वैदिक सणांचे योग रहस्य भाग-४

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2020
Total Views |

RAM _1  H x W:


 
 

दसरा व विजयादशमी


आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना असते. देवी नवरात्राची सुरुवात या दिवशी असते. नवरात्रीतून साधकाच्या तंत्रसाधनेने संपन्न होणार्‍या नवदुर्गा या काळात येतात. दुर्गेचे तंत्रज्ञान वैदिक काळापासूनच आहे. ऐन युद्धाच्या धुमश्चक्रीत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला देवी साधना करायला सांगितले होते. क्लीबावस्थेत नटणार्‍या अर्जुनरूपी बृहन्नडेला याच दुर्गादेवीने शक्तिसंपन्न करून विजयादशमीच्या दिवशी कौरवांचा पराजय करण्यास साहाय्य केले होते. विजयादशमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी दैत्य रावणाचा निःपात केला होता. याच पराक्रमी तंत्रसाधनेची सुरूवात म्हणजे घटस्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला होत असते.
 
 
साधकाच्या पुण्य पराक्रमाचा हा घट आजपासूनच नवरात्रीतून पूर्ण भरायचा असतो आणि नवरात्र संपल्यावर दहाव्या दिवशी सूर्य दर्शनाच्या वेळी कौरव वा रावणाचा नि:पात करायचा असतो. या दश संख्येला धरूनच साधक आणि साध्य याची रचना केलेली आहे. दाशरथी राम तर दशमुखी रावण. राम म्हणजे अतिशय आनंद देणारा आणि तो दाशरथी का? उपनिषदे त्याचे वर्णन करतात- ‘आत्मानं रथिनं विध्दि शरीरं रथमेव तु। बुध्दिं तु सारथी विध्दि मन: प्रग्रहमेवच॥’ एकाच इंद्रियावर संयम साधणारा साधारण साधक एकरथी, तर दशेंद्रियांवर संयम साधणारा दाशरथी भगवान रामचंद्र सर्व जगताला दशांगुळे व्यापून उरले आहेत आणि रावण दशमुखी का? तर रावण हा ब्राह्मण होता.
 
 
चांगला विद्वान पंडित. त्याला दशग्रंथ अगदी मुखोद्गत होते. परंतु, आपल्या माहितीचा त्याला अतिशय गर्व होता. माहिती व ज्ञानामध्ये महदंतर असते. याशिवाय त्याला जे काही माहीत होते ते सर्व लोकांना आरडाओरड करून मोठ्या प्रसिद्धी तंत्राने तो सांगत असे. आज हे प्रसिद्धीतंत्र एक शास्त्र होऊन बसले आहे. ‘रवैती इति रावणः’ साधना केल्यावर जी ज्ञानप्राप्ती होते, त्यामुळे साधकाला गर्व उत्पन्न होत असतो. हा रावण आणि असुर दुसरे कोणी नसून ज्ञान वा शक्तीमुळे गर्वमदान्वित झालेला साधकच होय. सावध साधकाला म्हणजे दाशरथी रामाला आपल्या असल्या नीच प्रवृत्तीचे दमन करायचे असते. त्याशिवाय साधना पंथात तो विजयी होऊ शकत नाही. साधकाच्या स्वतःच्या आसुरी वृत्तीवरील विजय म्हणजेच विजयादशमी होय. रामाने रावणाला मारले ते याच वृत्तीमुळे.
 
अर्जुनाने कौरवाचा निःपात केला तो याच कारणामुळे. सावध साधकच राम आणि अर्जुन असतो. आपण स्वतः मात्र आपल्यातील रावण वा कौरव मारीत नाही. त्यामुळे दरवर्षी आम्ही विजयादशमी साजरी करतो, पण रावण वा कौरव वृत्ती न मारल्यामुळे आम्ही राम वा अर्जुन होऊ शकत नाही. साधारण मानवाच्या मर्यादा वा सीमा उल्लंघन करून साधकाला सीमोल्लंघन करायचे असते आणि ज्ञानाचे सुवर्ण सर्वांना वाटायचे असते. आता आम्ही विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करतो ते भौगोलिक सीमांचे आणि सोने वाटतो ते आपट्याच्या झाडाची पाने ओरबाडून! काळाच्या गतीतून आर्यांचे आम्ही आज अनार्य बनलो आहोत. पराक्रमी साधक रामाचे आम्हाला पूर्ण विस्मरण झाले आहे.
 
