गप्पू-पप्पू युतीची डाळ शिजणे कठीण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2020   
Total Views |

Bihar Election_1 &nb
 
 
 
बिहारमधील जनता ‘गप्पू’ आणि ‘पप्पू’ यांच्या आघाडीकडून जी खोटी आश्वासने दिली जात आहेत, त्यास भुलणार नाही, असा जनता दल (संयुक्त ) आणि भाजप आघाडीस विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बिहारमधील लढाई ही ‘युवराजद्वयी’ विरुद्ध ‘विकासाचे दुहेरी इंजिन’ यांच्यातील असल्याचे म्हटले आहे.
 
 
बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. आता केवळ तिसर्‍या टप्प्यातील मतदान होणे बाकी आहे. या निवडणुकीमध्ये मतदार पुन्हा जनता दल (संयुक्त ) आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीस निवडून देतील, असा विश्वास युतीच्या नेत्यांना वाटत आहे. बिहारच्या जनतेने लालूप्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडीदेवी यांची, प्रत्येकी साडेसात वर्षांची, अशी मिळून एकूण १५ वर्षांची राजवट अनुभवली आहे. आपल्या परिवाराचे ‘भले’ करण्यासाठी लालूप्रसाद यादव परिवाराकडून सत्तेचा गैरवापर केला गेल्याचा अनुभव बिहारमधील जनतेने घेतला आहे. बिहारचे मुख्यमंत्रिपद उपभोगलेले लालूप्रसाद यादव भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये दोषी ठरल्याने सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. असे असताना राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांची आघाडी जनतेने आपल्याला मते द्यावीत, यासाठी मतदारांची याचना करीत आहेत. पण, बिहारमधील जनता ‘गप्पू’ आणि ‘पप्पू’ यांच्या आघाडीकडून जी खोटी आश्वासने दिली जात आहेत, त्यास भुलणार नाही, असा जनता दल (संयुक्त ) आणि भाजप आघाडीस विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बिहारमधील लढाई ही ‘युवराजद्वयी’ विरुद्ध ‘विकासाचे दुहेरी इंजिन’ यांच्यातील असल्याचे म्हटले आहे. बिहारची जनता या दोन ‘युवराजां’च्या आघाडीस मुळीच थारा देणार नाही. कारण, जनतेला पुन्हा ‘जंगलराज’ नको आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
 
 
बिहारमधील नितीशकुमार यांच्या सरकारविरुद्ध राष्ट्रीय जनता दल - काँग्रेस आघाडीच्या महागठबंधनने अपप्रचार करणे सुरूच ठेवले आहे. लालूप्रसाद यांचे एक पुत्र तेजस्वी प्रसाद यादव यांना महागठबंधनने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले आहे. पण, या तेजस्वी प्रसाद यादव यांची, विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी तुलना तरी होऊ शकते का, असा प्रश्न केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी विचारला आहे. तेजस्वी यादव हे दहावीची परीक्षाही उत्तीर्ण नाहीत. त्यांना ‘कॅबिनेट’ या शब्दाचे साधे स्पेलिंगही लिहिता येत नाही. अशी व्यक्ती इंजिनिअर असलेल्या नितीशकुमार यांच्यावर टीका करीत असल्याकडे त्यांनी जनतेचे लक्ष वेधले आहे. तेजस्वी यादव यांच्या वडिलांनी म्हणजे लालूप्रसाद यादव यांनी, आपल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत एक लाख नोकर्‍या देण्याचा निर्णय घेतला होता. पण, प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. ज्यांनी नोकर्‍यांसाठी अर्ज केले होते त्यांचे अर्ज कचर्‍यामध्ये धूळ खात पडून आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. अश्विनी चौबे यांनी राजद-काँग्रेस युती म्हणजे ‘गप्पू’ आणि ‘पप्पू’ यांची युती असल्याची टीका केली आहे. आता यामध्ये गप्पू कोण आणि पप्पू कोण हे सूज्ञ वाचकांना सांगण्याची आवश्यकता नाही.
 
