मॉड्युलर किचनचा राजा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2020   
Total Views |
mk_1  H x W: 0



हा उद्योजक तयार करतो ‘मॉड्युलर किचन.’ आधुनिक स्वयंपाकघर. ज्यामुळे भांडी सुटसुटीत राहतात आणि स्वयंपाकघराची सम्राज्ञीदेखील आनंदी राहते. ही किमया घडवून आणतात ते ‘यशश्री एंटरप्रायझेस’चे राजेंद्र कोरपे.
 
 
 
‘भांड्याला भांडं वाजणं’ म्हणजे घरातल्या नवरा-बायकोचं भांडण, हे एक सांकेतिक लक्षण समजलं जातं. मराठी भाषा या अशाच म्हणींनी समृद्ध झाली आहे. शेकडो वर्षे या म्हणी बोलीभाषेत वापरल्या जातात. मात्र, ‘त्या’ उद्योजकाने ही म्हण काही अंशी खोटी ठरवली. त्याने असं काहीसं स्वयंपाकघर निर्माण केलं की, ‘भांड्याला भांडी लागतच नाही.’ शब्दश: आणि सर्वार्थाने हे खरंच म्हणावं लागेल. कारण, हा उद्योजक तयार करतो ‘मॉड्युलर किचन.’ आधुनिक स्वयंपाकघर. ज्यामुळे भांडी सुटसुटीत राहतात आणि स्वयंपाकघराची सम्राज्ञीदेखील आनंदी राहते. ही किमया घडवून आणतात ते ‘यशश्री एंटरप्रायझेस’चे राजेंद्र कोरपे.
 
 
काहीसे अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिलदार व्यक्तिमत्व. सर्जनशीलता ठासून भरलेले. बोलण्यात वाकचातुर्य. हे सारे गुणधर्म कोरपेंच्या ठायी आहेत. मूळच्या पुण्यातील राजगुरुनगरमधील वाफगावचं हे कोरपे कुटुंब. या कुटुंबाचे प्रमुख नंदकुमार कोरपे हे पुण्याहून मुंबईला आले. मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये नोकरी करु लागले. त्यांची पत्नी सरोजिनी या उत्तम गृहिणी होत्या. या दाम्पत्यांना एकूण पाच अपत्ये. तीन मुली अन् दोन मुले. यात सर्वात लहानगा म्हणजे राजेंद्र. सगळे प्रेमाने त्याला राजूच म्हणायचे. राजू तसा लहानपणापासून सर्जनशील वृत्तीचा. काही ना काही नवीन सतत करत बसायचा. अभ्यासात साधारण, पण खेळात आणि इतर कलागुणांमध्ये नेहमी पुढे. त्याचा जन्म नळबाजारचा, पण बालपण गेलं ते मुलुंडमध्ये. मुलुंड विद्यामंदिरमध्ये त्याचं दहावीपर्यंतचं शालेय शिक्षण झालं. त्या वेळच्या प्रथेनुसार पारंपरिक शिक्षणपद्धतीकडे न वळता, त्याने जरा वेगळी वाट चोखाळली. वांद्य्राच्या फादर अ‍ॅग्नेलमधून ‘फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी’ विषयांत त्याने पदविका प्राप्त केली.
 
 
पदविकाचा अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच, राजू ‘सुपरटेक एंटरप्रायझेस’मध्ये नोकरीस लागले. तब्बल १५ वर्षे त्यांनी तिथे नोकरी केली. एका तपाहून अधिक ज्ञान मिळवले की, ते ज्ञान ऋषितुल्य ज्ञान असते असं म्हटलं जातं. राजूनीसुद्धा आपल्या क्षेत्रातील प्रचंड ज्ञान मिळवलं. त्यानंतर त्यांना मनोमन वाटले की, आपण आपला स्वतंत्र व्यवसाय सुरु करावा. १९९५च्या आसपास त्यांनी छोटासा कारखाना सुरु केला. त्याकाळी पंख्यासाठी ‘क्रॉम्प्टन ग्रीव्हज’ नावाची कंपनी प्रसिद्ध होती. आपल्या छताला जे पंखे लटकलेले असतात, त्या पंख्यांच्या पात्यांना पियू कोटिंग करण्याचे काम राजू करत असत. त्यामुळे ‘क्रॉम्प्टन ग्रीव्हज’ हे त्यांचे प्रमुख ग्राहक होते. सोबतच ‘गोदरेज’ आणि ‘मफतलाल इंडस्ट्रीज’सारख्या फर्निचर कंपन्यांच्या कपाट आणि तत्सम इतर गोष्टींसाठीसुद्धा राजू यांची कंपनी कोटिंगचे काम करुन देई.
 
