जे हिंदूविरोधी ते फ्लॉप!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2020
Total Views |

Editorial _1  H


धर्मनिरपेक्षतेच्या आडून हिंदूंच्या विरोधात षड्यंत्रे रचली जात होती, पण आता त्याचा पर्दाफाश करण्यापर्यंत देशातले दर्शक पोहोचले आहेत. हिंदूंना बदनाम करणार्‍यांच्या चेहर्‍यावरचा बुरखा फाडला जात असून त्यांना त्यांची जागाही दाखवली जात आहे. त्याची आताच्या काळातील निवडक उदाहरणे पाहिली तरी हे नेमके कसे सुरु आहे, हे समजू शकेल.
 
 
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार सत्तेवर आल्यापासून गेली सहा वर्षे देशात अनेकानेक बदल घडताना दिसतात. राजकीय, आर्थिक, संरक्षण, सामाजिक, कृषी, शिक्षण, आरोग्य अशा जवळपास प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचा सूर्य उगवल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, एक क्षेत्र असेही आहे की, जिथे सत्ताधार्‍यांनी हस्तक्षेप केल्याचे आढळले नाही, ते म्हणजे कला व कलेशी निगडित सर्व काही. तरीही तिथे हळूहळू का होईना, पण पूर्वीपेक्षा बराच बदल होत आहे आणि तो स्वयंस्फूर्त तसेच स्वागतार्ह आहे.
 
 
मात्र, हे परिवर्तन त्या क्षेत्रात काम करणार्‍यांपेक्षाही प्रेक्षकांकडून, दर्शकांकडून होत आहे, हे अधिक उल्लेखनीय. कलेतही एकाचवेळी सर्वाधिक लोकसंख्येला प्रभावित करणारे माध्यम म्हणून चित्रपट, दूरचित्रवाणीवरील रिअ‍ॅलिटी शो किंवा वेब सीरिजला ओळखले जाते. चित्रपटसृष्टीचा सुरुवातीचा काळ सोडला तर साधारणतः नंतर नंतर एक निराळीच पद्धती सुरु झाली. कथा, संवाद, दृश्य, गीतांच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षतेच्या उदात्तीकरणासाठी इथे हिंदूविरोधाचा व इस्लामप्रेमाचा कार्यक्रम चालवला गेला. त्याची अनेक उदाहरणे कित्येक चित्रपटांतून पाहायला मिळतात.
 
 
‘मदर इंडिया’, ‘अमर प्रेम’, ‘अमर अकबर अ‍ॅन्थनी’, ‘निकाह’, ‘तेरी मेहेरबानिया’, ‘प्रेम ग्रंथ’, ‘सत्या’, ‘कुछ कुछ होता है’, ‘भागम भाग’, ‘ओ माय गॉड’, ‘पीके’, ‘यारियाँ’, ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’, ‘मिशन मंगल’, ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ ही आणि यांसारखी अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. मात्र, यातल्या नव्या काळातील चित्रपटांना सातत्याने देशातील बहुसंख्य जनतेकडून विरोधाचा, बहिष्काराचा सामना करावा लागला आणि हाच तो बदल.
 
 
आपण जे दाखवू ते प्रेक्षकांनी निमूटपणे पाहिले पाहिजे, असा काही निर्माते-दिग्दर्शकांचा अहंभाव असतो. पण, सध्याचा हिंदू व राष्ट्रविरोधी साहित्य माथी मारण्यावरील बहिष्काराचा उपक्रम पाहता, असे चित्रपट, रिअ‍ॅलिटी शो किंवा वे सीरिज यांची लोकप्रियता कमालीची घटत असल्याचे किंवा त्या कलाकृती (?) फ्लॉप होत असल्याचे दिसते. भारतीय जनतेत निर्माण झालेल्या नव्या चेतनेचा, जागृतीचा हा परिणाम असून यात उत्तरोत्तर आणखी वाढ होत जाईल, असे वाटते. आतापर्यंत धर्मनिरपेक्षतेच्या आडून हिंदूंच्या विरोधात षड्यंत्रे रचली जात होती, पण आता त्याचा पर्दाफाश करण्यापर्यंत देशातले दर्शक पोहोचले आहेत.
 
 
 
हिंदूंना बदनाम करणार्‍यांच्या चेहर्‍यावरचा बुरखा फाडला जात असून त्यांना त्यांची जागाही दाखवली जात आहे. त्याची आताच्या काळातील निवडक उदाहरणे पाहिली तरी हे नेमके कसे सुरु आहे, हे समजू शकेल. यंदाच्या १० जानेवारीला दीपीका पादुकोण हिचा ‘छपाक’ चित्रपट प्रदर्शित झाला. पण, त्याआधी ती जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील ‘सीएए’, ‘एनआरसी’ विरोधी आंदोलनस्थळी गेली. परिणामी, दीपिकाची हिंदू व राष्ट्रविरोधी लोकांबरोबरची संगत दर्शकांनी आवडली नाही व त्यांनी दीपिका पादुकोण तसेच ‘छपाक’चा बहिष्कार केला व याचा फटका चित्रपटाला बसला, अपेक्षेहून कमी व्यवसाय या चित्रपटाने केला.
 
