अनेक भारतीय विद्वान आणि विचारवंत यामुळे अचानक टिळकांच्या विरोधात गेले. वाईचे 'धर्म' साप्ताहिकाचे सात्त्विक लेखणीचे असणारे तत्कालीन संपादक वेदशास्त्रसंपन्न काशीनाथशास्त्री वामन लेले यांच्यासारखे अधिकारी विद्वान तर टिळकांच्या या मतावर प्रतिकूल टीका करण्यात अगदी अग्रेसर झाले. तत्कालीन 'श्रीसरस्वतीमंदिर' नावाच्या एका मासिकात 'रावसाहेब' नाना पावगी यांनी, 'सप्तसिंधूंचा प्रांत अथवा आर्यावर्तातील आमची जन्मभूमी' या नावाने एक लेखमालाच चालविली आणि टिळकांची या ग्रंथातली मते क्रमाक्रमाने खोडून काढली. अबिनास चंद्र दास यांनीही असेच दोन खंडांचे (सन १९२१ व १९२५) लिखाण करून टिळकांची मते प्रकरणश: खोडून काढली आहेत. काही अभ्यासकांनी आपल्या मुख्य अभ्यासातली आनुषंगिक बाब म्हणूनही टिळकांचे खंडन केलेले आहे. याचे प्रमाण तर खूपच जास्त आहे. या बाबतीत नाशिक येथील डॉ. प्रमोद पाठक यांचेही या विषयातले संशोधन आणि पीएच.डीचा प्रबंध उपलब्ध आहे. आर्यांचे मूलस्थान उत्तर ध्रुवाकडे असल्याच्या टिळकांच्या मताचे खंडन आजतागायत चालूच आहे. टिळकांचे समकालीन विद्वान ते आजच्या काळातले अभ्यासक, अशी एक मोठी फळी या मताच्या विरोधात आहे. ही सर्व मांडणी तपशीलवार इथे देणे शक्य नाही, इच्छुक वाचकांनी ती मुळातूनच वाचावी. लोकमान्यांचे भारतीय इतिहासातले वंदनीय आणि प्रेरक असे स्थान लक्षात घेऊन, या विषयात अत्यंत टोकाच्या भूमिकेत कोणी भारतीय विचारवंत जात नाहीत. परंतु, त्याचबरोबर आर्य नावाचे कोणी भटके भारताच्या बाहेरून भारतात आल्याचे लोकमान्यांचे हे मत कोणी मान्यही करत नाहीत.
 
 
खंडनातले ठळक मुद्दे
 
 
लोकमान्यांच्या मताच्या खंडनाच्या ठळक मुद्द्यांकडे एक ओझरती नजर मात्र आपण टाकूया. यातला एक मुख्य मुद्दा म्हणजे ऋग्वेद वगैरे वैदिक साहित्यात जी ठिकाणांची, नद्यांची, पर्वतांची नावे आलेली आहेत, ती उत्तर ध्रुवीय प्रदेशात कुठेही नसून भारतातच आहेत. त्यामुळे कुठल्याही एखाद्या वैदिक ठिकाणाचा शोध घेताना तो भारतातच घेणे उचित आहे, बाहेर नव्हे. दुसरा कळीचा मुद्दा म्हणजे, टिळकांनी या संशोधनाला आधार म्हणून वेदांच्या संहितांचे मॅक्स म्यूलर यांनी केलेले इंग्रजी अनुवाद वापरले आहेत. ते अगदी प्रामाणिक अनुवाद म्हणता येणार नाहीत. त्यामुळेच अनेक मंत्रांच्या अर्थाच्या बाबतीत टिळकांची दिशाभूल झालेली आहे. मॅक्स म्यूलर यांच्या एकूणच कार्यामागच्या हेतूमध्ये शंका घेण्यास भरपूर वाव आहे. त्यामुळे कुठल्याच भारतीय अभ्यासकाने त्यांच्या कार्याचा वापर आपल्या अभ्यासाचा आधार म्हणून करू नये. तिसरा मुद्दा म्हणजे, इंद्र-वृत्र लढाईचे जे वर्णन टिळकांनी केलेले आहे, ती घटना त्यांनी सांगितल्यानुसार उत्तर ध्रुवीय प्रदेशात कुठे झालेली नसून सतलज-बिआस नद्यांच्या परिसरात घडल्याचे दिसते. मुळात ती मानवी लढाईची कथा नसून डोंगरांच्या मध्ये बांध घालून अडविलेले पाणी तो बांध तोडून मोकळे करण्याच्या घटनेचे रूपकात्मक वर्णन आहे. हे आपण या लेखमालेच्या ११व्या लेखात तपशीलवार पाहिलेलेच आहे. चौथा ठळक मुद्दा म्हणजे, उत्तर ध्रुवप्रदेश सांगताना टिळकांनी दिलेले चाकांचे, त्यांना जोडणार्‍या आसाचे व त्याद्वारे गोल फिरणार्‍या आकाशाचे वैदिक वर्णन जर बरोबर मानायचे ठरवले, तर चाकांचा पुरातत्त्वीय पुरावा ध्रुवीय प्रदेशात आजतागायत कुठे मिळालेला नाही. तिथल्या तैगा किंवा सैबेरियाच्या बर्फाळ प्रदेशात तर चाकांनी युक्त वाहने आजही वापरत नाहीत, तर बर्फावर घसरत चालणार्‍या ओढायच्या गाड्याच वापरतात, तर मग त्या प्राचीन आर्यांनी बर्फाळ ध्रुवीय प्रदेशात चाके कशासाठी वापरली असतील? त्यांनी चाकांचे वर्णन केले तरी कशाच्या आधारावर? यांपैकी काही मुद्द्यांवर आगामी काही लेखांमध्ये आपण अधिक प्रकाश टाकणार आहोत.
 
 
या आणि अशा अनेक मुद्द्यांनी लोकमान्य टिळकांच्या या संशोधनाचे खंडन आजवर होत आलेले आहे. आर्यांनी भारताच्या बाहेरून कुठूनही भारतात स्थलांतर केल्याचा मुद्दा अशा रीतीने निकाली निघतो. मुळात आर्य भारतातले की उत्तर ध्रुवाकडचे, हा प्रश्नच उपस्थित करताना युरोपीय विद्वानांनी केलेली चलाखी आपण लक्षात घेतली पाहिजे. याचे काहीही उत्तर दिले, तरी उत्तर देणारा माणूस 'आर्य' शब्दाचा मूळचा गुणवाचक अर्थ बदलून त्याला वंशवाचक बनविण्याच्या युरोपीय विद्वानांच्या सापळ्यात अत्यंत अलगदपणे सापडतोच! जिथे लोकमान्य टिळकांसारखा विद्वान माणूस या सापळ्यात अडकला, तिथे आपल्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा!(क्रमश:)
 
 

- वासुदेव बिडवे
 
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात 'भारतविद्या' अथवा 'प्राच्यविद्या' (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
 
 
@@AUTHORINFO_V1@@