‘मफतलाल’ फर्निचरच्या कोटिंगचे काम राजू यांच्याकडून करुन घेत. हळूहळू त्यांनी राजू यांना विश्वासात घेऊन फर्निचरची इतर कामेसुद्धा देऊ केली. त्यासाठी लागणारी यंत्रणा राजू घेऊ लागले. बरं, ही यंत्रणा हजार रुपयांची नव्हती, तर ती लाखोंच्या घरातली होती. ‘मफतलाल’मुळे राजू पूर्णत: फर्निचर क्षेत्रात उतरले. त्यांनी स्वत:ची ‘यशश्री एंटरप्रायझेस’ नावाची कंपनी सुरु केली. २००१च्या दरम्यान ‘यशश्री’ सुरु झाली. अवघ्या दोन वर्षांत या कंपनीने आपलं बस्तान बसवलं. त्यासाठी मशीन्स घेण्यास राजू यांनी सुरुवात केली. २००३ रोजी चार लाखांचे पहिले मशीन घेतले. त्यानंतर जागतिक मंदीच्या काळात या पठ्ठ्याने धाडस केले आणि थेट ११ लाख रुपयांचे मशीन खरेदी केले.
 
या मंदीच्या काळात व्यापार थंड असताना राजू यांनी घेतलेली ही उडी कौतुकास्पद होती. ही उडी ‘यशश्री’साठी वाघाची झेप ठरली. त्यानंतर त्यांनी २०१६ रोजी तब्बल ४० लाखांची यंत्रसामग्री खरेदी केली. स्वत:चे बचतीचे पैसे आणि बँकेचे कर्ज, अशा विविध माध्यमांतून राजू यांनी भांडवल उभारले. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगा एवढ्या किमतीच्या यंत्रणा खरेदी करुन स्वत:चा व्यवसाय वाढवत आहे, हे अनेकांसाठी प्रेरणादायी होते. या क्षेत्रातील मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक तरुण राजू यांच्याकडे येत असत, राजूदेखील हातचं काहीही न राखता, त्यांनी जे काही ज्ञान कमावलेलं आहे, ते या तरुणांसोबत शेअर करत असे.
 
 
याच कालावधीत राजू यांनी कारखान्यासाठी रबाळे येथे जागा घेतली. तिथून ते सगळी यंत्रणा राबवू लागले. ‘मफतलाल’ कंपनीने इटालियन बनावटीचे एक मॉड्युलर किचन दाखवले. राजूने त्या पद्धतीचे किचन तयार करुन दिले. ‘मफतलाल’ कंपनी राजू यांच्या कार्यपद्धतीवर पहिल्यापासूनच खूश होती. पण, इटालियन बनावटीच्या या स्वदेशी कामाचे त्यांनी तोंडभरुन कौतुक केले. आपले भारतीय कौशल्य जगातल्या सर्वोत्तम कौशल्यांपैकी एक आहे, हे राजू यांनी सिद्ध करुन दाखवले. राजू यांची ‘यशश्री एंटरप्रायझेस’ ही कंपनी फर्निचर, मॉड्युलर किचनसोबत इंटिरिअर डिझायनिंगसुद्धा करायची. स्वित्झर्लंड येथील ‘स्टॅण्डर्ड चार्टर्ड’ या बहुराष्ट्रीय बँकेच्या कामाचे कौतुक तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले. कंपनीने ‘यशश्री’चे कौतुक करणारे थेट पत्रच राजेंद्र कोरेपेंना पाठवले होते.
 
जागतिक स्तरावर असा दबदबा निर्माण करत असतानाच ‘यशश्री’ भारतात आपली पाळेमुळे घट्ट करत होती. अनेक आर्किटेक्ट, इंटिरिअर डिझायनर, लॅण्ड डेव्हलपर्स यांसारख्या बांधकाम व्यावसायिक संस्था या ‘यशश्री’च्या ग्राहक झाल्या. कल्पकता, वेळेवर कामाचा उरक, प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर फर्निचर आणि मॉड्युलर किचनच्या क्षेत्रात ‘यशश्री’ने स्वत:चा अमीट ठसा उमटविला. होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, इंटिरिअर डिझायनिंग या सेवा कंपनी ग्राहकांना प्रदान करते. आज ‘यशश्री’ प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अनेकांना रोजगार देते. सध्या काही कोटी रुपयांची उलाढाल ही कंपनी करते.
 
 
राजेंद्र कोरपे यांचा विवाह १९९५ साली कल्पना या सुविद्य तरुणीसोबत झाला. या दोघांना कन्यारत्ने आहेत. मोठी भार्गवी इंटिरिअर डिझायनर आहे, तर छोटी गौरी ‘प्रॉडक्ट डिझायनिंग’ या अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या वर्षांत शिकत आहे. दोन्ही कन्या आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात हातभार लावत आहेत. ‘यशश्री’ची दुसरी पिढी आता घडत आहे. ‘तुम्ही कुठून आलात याला महत्त्व नाही. तुम्ही काय कर्तृत्व करता हे महत्त्वाचं’ असं एका थोर तत्त्वज्ञाने सांगितलेले तत्त्वज्ञान राजेंद्र कोरपे पुरेपूर जगले. फर्निचरच्या जगातले विशेषत: मॉड्युलर किचनमधले राजा ठरले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@