उडान पंखोंसे नहीं हौसलेसे होती हैं!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2020   
Total Views |

Dr Anita Shinde_1 &n
 
 
 
 
सामाजिक रूढीरिती परंपरांना स्वअनुकूल करत डॉ. अनिता शिंदे यांनी स्वत:सोबत समाजालाही प्रगतिपथावर आणण्याचे काम केले, त्यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा.
 
 
 
रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल. कोणत्याही परिस्थितीत कधीही निराशा न होता, नेहमीच प्रत्येक परिस्थितीवर मात करत यशस्वी होणार्‍या व्यक्ती खूप कमी असतात. त्या व्यक्तींच्या यशाचा प्रकाश दिसतो, पण त्यामागे त्यांनी किती अंधार चिरला आहे, याची कल्पनाही दुसरा कोणी करू शकत नाही. अशीच एक यशस्विनी आहे डॉ. अनिता शिंदे. उच्चविद्याविभूषित असून एम.ए, बी.एड, एम.फिल, पीएच.डीपर्यंत शैक्षणिक गुणवत्ता असून त्यांनी ‘नेट’ परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. ‘बीड जिल्ह्याचे अर्थकारण’ यावर त्यांनी एम.फिल केले आहे, तर ‘मराठवाडा विद्यापीठ नामांतरामध्ये महिलांचे योगदान’ या विषयावरही त्यांनी पीएच.डी केली आहे. सध्या बीडच्या केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयात त्या इतिहास विभाग प्रमुख आहेत. बीडमध्ये लोकाभिमुख समाजकार्य करणारी स्त्रीशक्ती म्हणून त्यांची ओळख घरोघरी आहे. आर्थिक किंवा सामाजिक कारणामुळे शिक्षण घेऊ न शकणार्‍या मुलींना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी डॉ. अनिता यांनी खूप काम केले. गरजूंनी सकारात्मक कामासाठी लाचारी पत्करून कोणतीही तडजोड करू नये, यासाठी त्यांनी कित्येक होतकरूंना आर्थिक आणि मानसिक स्तरावर मदतही केली. कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’ झाला. बीडमध्येही कित्येक घरांच्या चुली थंडावल्या, अशावेळी अनिता यांनी गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य आणि आवश्यक वस्तू वितरीत केल्या.
 
 
कोरोना काळात अनिता यांनी या कष्टकरी महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम केले. ‘मैत्र’ या संस्थेच्या त्या संस्थापक-पदाधिकारी सदस्य आहेत. महिलांचे वैयक्तिक, सामाजिक आणि बौद्धिक उत्थान व्हावे, यासाठी त्या या माध्यमातून प्रयत्न करतात. महिलांच्या सामाजिक ज्ञानकक्षा वाढाव्यात, यासाठी ‘मैत्र’च्या माध्यमातून महिलांना एक विषय दिला जातो. या विषयावर महिलांनी अभ्यास करायचा आणि तो विषय मुद्देसूदपणे गटात मांडायचा, तसेच देशात घडणार्‍या घडामोडींवरही विचार मांडायचे असा एक उपक्रम या संस्थेमध्ये चालतो. हेतू हा की, ग्रामीण महिलांमध्ये जागृती यावी, त्यांच्या विचारांच्या कक्षेत समाज आणि देशासंबंधी विषय यावेत. बीडमध्ये महिलांचे बचत गट बांधणे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे यासाठीही डॉ. अनिता काम करतात. थोडक्यात, अनिता या महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
 
 
डॉ. अनिता शिंदे यांचे यांच्या जीवनाचा मागोवा घेतला तर जाणवते की, डॉ. अनिता शिंदे यांचे आयुष्य म्हणजे रूढी, परंपरा आणि आधुनिक विचारदर्शन यातला दुवा साधणारे आयुष्य आहे. कर्नाटकमधील बिदर जिल्ह्यातील एकंबा या गावचे शिंदे कुटुंब, व्यंकटराव शिंदे आणि रूक्मिणी शिंदे यांना चार अपत्ये. तीन मुले आणि एक मुलगी- अनिता. वडील जवळजवळ अशिक्षितच. मातंग समाजातलीच नव्हे, तर संपूर्ण एकंबा गावातून मुंबईला येणारी पहिली व्यक्ती म्हणजे व्यंकटराव. ते माळकरी, अत्यंत धार्मिक. मुंबईत अंधेरी येथे शिंदे कुटुंब राहत असे. आर्थिक परिस्थिती ठिकच होती. मात्र, घरात माणसांचा कायम राबता. व्यंकटेश यांना समाजकार्याची आवड. परिचितांच्या घरी लग्न किंवा मृत्यू झाला असेल तर सगळ्यात पहिले व्यंकटराव मदतीला जात. अशा परिस्थितीत घरची आर्थिक घडी विस्कटली, व्यंकटराव छोट्या अनिताला सांगत, “बाई, माणूस कसा होता आणि त्याने काय कमावलं हे त्याच्या मातीला कळते. माणसं जोडा, तीच श्रीमंती. माणसांना वेळकाळाला मदत करा.” अनिता यांच्या मनावर हे वाक्य संकल्पासारखे कोरले गेले.
 
 
पुढे अनिता बारावी उत्तीर्ण झाल्या आणि त्यांचा विवाह नांदेडच्या हणमंतराव देवगिरे यांच्याशी झाला. अनिता यांना पुढे शिकायचे होते. त्यांनी हणमंतराव यांना इच्छा दर्शवली. सासरी अतिशय पारंपरिक वातावरण. त्यामुळे सुरुवातीला समन्वय साधणे जड गेले. मात्र, शिकायला परवानगी मिळाली. परीक्षा देण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडणे इतकाच बाहेरच्या जगाचा संबंध येई. माहेरी अत्यंत खुल्या वातावरणात वाढल्यामुळे अनिता यांना खूपच दडपण येई. या दडपणातच एम.एपर्यंत शिक्षण झाले. एम.एला त्या मराठवाडा विद्यापीठातून पहिल्या पाचमध्ये, तर महाविद्यालयात पहिल्या आल्या. पुढे पतीच्या परवानगीने एम.फिल केले. कर्मधर्म संयोगाने महाविद्यालयात नोकरी लागली. महाविद्यालयाच्या प्राचार्य दीपा क्षीरसागर या अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. त्यांच्यासोबत अनिता यांनी सामाजिक कार्य करायला सुरुवात केली. त्या महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या अधीक्षक झाल्या. त्यांना दोन मुलीही झाल्या. अनिता आणि हणमंतराव महाविद्यालयाच्या कॉटेजमध्ये राहायला आले. महाविद्यालयाच्या मोकळ्या आणि निकोप वातावरणामुळे डॉ. अनिता यांच्यावरील पारंपरिक बंधनेही कमी झाली. या सगळ्या घडामोडीत पती हणमंतराव यांचे योगदान मोठेच आहे. अनिता यांनी तीन वेळा ‘नेट’ परीक्षा दिली, पण अनुत्तीर्ण झाल्या, पण त्या खचल्या नाहीत, आपल्याला पुढे जायचे आहे, स्त्री म्हणून आपले अस्तित्व निर्माण करायचे आहे, या विचारांनी त्यांनी जिद्द कायम ठेवली. आज समाजासमोर डॉ. अनिता शिंदे यांचा आदर्श आहे. डॉ. अनिता म्हणतात, “माणसांना त्यांच्या पडत्या काळात मदत करणे हीच माणुसकी आहे. उडान पंखोसे नहीं, होसलेसे होती हैं।”
 
 
@@AUTHORINFO_V1@@