'पब्जी’चे पुनरागमन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2020   
Total Views |
PUBG_1  H x W:
 
 
'पब्जी मोबाईल डेव्हलपर्स’तर्फे नुकतीच पुन्हा एकदा भारतात दणक्यात प्रवेश करण्याची घोषणा करण्यात आली. ज्यावेळी चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती, त्यावेळीच हा व्हिडिओ गेम पुन्हा भारतात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, याला अधिकृत दुजोरा कंपनीतर्फे नुकताच देण्यात आला. 'पब्जी’ पुन्हा येत असला तरीही या कंपनीला भारताच्या अटीशर्तींशी जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे बंदीपूर्वी सुरू असलेल्या 'पब्जी’च्या स्वैराचाराला चापही लागला आहे.
 
 
'लॉकडाऊन’च्या सुरुवातीला चिनी कंपनीची मालकी असलेल्या 'टिकटॉक’सह ५९ अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये 'पब्जी’ ’गुगल प्ले स्टोअर’ आणि 'आयओएस’वरून हटवण्यात आला. 'बाईट डान्स’ आणि 'टेसन्ट’ या कंपन्यांना याचा फटका बसला. लडाखमध्ये चिनी सैन्याशी झालेल्या झटापटीमुळे आणि याच भागात चिनी सैन्याशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताचा हा निर्णय महत्त्वाचा मानला गेला. यामुळे चीन खळवळून उठला खरा, मात्रस ड्रॅगनची वळवळ काही फार काळ चालली नाही.
 
 
डेटा चोरीच्या आरोपामुळे चीनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही गच्छंती झाली. 'टिकटॉक’सह अन्य अ‍ॅप्सवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिकेतही प्रयत्न करण्यात आले. काही बाबतीत चीनची ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी भारताला यश मिळाले खरे. मात्र, केवळ बंदी हा त्यावरील पर्याय असू शकत नाही हेही तितकेच खरे. भारतात त्याच काळात 'आत्मनिर्भर भारत’ ही घोषणा करत 'व्होकल फॉर लोकल’ ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांपुढे आणली. या बाबतीत त्यांनी चीनला अनुल्लेखाने मारले. मात्र, रोख हा भारतीय उत्पादनांच्या बद्दल कायम ठेवला.
 
 
गेमिंग क्षेत्राचा विचार केला असता, अभिनेता अक्षय कुमारने 'फौजी’ या व्हिडिओ गेमची घोषणा केली. मात्र, 'पब्जी’च्या स्पर्धेसमोर ही धाव किती चालेल, हा येणारा काळच सांगेल. 'पब्जी’ भारतात येणार ही बाब ज्यावेळी चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणली, त्याचवेळी निश्चित झाली होती. महिन्याला पाच कोटी युझर्स असणार्‍या आपल्या देशातून इतकी मोठी कंपनी साहजिकच सहजासहजी काढता पाय घेणार नाही. मात्र, ज्या प्रमाणे भारत सरकारची अपेक्षा आहे, त्या नियमांचे पालन करून पुन्हा एकदा 'पब्जी’ जोमाने सुरू करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.
 
 
ज्यावेळी ही बंदी घालण्यात आली, त्याच दिवशी कंपनीने आपले चीनच्या शेनझेन स्थित टेसेंट येथील कंपनीची फ्रेंचायझी मागे घेतली होती. ३० ऑक्टोबरपासून 'पब्जी’ मोबाईलचा सर्व्हर पूर्णपणे बंद करण्यात आला. मात्र, ग्लोबल व्हर्जन आणि कोरियन व्हर्जनद्वारे हा गेम भारतात आजही खेळता येतो. मोठे गेमर्स 'लाईव्ह स्ट्रीमिंग’द्वारे आजही हा गेम खेळत आहेत. मोबाईलवर खेळत असताना अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर नसल्याने या मोबाईल गेम्सच्या डेटा फाईल्स, उदा. मॅप्स आणि अन्य सॉफ्टवेअर यांचा भार मोबाईल मेमरीवर पडत आहे. नव्याने गेम पुन्हा सुरू झाल्यानंतर ही गेमरची ही डोकेदुखी कमी होणार आहे.
 
 
'पब्जी मोबाईल इंडिया’ या नावाने नव्या कंपनीची घोषणा केली जाईल. भारतीय बाजारपेठेला केंद्रस्थानी ठेवून या गेमिंगची रचना केली जाईल. केवळ भारतीय ग्राहकांसाठी हे नवे अ‍ॅप उपलब्ध होणार आहे. यातही भारत सरकारने घालून दिलेल्या सर्व अटीशर्तींची पूर्तता करण्याची हमी कंपनीने दिली आहे, हेदेखील कौतुकास्पद आहे. भारतीय गेमर्सचा डेटा स्थानिक ठिकाणीच साठवला जाणार असून त्याचे नियमित ऑडिट आणि व्हेरिफिकेशनही होईल, असे आश्वासन कंपनीने दिले आहे.
 
 
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, कंपनीने भारतात आपले स्थान बळकट करण्यासाठी स्थानिक रोजगारालाही प्राधान्य दिले आहे. गेमर्सचा अनुभव आणखी सुखद व्हावा यासाठी नव्या मनुष्यबळाची गरज कंपनीला आहे. एकूण शंभरहून नव्या कर्मचार्‍यांची भरती यासाठी गेल्या काही कालावधीत सुरू करण्यात आली. शंभर दशलक्ष डॉलर्स म्हणजे एकूण ७.४ अब्ज रुपयांची गुंतवणूक करण्याची योजनाही कंपनीने आखली आहे. याला मोदींचा मास्टरस्ट्रोक म्हणावा किंवा आणखी काही मात्र, ड्रॅगनचे नाक दाबून तोंड उघडण्याचा हा प्रकार भारताच्या पथ्यावर पडला आहे हे मात्र, नक्की.


@@AUTHORINFO_V1@@