किती हा हलगर्जीपणा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2020
Total Views |

Dadar _1  H x W


जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाने महासत्तांनासुद्धा नामोहरम केले, तेथे सामान्य माणसाची काय कथा? म्हणून प्रत्येकाने त्याच्यापासून फार जपून वावरायला हवे. कोरोना हा विषाणू कोणीही पाहिलेला नाही. आता आपण जे चित्र पाहतो ते शास्त्रज्ञांनी कल्पनेने चितारलेले आहे. तरीही त्याने जगात दहशत माजवलेली आहे. मात्र, त्याची दहशत कमी होताच तो गेला असे समजून लोक निर्धास्त वावरायला लागले आणि त्याने पुन्हा विळखा घालायला सुरुवात केली. ही चूक कोरोनाची नाही, लोकांची आहे. त्यांचा हलगर्जीपणा त्याला कारणीभूत ठरला आहे. ऑगस्टमध्ये गणेशोत्सवाच्या काळात १४०० ते १५००च्या दरम्यान असलेली दररोजची बाधित रुग्णांची मुंबईतील संख्या गणेशोत्सवानंतर २५०० ते २६०० पर्यंत पोहोचली. रुग्णवाढीनंतर आरोग्ययंत्रणेची तारांबळ उडते. उपचारांत विस्कळीतपणा येतो. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होते. हे न समजण्याइतके लोक नक्कीच मूर्ख नाहीत. पण, मुळातच बेफिकीर प्रवृत्ती डोके वर काढते आणि त्याचे परिणाम इतरजनांना भोगावे लागतात. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या चार हजारांपर्यंत खाली आली होती. मुंबईतही दि. १६ नोव्हेंबर रोजी ४०९ पर्यंत रुग्णसंख्या खाली घसरली होती. पण, दिवाळी सणात लोक बेफिकीर वागले आणि कोरोनाने त्यांना विळखा घालायला सुरुवात केली. तीच संख्या मुंबईत आता हजाराच्या आसपास पोहोचली आहे. खरेतर मागच्या अनुभवातून लोकांनी शहाणे व्हायला हवे होते. पण, तेवढे शहाणपण लोकांकडे नाही, असेच दिसते. म्हणून राज्याच्या कुटुंबप्रमुखांचे बोटचेपे धारण याला कारणीभूत ठरले. मला आणीबाणी लादायची नाही. मागच्याप्रमाणे यावेळीही लोक सहकार्य करतील, हा त्यांचा अतिआत्मविश्वास लोकांना भोवला आहे. लोकानुनयालाही काही प्रमाण असते. कुटुंबप्रमुखाने अनेकदा कठोरही व्हावे लागते. त्यात राज्याचेच हित सामावलेले असते. पण, ती कठोरता त्यांनी मंदिरांचे टाळे उशिरा उघडण्यात दाखवली. लोकांच्या स्वैराचाराला चाप लावण्यात दाखवली नाही. बाजारात खरेदीला गर्दी करायची नाही, फटाके फोडायचे नाहीत, अशी ऑर्डरच काढली असती तर आटोक्यात आलेला कोरोना फोफावला नसता. आता घसरलेली गाडी रुळावर यायला काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार, हेच खरे.

जोर-बैठकांना सुरुवात

कुस्ती जिंकायची असेल तर आयत्या वेळी आखाड्यात उतरून जमत नाही. त्यासाठी अनेक वर्षे तयारी करावी लागते. खुराक घ्यावा लागतो, जोर-बैठका काढाव्या लागतात आणि युक्त्या-क्लुप्त्या समजून घेत डाव टाकावे लागतात, तरच बाजी मारता येते. हे भाजपने चांगलेच अनुभवलेले आहे. भाजपचे आता लक्ष्य आहे ते मुंबई महापालिका. मुंबई महापालिका ही सोन्याचे अंडे देणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. मुंबई महापालिका ज्यांच्या ताब्यात असेल, त्या पक्षाला आर्थिक सुबत्ता येते आणि त्या जोरावर राज्यावर सत्ता गाजवता येते, हे आता समीकरण झाले आहे. मुंबई महापालिकेत भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेनेची २५ वर्षांहून अधिक काळ सत्ता आहे. त्या जोरावर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्रीही विराजमान झाला. मात्र, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने ज्यांच्याबरोबर राज्याच्या सत्तेत सहभाग घेतला, त्या भाजपला नाकारत हिंदुत्वविरोधी विचारसरणीच्या लोकांना जवळ करत मुख्यमंत्रिपद मिळवले आहे. शिवाय ३३,४४१ कोटी रुपये अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची गंगा वाहतेय हे कोणीही नाकारू शकणार नाही. गंगा नदी शुद्धीकरणाप्रमाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराची गंगा साफ करणे हे पहिले कर्तव्य समजून भाजप यावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे, ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी मुंबई महापालिकेची निवडणूक संयुक्तपणे लढवील, असा अंदाज असला तरी काँग्रेस त्याला तयार होईल असे वाटत नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याचे संकेत दिले होते. मात्र, पालिकेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे रवी राजा यांनी प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवेल, यासाठी शिवसेनेशी युतीची गरज नाही, असे रवी राजा यांनी म्हटले आहे. मुंबई भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला आहे. शिवाय त्यांनी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे मुंबई महापालिकेची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वारे वाहत आहेत, तर इतर पक्ष ‘पुढे काय’ अशा संभ्रमात आहेत.
 
- अरविंद सुर्वे 

@@AUTHORINFO_V1@@