'राज ठाकरे राज्यपालांकडे का गेले संजय राऊतांना कळाले असेल'

    18-Nov-2020
Total Views |

raj thackeray_1 &nbs




मुंबई : कोरोनाकाळात आलेल्या वाढीव वीजबिलांमध्ये कोणतीही सूट देण्यात येणार नसल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. यावरूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काहीच निर्णय घेऊ शकत नाहीत, हे माहिती असल्यामुळेच राज ठाकरे वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटायला गेले होते, असा टोला ‘मनसे’कडून लगावण्यात आला आहे.


वाढीव वीज बिलांबाबत सामान्यांना दिलासा मिळेल, असे राज्य सरकार सुरुवातीला सांगत होते. मात्र, आता उर्जामंत्र्यांनी यू-टर्न घेत लोकांना वीजेची बिले भरावीच लागतील, असे जाहीर केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे आता संजय राऊत यांना राज ठाकरे मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना का भेटायला गेले, हे कळाले असावे, असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला. कोरोनाच्या काळात अनेकांची कार्यालये बंद होती. मग वीज न वापरताही त्यांनी बिल का भरावे? जनता रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत सरकारचं डोकं ठिकाणावर येणार नाही. त्यामुळे आता सरकारने जनक्षोभासाठी तयार राहावे, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.


काही दिवसांपूर्वीच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी वाढीव वीजदरांच्या प्रश्नावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीविषयी शिवसेना नेते संजय राऊत यांनी आक्षेप नोंदवला होता. राज्यपालांना कार्यकारी अधिकार नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही काही लोक राज्यपालांना भेटत असतात. मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली होती. आता वीजबिलांवरून ठाकरे सरकारने यु टर्न घेतल्यानंतर मनसेने संजय राऊत व शिवसेनेला टोला लगावला.