बंगालमध्ये दिसणार महाराष्ट्राचा जोर

    18-Nov-2020
Total Views |

tawde and deodhar_1 

बंगालमध्ये दिसणार महाराष्ट्राचा जोर, सुनील देवधर आणि विनोद तावडे सक्रिय
 

पाच राष्ट्रीय सचिवांकडे ४० मतदारसंघांची जबाबदारी



नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : मृत्यूचा खेळ आता चालणार नाही या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्पष्ट इशाऱ्यानंतर भाजपच्या मिशन पश्चिम बंगालला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली आहे. बंगालमध्ये हरियाणाचे प्रभारी, माजी मंत्री विनोद तावडे आणि आंध्र प्रदेशचे सहप्रभारी सुनील देवधरदेखील सक्रिय झाले आहेत. भाजपने त्यांच्यासह पाच राष्ट्रीय सचिवांवर ४० मतदारसंघांची जबाबदारी सोपविली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

 

भाजपने राज्याची विभागणी ५ झोनमध्ये केली असून त्यातील प्रत्येकी ४० मतदारसंघांची जबाबदारी ५ राष्ट्रीय सचिवांकडे सोपविली आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. सुनील देवधर यांच्याकडे मिदनापूर, हावडा आणि हुगळी झोनची जबाबदारी दिली आहे तर विनोद तावडे यांच्याकडे नवद्विप झोन सोपविण्यात आला आहे. विनोद सोनकर यांच्याकडे रारबंग, हरिश द्विवेदी यांच्याकडे उत्तर बंग आणि दुष्यंत गौतम यांना कोलकाता झोनची जबाबदारी देण्यात आली आहे. या पाच झोनमधील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात जनसमर्थन आहे, मात्र तेथे भाजपचे संघटन तेवढे मजबूत नाही. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघांमध्ये पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे एका उच्चस्तरीय नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

 
 
amit s_1  H x W
 

पश्चिम बंगालमध्ये २०० जागांवर विजय मिळवून सत्ता काबिज करण्यासाठी भाजपा उत्सुक आहे. त्यासाठी आपले पूर्ण सामर्थ्य बंगालमध्ये लावण्याचे धोरण भाजपने अवलंबविले आहे. बंगालच्या प्रभारीपदाची जबाबदारी कैलाश विजयवर्गिय या अतिशय आक्रमक नेत्याकडे सोपविली आहे, गेल्या काही काळापासून विजयवर्गिय तेथे सक्रिय आहेत. त्याचप्रमाणे आता अकर सदस्यांची कोअर टीम तयार करण्यात आली असून त्याचे समन्वयक विजयवर्गिय असणार आहेत. कोअर टीममध्ये सुनील देवधर, विनोद तावडे, विनोद सोनकर, हरिश द्विवेदी आणि अरविंद मेनन या पाच राष्ट्रीय सचिवांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे दुष्यंत गौतम, आयटी सेल प्रमुख आणि बंगाल सहप्रभारी अमित मालविय अमित चक्रवर्ती आणि किशोर बर्मन यांचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. यासह राज्यातील प्रमुख पदाधिकारीदेखील या कोअर टीमचे सदस्य आहेत.

 

भाजपा आगामी काळात बंगालमध्ये किमान ५० राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना उतरविणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महिनाअखेरीस पुन्हा एकदा बंगाल दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोषदेखील निवडणुकीवर विशेष लक्ष ठेवून आहेत.