 
 
अक्षय कुमारसारखा अभिनेता असूनही चालू महिन्यात प्रदर्शित झालेला ‘लक्ष्मी’ हा चित्रपट फ्लॉप झाला. ‘सडक-२’ नंतर सर्वाधिक नापसंतीच्या चित्रपटांत ‘लक्ष्मी’चेही नाव सामील झाले. त्याला कारण चित्रपटाचे सुरुवातीचे ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव व त्यातून ‘लव्ह जिहाद’ला दिलेले प्रोत्साहन. अर्थात, वाढत्या विरोधानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदलले, पण त्यामुळे बहिष्काराची भावना शमली नाही. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हिंदूफोबिया पसरवला जात असल्याचा आरोप करुन त्याविरोधातही सोशल मीडियातून वेळोवेळी मोहीम चालवली गेली. ‘लैला’ आणि ‘कृष्णा अ‍ॅण्ड हिज लिला’ या दोन वेब सीरिजला प्रेक्षकांनी प्रामुख्याने विरोध केला व अनेकांनी नेटफ्लिक्सची नोंदणी रद्द केली.
 
 
दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा सर्वाधिक लोकप्रिय दूरचित्रवाणी शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ पण, या शोमध्ये ‘तुकडे तुकडे गँग’ आणि हिंदू धर्मग्रंथाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले गेले व त्यावर सोशल मीडियातून टीका-टिप्पणी झाली. दर्शकांनी स्वयंस्फूर्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘कौन बनेगा करोडपती’ला जोरदार विरोध केला आणि ताज्या आकडेवारीनुसार या कार्यक्रमाच्या प्रेक्षकसंख्येत सुमारे ५० टक्क्यांची घट नोंदली गेली. दूरचित्रवाणीवरील सर्वाधिक वादग्रस्त आणि चर्चित शो म्हणजे बिग बॉस.
 
 
बिग बॉसच्या आताच्या १४व्या हंगामावर प्रेक्षकांनी नेपोटिझमच्या कारणाने बहिष्कारास्त्र उगारले व त्यालाही नाकारले आणि ‘अव्वल-५’ कार्यक्रमात स्थान मिळवण्याचीही त्याची मारामार झाली. तसेच ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णव गोस्वामी यांची कपिल शर्मा शोमधून खिल्ली उडवण्यात आली व त्याचाही जनतेतून मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला. ताज्या आकडेवारीनुसार तर कपिल शर्मा शोच्या प्रेक्षकसंख्येत ४० टक्क्यांची घट झाली. तसेच प्रेक्षकांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या या विरोधाच्या-बहिष्काराच्या आंदोलनांतून या शो किंवा चित्रपटांना व्यावसायिक फटका बसत असल्याचेही दिसते.
 
दरम्यान, देशभरातील प्रेक्षकांकडून हिंदूविरोधी किंवा राष्ट्रविरोधी कलाकृतींना होणारा हा विरोध राजकीय प्रचारातून होत नाही. कारण, केंद्रातील सत्ताधारी पक्षाने कधीही दर्शकांनी काय पाहावे आणि काय पाहू नये, यासाठी एखादे अभियान चालवलेले नाही. जे हिंदूंच्या व राष्ट्रीयत्वाच्या विरोधात असेल, त्यावर बहिष्कार टाकण्याचे काम प्रेक्षकांनी स्वतःहून हाती घेतलेले आहे. म्हणजेच लोकांनी ते स्वीकारले व त्याचाच प्रभाव दूरचित्रवाणीवरील शो किंवा चित्रपटांच्या लोकप्रियतेवर पडताना दिसते. अर्थात, याला राजकीय पार्श्वभूमी नसून त्याचा संबंध सांस्कृतिकतेशी आहे. सरकार आल्याने जनतेने हिंदू वा राष्ट्रविरोधी कलेला नाकारले नाही तर आपल्या वारसा, संस्कृतीशी कलेच्या नावावर केला जाणारा खेळ खपवून न घेण्याच्या भावनेतून हे होत आहे.
 
 
देशात सर्वाधिक म्हणजे ८० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या हिंदू असताना कोणी हिंदूंच्याच विरोधात चित्रण दाखवत असेल तर ते सहन केले जाणार नाही, ते दिवस इतिहासजमा झाले, हे सांगणारी ही भूमिका आहे. त्यात काही वावगेही नाही. कारण, हिंदूविरोधाच्या कथा-कहाण्या सादर करताना त्यात इतरांचे मात्र उदार चित्रण केले जाते, जे आक्षेपार्ह व बर्‍याचदा वास्तवाशी कसलाही संबंध नसलेले असते. म्हणूनच दूरचित्रवाणी शो, चित्रपटासह हिंदूविरोधी जाहिराती व त्यांच्या उत्पादनांवरही बहिष्कार टाकला जातो.
 
 
अलीकडच्या काळातील ‘तनिष्क’, ‘इरॉस नाऊ’ हे त्याचे चांगले उदाहरण. उल्लेखनीय म्हणजे, हा उत्स्फूर्तपणा केवळ चित्रणापुरताच मर्यादित नाही, तर कलेच्या सर्वच प्रांतात हे होत आहे. प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे, त्याचा सन्मानही केला पाहिजे, पण केवळ हिंदूंना हीन दाखवण्यासाठी त्याचा वापर होत असेल तर ते मान्य होणार नाही, हाच यातून शिकण्यासारखा धडा आहे.



@@AUTHORINFO_V1@@