तुलनेच्या तराजूत...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2020
Total Views |

Tulana_1  H x W
 
 
आपल्याला लहानपणापासून आपल्या सामाजिक विचार पद्धतीने आपल्या मनावर बिंबवलं आहे की, जोपर्यंत आपण आपली तुलना दुसर्‍यांशी करत नाही, तोपर्यंत आपला विकास होणार नाही. खरंतर दुसर्‍यांच्या तुलनेत तुमचा विकास त्या दुसर्‍या व्यक्तीच्या क्षमतेएवढाच होईलही कदाचित. पण, तो विकास तुमच्या खास क्षमतेपर्यंत पोहोचणार नाही म्हणूनच स्वतःचे एकमेकाद्वितीय असे जगातले अस्तित्व आपण ओळखलं पाहिजे.
 
 
आपण या जगात जन्म घेतो तेव्हा आपण कुणीतरी खास असतो. प्रत्येकाची या जगात होणारी ‘एन्ट्री’ स्पेशल असते. आपण अनेक प्रकारे खास असतो. आपले जैविक अस्तित्व खास असते. आपली आनुवांशिक रचना खास असते. ती रचनाच मुळी शास्त्राच्या आधारावर झालेली असते. या जगात आल्यानंतरही आपली प्रत्येकाची जगण्याची आपली ‘स्टाईल’ असते. एक स्वतःची लकब असते. आपल्या दिसण्यातही या महाविश्वात एक खासियत असते. ती दुसर्‍या व्यक्तीत असू शकत नाही. फार फार काय कुणी असं म्हणू शकतं की, या दोघां व्यक्तींमध्ये बरंच साम्य आहे. त्यांची चालण्याची ढब सारखी आहे. त्यांच्या बोलण्यात किती साधर्म्य आहे. बसं इतकंच! त्याच्यापलीकडे जाऊन त्या तुलनेत काही दम दिसून येत नाही. तरीही आपण आपली तुलना दुसर्‍यांबरोबर का करतो? कधी आपण दुसर्‍यांपेक्षा उत्तम असतो, कधी आपल्यात काहीतरी कमी असते. अर्थात, एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की, आपली तुलना दुसर्‍यांबरोबर करण्यासाठी आपल्याकडे एखादं शास्त्रशुद्ध मोजमाप घेणारं यंत्र नाही. आपण कधी आपल्या स्वतःची तुलना फुलांशी, प्राण्यांशी वा पक्ष्यांशी केली आहे का? तर नक्कीच नाही. तशी तुलना मूर्खपणाची ठरेल. आपण कधी घोड्याची तुलना गाईशी केली आहे का? नक्कीच नाही. तसं करता येणं शक्यच नाही. कारण, ते खूपच अशास्त्रीय आहे. आपण तुलना कोणाची करतो, ज्यांच्यामध्ये काही संकल्पनात्मक साम्य आहे, अशा दोघांमध्ये वा अनेकांमध्ये. समजा, आपण या पृथ्वीतलावर एकटेच अस्तित्वात असतो, तर आपण आपली तुलना तरी कोणाबरोबर करणार? आपल्याला कसं कळणार की, आपण दिसायला सुंदर आहोत की कुरूप आहोत? गोरे आहोत की काळे आहोत? गरीब आहोत की श्रीमंत आहोत? असो. आपण एकटेच असू तर आपण जसे असू तसे आपल्याला स्वीकारणे भाग आहे. या परिस्थितीत आपल्याकडे दुसरा पर्यायच उरत नाही. आपण जसे आहोत तसे आहोत, हे सत्य स्वीकारण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही.
 
 
आपण जरा निसर्गाच्या अस्तित्वाकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, मोगर्‍याच्या झाडाजवळ गुलाबाचं झाड एकाच बागेत वाढत असतं. नारळाच्या झाडाजवळ आंब्याचं झाडही वाढत असतं. हे का शक्य आहे? कसं शक्य आहे? कारण, ही ती जगण्याची ऊर्जा जेव्हा जगत असते, फळत असते, तेव्हा त्या प्रत्येकाचं लक्ष फक्त आपली ऊर्जा स्वतःच्या विकासासाठी वापरण्याकडे असते. आपल्या अस्तित्वातील ऊर्जा निसर्ग दुसर्‍याच्या ऊर्जेची तुलना करण्यासाठी वाया घालवत नाही. निसर्गाच्या विविधतेत खूप अस्तित्व जगत असतात, पण त्या सगळ्या अस्तित्वांमध्ये जीवनाचा आनंद खुलत असतो, बहरत असतो. त्या अस्तित्वात आनंदाचा झरा असतो, तृप्तीची नदी असते, समाधानाचा सागर असतो. सगळे आपापल्या जगण्याच्या लयीचा आनंद घेत असतात. आपापल्या अस्तित्वाला अधोरेखित करताना दुसर्‍याच्या अस्तित्वाचा सन्मान करत असतात. पण, माणूस म्हणून आपल्याला हे सहज जमत नाही. आपण आपली तुलना सतत कुणाशी तरी करत असतो. आपलं सौंदर्य, संपत्ती, विद्वत्ता, सामाजिक दर्जा अशा अनेक गोष्टींची तुलना आपण करत असतो. आपण सतत कुणाशी तरी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या झगडत असतो. कधी बहिर्मुख होऊन आपण झगडतो, तर कधी अंतर्मुख होऊन स्वतःशीच युद्ध करतो. या सगळ्यात खरंतर आपणच कळवळतो. कधी कधी आपण दुसरे आपल्याला कधी त्रास देतात, याची वाट पाहत राहतो. कारण, दुसर्‍याकडे सुखाचा किती पसारा मांडला आहे, याची बेरीज-वजाबाकी करताना आपणच अतृप्त राहतो, दुःखीही होतो.
 
आपल्याला लहानपणापासून आपल्या सामाजिक विचार पद्धतीने आपल्या मनावर बिंबवलं आहे की, जोपर्यंत आपण आपली तुलना दुसर्‍यांशी करत नाही, तोपर्यंत आपला विकास होणार नाही. खरंतर दुसर्‍यांच्या तुलनेत तुमचा विकास त्या दुसर्‍या व्यक्तीच्या क्षमतेएवढाच होईलही कदाचित. पण, तो विकास तुमच्या खास क्षमतेपर्यंत पोहोचणार नाही म्हणूनच स्वतःचे एकमेकाद्वितीय असे जगातले अस्तित्व आपण ओळखलं पाहिजे. आपण दुसर्‍याबरोबर तुलना का करतो? कारण, आपल्याला असं वाटतं की, आपल्यात काहीतरी कमी आहे. तुलना ही खरेतर कृत्रिमतेच्या संकल्पनेवर आधारित आहे. झालेच तर दुसर्‍यापेक्षा अधिक असावे, ही ती संकल्पना. यामुळे आपले स्वतःचे असे तृप्त विधायक आयुष्य कसे जगावे, हे माणूस विसरून जातो. त्याचा स्वतःवरचा विश्वास उडून जातो. स्वतःमधील क्षमता, खास ऊर्जा तर माणसाला ओळखता आली तर जगणं सुंदर होईल. आपल्याला आपले आंतरिक समाधान जेव्हा ओळखता येईल, तेव्हा सुख म्हणजे नक्की काय असतं, हे कळायला लागेल.
 
 
- डॉ. शुभांगी पारकर
 
@@AUTHORINFO_V1@@