 
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने जे संकल्पपत्र प्रसिद्ध केले होते, त्यामध्ये बिहारमधील जनतेला ‘कोविड-१९’ची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. पण, या आश्वासनावरून विरोधकांनी किती रान उठविण्याचा प्रचार केला? भाजपविरोधी माध्यमांनी या मुद्द्यावरून भाजपची बदनामी करण्याची संधी सोडली नाही. यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असा आरोप करण्यात आला. निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात आली. पण, शेवटी झाले काय? निवडणूक आयोगाने असे आश्वासन देण्यामध्ये काहीच गैर नसल्याचे स्पष्ट केले. आयोगाच्या या निर्णयानंतर एक बाब जाणवली आणि ती म्हणजे, ज्या वृत्तपत्रांनी मोठमोठे मथळे देऊन भाजपच्या या आश्वासनावरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनी आयोगाच्या निर्णयाची मात्र कोठे तरी कोपर्‍यामध्ये दखल घेतली! अशा पत्रकारितेला काय म्हणावे? अशा प्रकारची पत्रकारिता केल्यावर विश्वासार्हता कशी राहील? आयोगानेच तक्रार फेटाळून लावल्याने आता आयोग पक्षपाती असल्याची टीका करण्यासही विरोधक मागे पुढे पाहणार नाहीत!
 
 
पंतप्रधान मोदी यांनी तर आपल्या प्रचारसभेत युवराजद्वयींचा चांगलाच समाचार घेतला. उत्तर प्रदेशामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही दोन युवराज होते. त्यांना जनतेने जशी जागा दाखवून दिली तशी बिहारमधील जनतेनेही या युवराजांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन केले. दुहेरी इंजिनाच्या द्वारे होणार विकास हवा की जंगलराज हवे, असा प्रश्नही त्यांनी बिहारच्या जनतेला केला. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे मतदान झाले, त्याचा कौल पाहता बिहारमध्ये पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर येईल आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. बिहारमध्ये मतदानाच्या पहिल्या फेरीत, गेल्या २८ ऑक्टोबर रोजी ५५.६८ टक्के मतदान झाले. हे मतदान पाहता राजकीय निरीक्षकांचे अंदाज कोलमडून पडणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. आता दुसर्‍या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यामध्ये ९४ जागांसाठी मतदान होत आहे. त्यातील ४६ जागा भाजप आणि ४३ जागा जनता दल (संयुक्त) लढवित आहे. अन्य पाच जागा आघाडीतील मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत.
 
 
या निवडणुकीत आपणच सत्तेवर येऊ, असा दावा तेजस्वी यादव करीत असले तरी तसे होणार नाही, असे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांचे म्हणणे आहे. बिहारमधील जनतेने राज्यामध्ये झालेला विकास अनुभवला आहे. त्यामुळे जनता अपप्रचारास मुळीच बळी पडणार नाही, असे ते म्हणतात. बिहारमधील प्रत्येक खेड्यामध्ये आज वीज पोहोचली आहे. ज्या प्रवासास पूर्वी १०-१२ तास लागायचे त्या प्रवासास आता, रस्ते उत्तम झाल्याने फक्त चार-पाच तास लागतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. बिहारच्या ४५ हजार गावांमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क निर्माण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नितीश कुमार यांच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती देत असतानाच, ज्या लालूप्रसाद- राबडीदेवी यांच्या सरकारने बिहारवर १५ वर्षे राज्य केले, पण त्यांची छायाचित्रे पोस्टरवर का छापण्यात आली नाहीत, असा प्रश्नही विचारला आहे. तेजस्वी यादव यांना आपल्याच मात्या-पित्याने जे ‘कर्तृत्व’ दाखविले ते लोकांपुढे येता काम नये, असे वाटल्यानेच त्यांची छायाचित्रे महागठबंधनच्या पोस्टरवरून वगळण्यात आली, असाच याचा अर्थ आहे ना?
 
 
बिहार विधानसभा निवडणुका आणि मध्य प्रदेशामध्ये होणार्‍या विधानसभेच्या २८ जागांच्या पोटनिवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विरोधक जनता दल (संयुक्त) आणि भाजप युतीचे सरकार बिहारमध्ये सत्तेवर येता काम नये, यासाठी सर्व तो आटापिटा करीत आहेत. एका ‘युवराजद्वयी’स २०१७च्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीत जसे अपयश आले, तसेच अपयश बिहार निवडणुकीच्या प्रचारात उतरलेल्या या ‘युवराजद्वयी’स पाहावे लागेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. पण, तो सार्थ ठरलेला पाहण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@