 
दोनशे वर्षांपूर्वी विदर्भात होऊन गेलेले महान साधक श्री दयालनाथ महाराज यांनी या घटस्थापनेचे आपल्या एका पदात वर्णन केले आहे. ते म्हणतात,
 

‘प्यारे उलट कमल मो पलट देखले मौजा।
घट घट में नाथ बिराजा ॥’
 
 
या घटाघटातील आनंद देणार्‍या रामाची घटस्थापना आश्विन प्रथमेला करायची असते. घट म्हणजे पूर्ण प्राप्तीचा कलश, हाच प्रत्येक मंदिरावर विराजमान होऊन आपल्या सुवर्णकांतीने झळाळणारा कळस होय. वैदिक परंपरेने प्रत्येक शरीरालासुद्धा मंदिर मानले आहे. म्हणूनच प्रत्येक आर्य प्राचीन काळात कलशयुक्त मुकुट वापरीत असे. मानवी शिरावर विराजमान होणार्‍या मुकुटाचा आकार मंदिराच्या आकारासारखाच असे. घटाघटात राम आहे, हाच त्याचा अर्थ आहे. विजयादशमीच्या दिवशी प्रसिद्धीपरायण गर्विष्ठ रावण मारून त्या घटाघटातील रामाचे दर्शन करायचे असते, हीच ती खरी विजयादशमी होय.
 
अर्जुनाने आपली आयुधे शमीच्या झाडांवर शवाखाली ठेवली होती म्हणतात आणि शवाखाली का? तर ते शव पाहून इतरांना ती शस्त्रे काढण्याचा मोह उत्पन्न होऊ नये म्हणून! महाभारतातील या कथेचा योग्य विचार केल्यास, ही कथा साधकांच्या साधनामार्गातील आचार प्रयत्नांचे केवळ रूपक होय असे म्हटल्यावाचून राहवत नाही. योग्य विचार केल्यास असे दिसून येईल की, शव एकतर झाडावर नेऊन ठेवता येत नाही आणि ठेवतोच म्हटल्यास ते अधिक काळ सुस्थितीत राहणार नाही. शव लवकरच सडते. त्याची दुर्गंधी पसरून वास्तविक न बोलविता गिधाडे आपणहून गोळा व्हायची. अशा स्फोटक परिस्थितीत आपली शस्त्रे इतरांना दिसू नयेत म्हणून अर्जुनाचा जो शवाखाली शस्त्रे ठेवण्याचा विचार होता तो कितीसा सफल होणार? वास्तविकतेवरून तर शवाखाली शस्त्रे ठेवल्याने अर्जुनाचा हा विचार शक्य न होता त्याचा बभ्राच अधिक होईल.
 
 
शिवाय इतरत्र पडलेले एक घाणेरडे शव आपल्या पाठीशी बांधून अर्जुनासारखा उच्च संस्कारांचा क्षत्रिय झाडावर कशाला चढला असेल? एकूण ही कथा अवास्तव आहे, असेच म्हणावे लागेल. पण, कथा अवास्तव म्हणावी तर विशाल बुद्धी व्यासांनीच ती कथा तर लिहून ठेवली आहे. म्हणजे त्याचा गर्भित आशय निराळा असावा. साधनेतील शस्त्रांशिवाय म्हणजे गुणांशिवाय साधकाचे शरीर शवच होय. या शवाखाली साधकाची साधनाशस्त्रे दडली असतात. त्या शवाला बाजूला सारूनच साधक आपली साधनाशस्त्रे काढून विजयाकरिता सिद्ध होतो; मग तो विजय कौरवरूपी कर्मपरायणतेवर असो कीपांडित्यरूपी अहंकारी रावणावर असो. शस्त्रपूजन असे करायचे असते आणि विजयादशमीला कनिष्ठ विचारांच्या सीमा उल्लंघन करून साधनेद्वारे प्राप्त उच्च अध्यात्मिक विचारांचे सोने असे वाटायचे असते.
 
दशेंन्द्रियपरायण दिखाऊ पांडित्य वृत्तीचा नायनाट करणे म्हणजे दशांचे हरण करणारा दशहरा आणि सामान्य वृत्तीचे सीमोल्लंघन करून जो विजय मिळवायचा तो म्हणजे विजयादशमी होय. विजयादशमीला सोने वाटण्याच्या निमित्ताने शमी आणि आपट्याची पानेच का वाटतात? शमीला ‘अपराजिता’ म्हणतात आणि आपट्याला ‘अश्मंतक’ असे म्हणतात. दोन्ही वल्लींचा अर्थ शत्रूंचा नायनाट करणार्‍या असा आहे, त्यांच्या नावावरुनच त्यांचा, विजयादशमीला उपयोग करुन घेतला आहे. शमीची पाने मात्र मंगलमूर्ती गणेशाला वर्षभर वाहत असतात. आपट्याच्या नशिबी मात्र फक्त याच दिवशी स्वत:चे सोने करुन घेण्याचे भाग्य वाट्यास येते.
 
 
योगिराज हरकरे
(क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९५९४७३७३५७/९७०२९३७३५७
@@AUTHORINFO_V1@@