‘अभ्यंगस्नान’ : आरोग्यासाठी एक वरदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2020
Total Views |

Abhyangsnan_1  
 

दीपावलीनिमित्त दरवर्षी घरोघरी अभ्यंगस्नान करायची परंपरा आपल्या समाजात पूर्वापारपासून आहे. वर्षानुवर्षांपासून सुरु असलेल्या या परंपरेमागे अनेक प्रकारचे शास्त्र आहे. या शास्त्रानुसार अभ्यंगस्नान हे आरोग्यासाठी एक प्रकारचे वरदानच असल्याचे सांगितले जाते. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरेचे अधिक महत्व सांगणारा हा लेख...
 
 
अभ्यंग, अभि + अंग = अभ्यंग असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संपूर्ण शरीराला अभय देणारे अभ्यंग. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या धार्मिक गोष्टींचे दाखले देऊन आपल्या शरीराचे रक्षण कसे होईल यावर भर दिला गेला आहे यामागे विज्ञान आहे अंधश्रद्धा नाही. हेच पाहा ना ! आता दिवाळी सुरु झाली आहे.
 
नरकचतुर्दशी या दिवशी पहाटे भगवान कृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. हा एक राजा होता आणि त्याने स्त्रियांना बंदी करून आपल्या कैदेत ठेवले होते. त्याच्या वधानंतर कृष्णाने या स्त्रियांची सुटका केली. नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कुणी या दिवशी सकाळी मंगलस्नान करेल त्याला नरकाची बाधा होऊ नये. कृष्णाने त्याला वर दिला. म्हणून त्यानुसार नरकात जाण्यापासून मानवाला वाचविणारे पवित्र आणि मंगल स्नान या दिवशी पहाटे करण्याची पद्धती प्रचलित आहे.
 
अभ्यंगस्नान हे पौराणिक कथेशी जोडले गेलेले दिसून येते. या मुहूर्तावर केलेले अभ्यंगस्नान फलदायी होते अशी विचार धारा आहे. डोक्यास तेल लावून मर्दनाने कानविकार दूर होतात. कानाभोवती, कानाच्या पाळीस मर्दन तसेच कानात तेल टाकण्याने पायांना त्याचा फायदा मिळतो. डोळ्यात गायीचे तूप टाकल्याने आणि डोळ्यास तेलाने (हळुवार) मर्दन केल्याने दातांचे रोग नष्ट होतात. बदामाचे तेल, तिळाचे तेल इत्यादी. लावून क्लॉकवाईज मसाज करावा, असे आपले आयुर्वेद सांगते.
 
नरकासुर म्हणजे मनाला वाईट यातना भोगायला लावणार्या (नरकयातना) वाईट विचारांचा त्याग करून चांगल्या विचारांना स्थान द्यावे. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे. पावसाळ्यात अन्न पचन कमी होते. त्यामुळे पित्ताचा त्रास वाढतो आणि त्वचाविकार बळावतात हळूहळू हिवाळा सुरु होतो. शरीरात मुरलेले पित्त वात रुपाने पसरण्यास सुरुवात होते, या काळात वाताचे विकार वाढू लागतात, पाणी कमी प्रमाणात प्यायले जाते. त्यामुळे त्वचा कोरडी, शुष्क पडायला लागते. पाय फुटणे म्हणजे जळवात वाढतो आणि हे सगळे त्रास होऊ नये म्हणून अभ्यंगस्नान सांगितले आहे, जेणेकरून त्वचेची, स्नायूंची, सांध्यांची हाडांची काळजी घेतली जाईल. हे विज्ञान.
 
तीळतेल अथवा खोबरेल तेल कोमट करुन त्याने हळुवार मसाज करावा, स्नेहन करावे, रगडू नये. बोटांनी हळूहळू तेल त्वचेत जिरवावे. प्रथम केसांच्या मुळाशी, नंतर कानात तेल घालून आजुबाजूला मसाज करावा, मग डोळे-नाक-चेहरा करत करत हृदयाच्या दिशेने मसाज करावा. नंतर सुगंधित उटणे म्हणजे वाळा, कपुरकचरी, नागरमोथा, चंदन, गुलाबाच्या पाकळ्या, हळद, डाळीचे पीठ (हरबरा किंवा मसूर) वगैरे द्रव्य एकत्र करुन दुधात भिजवून त्याचे लेपन करावे, जेणेकरुन तेलाचा अंश निघून जाईल आणि मन प्रसन्न होईल, ज्याला आज ‘अरोमा थेरपी’ असे म्हणतात , नंतर शक्यतो गार पाण्याने किंवा कोमट पाण्याने स्नान करावे. निसर्गोपचारात जल चिकित्सेला खूप महत्त्व दिले आहे.
 
अभ्यंगस्नानाचे फायदे
 
 
अभ्यंगस्नानामुळे रक्ताभिसरणास चालना मिळते. शरीरात ऊर्जा, चैतन्य, निर्माण होते. उष्णता निर्माण होते, नसांना लवचिकता येते. त्वचेचा पोत सुधारतो, तजेलपणा येतो. त्वचेवर लकाकी येते. त्वचा मऊ मुलायम होते, अकाली आलेले वार्धक्य दूर होण्यास मदत होते, त्वचेवरील सुरकुत्या दूर होतात, हाडांना बळकटी येऊन सांध्यांना होणारा त्रास थांबतो. त्वचेवरील मृतपेशींचा थर दूर होतो. मनावरील ताण तणाव दूर होऊन उत्साह वाढीस लागतो, झोप छान लागते, थकवा दूर होऊन मन उल्हसित होऊन सकारात्मक विचारांना चालना मिळते. सकारात्मकता वाढीस लागल्यामुळे वातावरण बदलते घरातले आणि बाहेरचेही मग असे अभ्यंग रोजच्या जीवनात अवलंबले तर जीवन बदलून जाईल. निरोगी जीवनाचा आनंद उपभोगता येईल. शरीरातील त्रिदोष संतुलित होण्यास मदत होईल. शरीराला झालेल्या असाध्य आजारामुळे शरीर आणि मन दोन्हीला यातना (नरकयातना) भोगाव्या लागतात. या यातना दूर व्हाव्यात त्या भोगाव्या लागुच नयेत म्हणून अभ्यंगस्नान सांगितले आहे.
 
- सीता भिडे
 
 
@@AUTHORINFO_V1@@